परभणीत पाचवे बौद्ध साहित्य संमेलन : सोप्या भाषेत बौद्ध साहित्य निर्माण करा-योगीराज वाघमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:20 AM2018-07-23T00:20:11+5:302018-07-23T00:21:16+5:30

बौद्ध वाङमय विपूल प्रमाणात आहे़; परंतु, ते अधिकाधिक सोप्या भाषेत मराठीत हवे आहे़ सामान्य माणसाला उपयोगी होईल, अशा पद्धतीने धम्मपदांचे मराठीत भाषांतर व्हावे़ मुलांसाठी मोठ्या प्रमाणात लेखन करावे, असे आवाहन पाचव्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केले़

Fifth Buddhist literature convention in Parbhani: Make Buddhist literature in simple language - Yogiraj Waghmare | परभणीत पाचवे बौद्ध साहित्य संमेलन : सोप्या भाषेत बौद्ध साहित्य निर्माण करा-योगीराज वाघमारे

परभणीत पाचवे बौद्ध साहित्य संमेलन : सोप्या भाषेत बौद्ध साहित्य निर्माण करा-योगीराज वाघमारे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बौद्ध वाङमय विपूल प्रमाणात आहे़; परंतु, ते अधिकाधिक सोप्या भाषेत मराठीत हवे आहे़ सामान्य माणसाला उपयोगी होईल, अशा पद्धतीने धम्मपदांचे मराठीत भाषांतर व्हावे़ मुलांसाठी मोठ्या प्रमाणात लेखन करावे, असे आवाहन पाचव्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केले़
परभणी शहरातील बी़ रघुनाथ सभागृहात २२ जुलै रोजी पाचवे बौद्ध साहित्य संमेलन पार पडले़ याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना वाघमारे बोलत होते़ प्रारंभी माजी खा़ एकनाथराव गायकवाड यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले़ याप्रसंगी विचारमंचावर प्रा़डॉक़मलाकर कांबळे, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, नगरसेवक लियाकत अली अन्सारी, संबोधी अकादमीचे प्रमुख भीमराव हत्तीअंबिरे, बी़एच़ सहजराव, स्वागताध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्राचार्य शिवाजी दळणर यांची उपस्थिती होती़ वाघमारे म्हणाले, आंबेडकरी विचारधारेचे साहित्य म्हणजे बौद्ध साहित्य़ ते विज्ञानवादी व वास्तववादी साहित्य आहे़ असंख्य लेखक, कवी, विचारवंत या साहित्याने दिले आहेत़ तळागाळातील वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी, विमुक्त भटक्यांचा दु:खानुभव जगण्याचा भोगवाटा इ. वास्तववादी चित्रण करणारे लेखक, कवी उदयाला आले; परंतु, आजही बौद्ध साहित्याकडे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही़ बौद्ध वाङमय विपुल प्रमाणात आहे़ जातक कथा, बुद्ध चरित्र, धम्मपद, सम्राट अशोक, हर्ष, कनिष्क, यशोधारा आदींवर लेखन अपेक्षित असल्याचे ते म्हणाले़ बौद्ध साहित्याबरोबरच बौद्ध कलेचा विचार मांडणेही आवश्यक आहे़ बौद्ध साहित्यावरच बौद्ध कला विकसित झाल्या आहेत़ ज्या कलेला साहित्याचा आधार नाही, ती कला विकसित होत नाही़ तसेच जे साहित्य कलेची संकल्पना विचारात घेत नाही, त्या साहित्यास अभिजात साहित्याचा दर्जा प्राप्त होत नाही़ त्यामुळे कलेशी साहित्याचे अतूट नाते असते़ त्यामुळे बौद्ध साहित्याबरोबर बौद्ध कला विकसित झाल्या पाहिजेत, असे सांगताना उपलब्ध असलेल्या बौद्ध साहित्याचे अनेक प्रकार त्यांनी यावेळी विषद केले़ डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मोठा समृद्ध वारसा आपल्याला मिळाला आहे़ त्याचे अध्ययन करा आणि समाजाला उन्नत करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले़
कार्यक्रमात संयोजक तथा निमंत्रक प्रा़डॉ.संजय जाधव यांनी प्रास्ताविक केल़े़ बौद्ध साहित्य संमेलन आयोजनामागची भूमिका त्यांनी विषद केली़ बौद्ध तत्वज्ञान, जाणिवा, वृद्धींगत करण्याच्या हेतूने हे संमेलन घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले़ प्राचार्य कमलाकर कांबळे, लियाकत अली अन्सारी, माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले़ स्वागताध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी आपल्या मनोगतात संमेलनाचा उद्देश स्पष्ट करीत बौद्ध समाजातील युवकांनी संघटित व्हावे, स्ववलंबी बनून उद्योजक व्हावे, असे आवाहन केले़ तसेच राजकारणापेक्षा समाजकारणावर मी अधिक भर देत आहे़ त्यातूनच भीमगीत संगीतरजनी, साहित्य संमेलन यासारखे कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले़ प्रा़सुनील तुरूकमाने यांनी सूत्रसंचालन केले़ कार्यक्रमास नागरिक, साहित्यिक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
अभिमन्यू कांबळे यांना मूकनायक पुरस्कार
पाचव्या बौद्ध साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़ त्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांना ‘मूकनायक’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले़ त्याचप्रमाणे चित्रकला क्षेत्रातील पुंडलिक सोनकांबळे गुरुजी यांना अजिंठा कलागौरव, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया राणूबाई वायवळ यांना विश्वरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, लोकप्रबोधनासाठी चरण भीमराव जाधव यांना वामनदादा लोकप्रबोधन पुरस्कार, प्रा़डॉ. अनंत राऊत यांना चक्रवर्ती सम्राट अशोक पुरस्कार, प्रा़ सिद्धार्थ आबाजी तायडे यांना अश्वघोष कलागौरव पुरस्कार, दीपक अशोकराव कांबळे यांना प्रभावी समाजमाध्यम पुरस्कार आणि कालिंदी वाघमारे यांना डॉ़ भदंत आनंद कौशल्य लाईन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ याच कार्यक्रमात संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला़
परिवर्तनाचे आव्हान-गायकवाड
साहित्य हेच समाजात परिवर्तन घडवू शकते़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय घटना हे सर्वश्रेष्ठ साहित्य आहे़ तथागत गौतम बुद्धांनी प्रेमाचे राज्य केले़ गौतम बुद्ध हे एक ज्ञानपीठ, एक विचार आहे़ सर्वांना पुढे नेणारा मार्ग गौतम बुद्धांनी दाखविला; परंतु, सध्या देशात प्रेमाचे नव्हे तर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यामुळे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम साहित्यिकांना करावयाचे आहे़ सध्याची व्यवस्था बदलणे, परिवर्तन निर्माण करण्याचे आव्हान बौद्ध साहित्यिकांसमोर आहे़, अशा साहित्य संमेलनांमधून साहित्यिकांनी भयग्रस्त होवून लेखनीच्या सहाय्याने सर्वसामान्यांना भयातून बाहेर काढण्याचे काम करावे, असे आवाहन संमेलनाचे उद्घाटक माजी खा़ एकनाथराव गायकवाड यांनी केले़

Web Title: Fifth Buddhist literature convention in Parbhani: Make Buddhist literature in simple language - Yogiraj Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.