Pankanema slowed down the slurry of cotton seeded cotton in Palam taluka | पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने

पालम (परभणी ) : तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ 

पालम तालुक्यात यावर्षी १२ हजार ७९१ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली़ सुरुवातीपासूनच या पिकामागे शुक्लकाष्ट लागले आहे़ त्यामुळे कापूस पिकाने यावर्षी धोका दिला़ सुरुवातीला पावसाने दगा दिला़ काही शेतकर्‍यांनी उपलब्ध पाण्यावर पीक जगविले़ तसेच परतीच्या पावसाने पिकाला दिलासा मिळाला होता़ परंतु, काही दिवसातच कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला़ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे़ अख्खे कापसाचे क्षेत्र बोंडअळीच्या आहारी गेल्याने शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च करून जगविलेल्या कापूस पिकातून फारसे उत्पन्न निघाले नाही़ 

कापूस पिकाचे पंचनामे करावेत, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत़ परंतु, पालम तालुक्यामध्ये पंचनाम्याच्या प्रक्रियेला फारशी गती आलेली नाही़ दहा दिवसांपासून पंचनामे सुरू असले तरी कर्मचारी वर्गाची कमतरता अडथळा ठरत आहे़ ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक हे संयुक्तरित्या सर्वेक्षण करीत आहेत़ जीपीएस टॅगींग व प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका  गावाला १० ते १२ दिवसांचा कालावधी लागत आहे़ या तिन्ही कर्मचा-यांकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने कसरत करावी लागत आहे़ आतापर्यंत केवळ ३ ते ४ हजार हेक्टरचा सर्वे झाला आहे़ या सर्वेक्षणाला आणखी महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे़ पथकातील कर्मचारी इतर कामे बंद ठेवून पंचनामे करीत असल्याने इतर कामांवर त्याचा परिणाम होत आहे़ 

१ लाख ९१ हजार क्षेत्र बाधित
परभणी जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी सर्वच्या सर्व क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले आहे़ पालम तालुक्यात १२ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावर ५ हजार २२० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली आहे़ आतापर्यंत ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत़ आणखी ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे करण्याचे आव्हान या कर्मचार्‍यांसमोर  आहे़ 


Web Title: Pankanema slowed down the slurry of cotton seeded cotton in Palam taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.