राष्ट्रीय महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; खड्डे, साईड पट्ट्यांमुळे वाहनधारक त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:13 PM2018-09-21T17:13:10+5:302018-09-21T17:13:57+5:30

जिंतूर-परभणी, जिंतूर-सेनगाव, जिंतूर-जालना, जिंतूर-औंढा-नांदेड हे चारही प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूचे सापळे बनले आहेत

National highways became death traps; drivers suffer due to potholes, side straps | राष्ट्रीय महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; खड्डे, साईड पट्ट्यांमुळे वाहनधारक त्रस्त 

राष्ट्रीय महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; खड्डे, साईड पट्ट्यांमुळे वाहनधारक त्रस्त 

googlenewsNext

जिंतूर (परभणी ) : तालुक्यातून जाणारे जिंतूर-परभणी, जिंतूर-सेनगाव, जिंतूर-जालना, जिंतूर-औंढा-नांदेड हे चारही प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूचे सापळे बनले असून, या रस्त्यांवरून वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे़ यावर प्रशासन, संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे़    

जिंतूर-औंढा हा मार्ग मागील वर्षी खड्डेमुक्त करण्यात आला; परंतु, अवघ्या तीन महिन्यांतच या मार्गावर खड्ड्यांची अवस्था जैसे थे झाली़ लाखो रुपये संबंधित गुत्तेदाराच्या खिशात गेले; परंतु, खड्डे मात्र कायम आहेत़ हीच अवस्था जिंतूर-जालना या रस्त्याची आहे़ लाखो रुपये खर्च झाला़ मात्र ४ फुट रुंद व २ फुट खोल खड्डे एक-दोन नव्हे तर २५ किमीमध्ये १०० पेक्षा अधिक आहेत़ काम करताना सुमार साहित्याचा वापर व अभियंत्यांचे दुर्लक्ष यामुळे या रस्त्याची वाट लागली आहे़ 

जिंतूर-सेनगाव रस्ताही फारसा चांगला नाही़ सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गेल्या वर्षी लाखोंचा निधी खर्च केला़ गुत्तेदारांचे खिसे भरले़ रस्ता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित झाला. त्यामुळे या रस्ता दुरुस्तीबाबत आता सार्वजनिक बांधकाम विभाग हात वर करीत आहे़ दुरुस्तीवर शासनाने खर्च केलेला पैसा मात्र मातीत गेला आहे़ जिंतूर-परभणी या मार्गाचे खरे हाल  आहेत़ या रस्त्याचे सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरू आहे़ संबंधित कंत्राटदाराचे कुठलेच नियोजन नसल्याने रस्त्याची वाट लागली आहे़ ठिक ठिकाणी आडवा रस्ता खोदल्याने मोठे गतीरोधक तयार झाले आहेत़ 
पुलाचे काम करताना कोठेच सुरक्षितता बाळगली नाही़ केवळ झेंडे व पताके लावण्यात आले़ यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील कोक ते परभणी तालुक्यातील झरीपर्यंत रस्त्याला वळण रस्ता बनवला़ मुरूम व गिट्टी न वापरता तयार करण्यात आलेला १० किमीचा हा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे़ 

पाऊस पडल्यानंतर वाहनधारकांना गुडघ्या इतक्या चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे़ शिवाय छोट्या वाहनचालकांना  तर कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत़ अपघाताचे प्रमाण वाढले आहे; परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे़ परिणामी वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ 

सार्वजनिक बांधकाम विभागाने जिंतूर-परभणी, जिंतूर-औंढा, जिंतूर-सेनगाव व जिंतूर-वाटूर हे मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अद्याप वर्ग केले नाहीत़ त्यामुळे मागील एक वर्षांपासून या रस्त्यावर कोणत्या यंत्रणेने काम करावे, याचा वाद निर्माण झाला आहे़ या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या खड्ड्यांबाबत पाहणी करून योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणीही होत आहे़ 

६ महिन्यांमध्ये कोट्यवधी पाण्यात
मागील वर्षी जिंतूर-औंढा-जिंतूर व जिंतूर-परभणी रस्त्यावर १ कोटी रुपयांपर्यंत खर्च झाला़ तीन वर्षे खड्डे बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदारांची आहे़ मात्र तीन ते सहा महिन्यांतच  रस्त्याची वाट लागली आहे़ परंतु, अद्यापही एकही कंत्राटदार रस्त्यावर पडलेले खड्डे दुसऱ्यांदा बुजविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे सहा महिन्यांत खड्डेमुक्तीसाठी खर्च करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी मातीत गेल्याचे दिसत आहे़ 

पुलांची अवस्थाही धोकादायक
जिंतूर-जालना, जिंतूर-औंढा, जिंतूर-परभणी या रस्त्यावरील अनेक पुलांना कठडे नसल्याने ते धोकादायक बनले आहेत़ परिणामी अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु, याचे प्रशासन व लोकप्रतिनिधींना सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे़ 

Web Title: National highways became death traps; drivers suffer due to potholes, side straps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.