परभणी: जलसंधारणाच्या ६८० कामांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:55 PM2019-06-23T23:55:46+5:302019-06-23T23:55:52+5:30

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही तब्बल ६८० कामे पावसाळा सुरु झाला तरी सुरु झाली नसल्याने योजनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Parbhani: To begin work on 680 works of water conservation | परभणी: जलसंधारणाच्या ६८० कामांना लागेना मुहूर्त

परभणी: जलसंधारणाच्या ६८० कामांना लागेना मुहूर्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही तब्बल ६८० कामे पावसाळा सुरु झाला तरी सुरु झाली नसल्याने योजनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
राज्यातील दुष्काळ कायमस्वरुपी हटविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी सुरु केली. कृषी, लघु पाटबंधारे, जलसंधारण, भूजल सर्व्हेक्षण, लघु सिंचन, वन, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून गावपातळीवर जलसंधारणाची कामे करुन शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी त्यानंतरच्या वर्षांमध्ये योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर रखडली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशाला बगल दिली जात आहे.
२०१८-१९ मध्ये परभणी जिल्ह्यात २ हजार ३२५ कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यापैकी १ हजार ८६१ कामांना प्रशासकीय मांजुरी देण्यात आली.
जून महिना अखेर केवळ ६७२ कामे पूर्ण झाली असून ४४५ कामे प्रगतीपथावर आहेत. तब्बल ६८० कामांना कार्यारंभ आदेश देऊनही ही कामे अद्यापर्यंत सुरु झालेली नाहीत. जलसंधारणाची कामे मुख्यत्वे उन्हाळ्यामध्ये केली जातात. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जलयुक्त शिवार अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्याची संधी उपलब्ध झाली होती. मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे या कामांना गती मिळाली नाही. पावसाळा सुरु झाला असून या काळात जलसंधारणाची कामे करणे शक्य नाही. त्यामुळे कार्यारंभ आदेश देऊनही सुरु न केलेली कामे या संपूर्ण वर्षात रेंगाळण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतरही कामे सुरु होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुकानिहाय पूर्ण झालेली कामे
४जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सेलू तालुक्यात २०८ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यापैकी ४८ कामे पूर्ण झाली असून ४७ कामे प्रगतीपथावर आहेत. जिंतूर तालुक्यातील ४८० पैकी २२१ कामे पूर्ण झाली असून १२८ कामे प्रगतीपथावर आहेत.
४परभणी तालुक्यात १५१ पैकी ३८ कामे पूर्ण झाली आहेत. ७२ कामे प्रगतीपथावर आहेत. मानवत तालुक्यातील १७७ कामांपैकी १०८ कामे पूर्ण झाली असून केवळ २७ कामे प्रगतीपथावर आहेत.
४पाथरी तालुक्यातील ५७ पैकी ३३ कामे पूर्ण झाली असून १६ प्रगतीपथावर आहेत. सोनपेठ तालुक्यात ५६ पैकी ३८ कामे पूर्ण झाली. गंगाखेड तालुक्यात २८७ पैकी १०४ कामे पूर्ण झाली असून ६३ कामे प्रगतीपथावर आहेत.
४पालम तालुक्यामध्ये १४५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ३५ कामे पूर्ण झाली असून ६ कामे प्रगतीपथावर आहेत. तर पूर्णा तालुक्यामध्ये ३०० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी ४७ कामे पूर्ण झाली आहेत. ७० कामे प्रगतीपथावर आहेत.
वर्षभरात केवळ २९ टक्के कामे पूर्ण
४जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यावर्षी गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये कामांचा आराखडाही तयार करण्यात आला; परंतु, कामे पूर्ण करण्याची गती मात्र संथ राहिली. यावर्षी १ हजार ८६१ कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी केवळ ६७२ कामे पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी २८.९० टक्के एवढी आहे.
४ जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यासाठी जून महिन्यापर्यंतचीच मुदत देण्यात आली होती. या कामांना आणखी तीन महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तरी प्राधान्याने जलयुक्तची कामे पूर्ण केली तर शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. जिल्हा प्रशासनाने या योजनेंतर्गत कामांची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.
ठप्प असलेली कामे
सेलू ११३
जिंतूर १२७
परभणी ३४
मानवत ३४
पाथरी ८
सोनपेठ २
गंगाखेड ११८
पालम १०२
पूर्णा १४२
एकूण ६८०

Web Title: Parbhani: To begin work on 680 works of water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.