परभणी जिल्ह्यात अनुदान योजनेकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:26 PM2018-02-16T18:26:35+5:302018-02-16T18:27:40+5:30

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेचा लाभ घेतला.

Farmers revised their scheme for grant scheme in Parbhani district | परभणी जिल्ह्यात अनुदान योजनेकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

परभणी जिल्ह्यात अनुदान योजनेकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकर्‍यांना स्वत:च्या हक्काची कृषी यंत्रसामुग्री, औजारे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्दात हेतूने राज्य शासनाने कृषी विभागामार्फत उन्नत शेती- समृद्ध शेतकरी ही योजना सुरू केली.शेती औजाराच्या किंमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १ लाख २५ हजार व सर्वसाधारण गटातील शेतकर्‍यांना यंत्राच्या किंमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.

- मारोती जुंबडे 
परभणी : उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे  २ हजार ६६० शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र कृषी विभागाकडूून देण्यात आलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.

शेतकर्‍यांना स्वत:च्या हक्काची कृषी यंत्रसामुग्री, औजारे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्दात हेतूने राज्य शासनाने कृषी विभागामार्फत उन्नत शेती- समृद्ध शेतकरी ही योजना सुरू केली. या योजनेत शेतकर्‍यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे उपलब्ध असलेली औजारे देण्यात येतात. यामध्ये ट्रॅक्टर, स्वयंचलित यंत्रे, पॉवर ट्रिलर, औजारे आदीवर अनुदान देण्यात येते. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना शेती औजाराच्या किंमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १ लाख २५ हजार व सर्वसाधारण गटातील शेतकर्‍यांना यंत्राच्या किंमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. ज्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्या शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावयाचा असतो. त्यानुसार कृषी विभागाच्या वतीने प्राप्त प्रस्तावातून सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकर्‍यांची निवड केली जाते. 

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी ही योजना २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी कृषी विभागाला राज्य शासनाने ४ कोटी ९१ लाख ७१ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार २६ एप्रिल २०१७ पासून कृषी विभागाने लाभार्थी शेतकर्‍यांकडून प्रस्ताव मागविले होते. 
१५ मे २०१७ पर्यंत जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी यंत्र, औजाराच्या अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते. प्राप्त अर्जानुसार प्रत्येक लाभार्थ्याचे कृषी विभागाने ट्रॅक्टर व इतर औजारे निहाय तालुकास्तरावर सोडत पद्धतीने ज्येष्ठता सुचीनुसार औजारे खरेदी करण्यासाठी पूर्व संमती देण्यात आली होती. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे आतापर्यंत २ हजार ९०० लाभार्थी शेतकर्‍यांपैकी केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेतील अनुदानाचा लाभ घेतला आहे. यामध्ये शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या ७५ ट्रॅक्टर व १६५ इतर लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या आधारलिंक बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. 

त्यामुळे कृषी विभागाने या योजनेतील अटी व नियम शिथील करून लाभार्थी शेतकर्‍यांना लाभ द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यातून होत आहे. यामध्ये विशेष म्हणजे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर. शिंदे, एच.व्ही. खेडकर यांच्या उपस्थितीत पाथरी तालुक्यात तीन व जिंतूर तालुक्यातील एका लाभार्थ्याला ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले होते. 

कृषी विभागाचे दुसर्‍यांदा आवाहन
उन्नत शेती- समृद्ध शेतकरी या योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने २२ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी आपले प्रस्तावही दाखल केले होते; परंतु, केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. त्यामुळे २०१७-१८ या वर्षासाठी कृषी विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने दुसर्‍यांदा आवाहन केले आहे. 
यामध्ये ज्या शेतकर्‍यांना या योजनेतील अनुदानाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या शेतकर्‍यांनी २२ फेबु्रुवारीपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत, ज्या शेतकर्‍यांनी यापूर्वी अर्ज सादर केला आहे त्या शेतकर्‍यांनी दुसर्‍यांदा अर्ज सादर करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती- समृद्ध शेतकरी या योजनेचा प्रचार, प्रसार ग्रामीण भागात नसल्याने अनेक शेतकरी  या योजनेपासून वंचित राहत आहेत. 

पावणे पाच कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पोहचवा, यासाठी राज्य शासनाने कृषी विभागाकडे जिल्ह्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी ४ कोटी ९१ लाख ७१ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध केले आहे. यातून शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, स्वयंचलित यंत्रे, पॉवर ड्रिलर चलित यंत्रे, औजारे, कापूस, पºहाटी, ट्रेडर, राईस मील व दालमीलसाठी लागणारे सर्व पॉलिस्टर, क्लिनर कम ग्रेडर, मिनी राईस मील, मिनी दाल मील आदी प्रकारचे यंत्र व सामुग्रीसाठी अनुदान उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Farmers revised their scheme for grant scheme in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.