परभणी : वंचितांच्या हक्कासाठी बहुजन आघाडी-प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:11 AM2018-10-23T00:11:39+5:302018-10-23T00:11:45+5:30

समाजातील वंचित घटकातील नागरिकांच्या प्रश्नांकडे आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ता हीच गुरुकिल्ली आहे. त्यामुळे वंचितांचा वंचितपणा संपविण्यासाठी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली असून या आघाडीची एकजुट दाखवून द्यावी, असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Parbhani: Bahujan Agha-Prakash Ambedkar for the rights of the people | परभणी : वंचितांच्या हक्कासाठी बहुजन आघाडी-प्रकाश आंबेडकर

परभणी : वंचितांच्या हक्कासाठी बहुजन आघाडी-प्रकाश आंबेडकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : समाजातील वंचित घटकातील नागरिकांच्या प्रश्नांकडे आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ता हीच गुरुकिल्ली आहे. त्यामुळे वंचितांचा वंचितपणा संपविण्यासाठी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली असून या आघाडीची एकजुट दाखवून द्यावी, असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सोमवारी आयोजित मातंग समाज सत्ता संपादन परिषदेत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी लालसेनेचे कॉ.गणपत भिसे तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित आघाडीचे नाशिक, अहमदनगर, परभणी जिल्हा प्रभारी प्रा.किशन चव्हाण, उस्मानाबाद येथील जोशीलाल लोमटे, बीड येथील राजेश क्षीरसागर, लालसेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, मुंबई प्रदेशाध्यक्ष बालाजी घुमारे, कबीरानंंद, धम्मसंगीनी, कॉ.अशोक उफाडे, डॉ.प्रवीण कनकुटे, देविदास खरात, अंबादास कांबळे, रमेश नेटारे, ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाने देशाचा तमाशा केला आहे आणि आरएसएसच्या इशाºयावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष नाचत आहेत. त्यामुळे देशातील वंचित घटकांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठीच बहुजन वंचित आघाडीची स्थापना झाली आहे. सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आता आम्ही मागणे सोडले असून आम्ही देणारे झालो आहोत. मी सत्ताधारी होणार, ही मानसिकता प्रत्येकामध्ये झाली पाहिजे.
वंचित घटकातील व्यक्ती ही सत्तेच्या खुर्चीत बसला पाहिजे. हा बदलच परिवर्तनाची नांदी ठरेल. त्यामुळे आधी स्वत:ची मानसिकता बदला आणि मी सत्ताधारी होणार, अशी खूण गाठ बांधा. देशातील आरक्षण संपविण्याचा प्रयत्न होत आहे. नोकर भरती बंद करुन कंत्राटी पद्धत अवलंबिली जात आहे. देशामध्ये स्पष्टपणे बोलण्याचेही स्वातंत्र्य राहिले नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सत्ता हातात घेणे आवश्यक आहे. सत्तेतूनच आपले व इतरांचे दु:ख निरसण करायचे आहे. तेव्हा बहुजन वंचित आघाडीने दिलेला उमेदवार कोणताही असो, त्याला मत द्यायचे, अशी खूणगाठ बांधा. समाजातील वंचितपणा संपविण्यासाठी एकत्र या, असे आवाहन अ‍ॅड.आंबेडकर यांनी केले.
कॉ.गणपत भिसे यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, राजकीय पक्षांनी मातंग समाजाचा केवळ वापर करुन घेतला. त्यामुळे समाजाचे प्रश्न जैसे थे आहेत. या उलट सर्वच पक्षांकडून मातंग समाजावर अन्याय अत्याचार होत असून बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली राजकीय भूमिका योग्य असल्यानेच समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानाची सत्ता केवळ बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातूनच मिळणार आहे.
कुठल्याही राजकीय लालसेने आम्ही त्यांच्या सोबत नसून सत्ता पदांवर लायक माणसे बसावीत, या उद्देशानेच आम्ही बहुजन वंचित आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून सामाजिक संरक्षणही मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अशोक उफाडे यांनी सूत्रसंचालन केले.
उत्तम गोरे यांनी आभार मानले. मेळाव्यास परभणी जिल्ह्यातून बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Parbhani: Bahujan Agha-Prakash Ambedkar for the rights of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.