officers poor reply on drought relief to central inspection squad in Parbhani | परभणीत दुष्काळी उपाययोजनांवरून अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी
परभणीत दुष्काळी उपाययोजनांवरून अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

ठळक मुद्दे दुष्काळवाडा : परभणी जिल्ह्यात केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी

परभणी : परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना दुष्काळी उपाययोजनांवरून पथकातील अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. 

केंद्र शासनाचे पथक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील गणेशपूर शिवारात दाखल झाले़ यावेळी या पथकाचे प्रमुख मानश चौधरी यांनी महिला शेतकरी त्रिवेणी रामचंद्र गिते यांच्याशी संवाद साधला़ यावेळी हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले़ त्यानंतर दुष्काळी उपाययोजनांबाबत चर्चा करताना येथील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत का? येथील किती मजुरांचे जॉबकार्ड तयार करण्यात आले आहेत? किती शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मातीपरीक्षणाची आरोग्यपत्रिका देण्यात आली आहे? किती शेतकऱ्यांनी मातीपरीक्षण केले आहे? असे प्रश्न स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले़ त्यावेळी कृषी, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येणाऱ्या आकडेवारीत तफावत येत असल्याचे आढळून आले़ शिवाय समाधानकारक माहितीही उपलब्ध नव्हती़ 

विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीही निराश होऊन डोक्यावर हात ठेवले़ यावेळी जमिनीची आरोग्यपत्रिकाच येथील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वाटप केली गेली नसल्याचे समोर आले़ त्यामुळे पथकातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली़ राज्यात परभणी जिल्ह्याचे मनरेगाचे काम व्यवस्थित नाही, असे यावेळी या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले़ येथील शेतकऱ्यांना तातडीने जॉबकार्ड उपलब्ध करून द्या, ज्यांना काम पाहिजे, त्यांना तातडीने कामे उपलब्ध करून द्या, सेल्फवर कामे ठेवा, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करा, असे सांगितले़ गणेशपूर व पेडगाव येथे स्थानिक अधिकाऱ्यांची पथकातील अधिकाऱ्यांना माहिती सांगताना भंबेरी उडाली़ 

रुढी येथे पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला़ त्यावेळी विविध तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या़ यावर जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांना या पथकातील अधिकाऱ्यांनी बोलावले असता शिंदे हे स्वत:त्या अधिकाऱ्यांकडे न जाता त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून दिले़ गणेशपूर येथे अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर पेडगाव येथे आणि रुढीत शिंदे यांनी या पथकापासून दूर राहणेच पसंत केले़ 

आरोग्य पत्रिका...
यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी पेडगावमधील किती शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिका दिली? असा प्रश्न केला असता, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी कृषी सहायकाला याबाबत माहिती सांगण्यास सांगितले़ कृषी सहायकाने दोन वर्षांपूर्वी पेडगावला या आरोग्यपत्रिका दिल्या होत्या; परंतु त्यामध्ये चुका असल्याने त्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या असल्याचे सांगितले़ यावरूनही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली़

८५० जॉबकार्ड; काम कोणालाच नाही
अप्पा खुºहाडे या शेतकऱ्यानेही प्रशासनाकडून कोणीच उपाययोजना केल्या जात नसल्याचे सांगितले़ त्यावर येथील मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहेत का? असा सवाल या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांना केला असता गावात ८५० जॉबकार्ड वाटप करण्यात आले़; परंतु काम मात्र कोणालाही दिले नाही, असे सांगितले़ त्यावर विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी शेतकरी व मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी १०० शेततळ्यांचा प्रोग्राम तयार करा व मंजुरीसाठी सादर करा, असे आदेश दिले़ 

८ महिन्यांत फक्त २ कामे 
या पथकाने पेडगाव येथे पीकपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शेतकरी व शेतमजुरांना किती कामे उपलब्ध करून दिली? असा सवाल स्थानिक अधिकाऱ्यांना करण्यात आला़ त्यावेळी अधिकाऱ्यांना समाधानकारक माहिती देता आली नाही़ पथकातील अधिकाऱ्यांनीच ८ महिन्यांत फक्त २ कामे येथे रोहयोंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले़ शेतकरी शेख निसार पेडगावकर यांनी गावात रोहयोची कामेच उपलब्ध नाहीत़ त्यामुळे जवळपास १,५०० मजुरांनी शहराकडे स्थलांतर केले असल्याचे सांगितले, तर गंगूबाई खुºहाडे या महिलेने शेतात पिकले नाही़ त्यामुळे हाताला काम नाही़ काय करावे तुम्हीच सांगा, असा सवाल केला़ नीलाबाई बापूराव खुºहाडे या महिलेनेही गावात रोहयोची कामेच सुरू नाहीत. जॉबकार्ड असूनही त्याचा उपयोग नाही, अशी तक्रार केली़ 


Web Title: officers poor reply on drought relief to central inspection squad in Parbhani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.