Decisions on demands after the army's agitation | सेनेच्या आंदोलनानंतर मागण्यांवर निर्णय
सेनेच्या आंदोलनानंतर मागण्यांवर निर्णय

ठळक मुद्देमहामार्गावरील वाहतूक ठप्प: बंडू जाधव यांची आक्रमक भूमिका; अधिकाºयांची उडाली धांदल

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतक-यांना कृषीपंपाच्या नवीन वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून तब्बल चार तास आंदोलन करण्यात आल्याने या विभागाच्या अधिकाºयांची चांगलीच धादंल उडाली. मागण्या मान्य झाल्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आले. कार्यालयामधील सर्व अधिकारी, कर्मचाºयांना बाहेर काढून खा.जाधव यांनी स्वत:च या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकले. त्यानंतर महावितरणच्या अधिकाºयांची धादंल उडाली. अधीक्षक अभियंता कांबळे यांनी खा. जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, खा. जाधव यांनी जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. महावितरणसमोर आंदोलन सुरु असल्याने कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रारंभी तासभर ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजुंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोनि. अशोक घोरबांड यांनी खा.जाधव यांच्याशी चर्चा करुन एका बाजुने वाहतूक सुरु करावी, अशी विनंती केली. त्यानंतर जवळपास अर्धा तास वाहतूक सुरु झाली. परंतु, महावितरणकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने शिवसैनिक संतापले. त्यानंतर पुन्हा रस्तारोको करण्यात आला. तसेच या रस्त्यावर तीन वेळा टायर जाळण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ इतरत्र वळविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला नाही. या दरम्यान अधीक्षक अभियंता कांबळे यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली. वरिष्ठ अधिकाºयांनी खा.जाधव यांच्याशी संवाद साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, ठोस आश्वासन मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शिवसैनिकांनी त्यांना प्रतिकात्मक पुतळा जाळला. परिस्थिती चिघळत असल्याने पोलिसांनी शिवसैनिकांना शांत केले.
या दरम्यान, खा.जाधव यांनी महावितरणचे आॅपरेशन विभागाचे संचालक देशपांडे, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांच्याशी चर्चा केली. तरीही तोडगा निघाला नाही. अखेर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत चर्चा झाली. त्यानंतर महावितरणचे प्रकल्प संचालक दिनेशचंद्र साबू यांच्याशी चर्चा केल्यानंतर तोडगा निघाला. त्यामध्ये प्रलंबित असलेल्या ३ हजार कृषीपंपाच्या वीज जोडण्यापैकी १ हजार वीज जोडण्यांच्या कामांना दोन दिवसांत सुरुवात करण्यात येईल, उर्वरित वीज जोडण्यांबाबत सहा महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, जळालेले विद्युत रोहित्र सध्या आठ दिवसांपर्यत बदलून देण्यात येते. परंतु, सध्या आॅईलचा पुरवठा झाल्याने प्रलंबित नादुरुस्त रोहित्र तीन दिवसांत बदलून देण्यात येतील. ज्या कृषीपंप वीज ग्राहकांनी किमान चालू वीज बिल भरले नाही, अशांचा वीज पुरवठा वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार बंद करण्यात आला होता. यापुढे गावा-गावात प्रत्यक्ष कर्मचारी जावून त्यांना वीज बिल भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही जे ग्राहक किमान चालू वीज बिल भरणार नाहीत, अशांचा वीज पुरवठा बंद केला जाईल, या मागण्या मान्य केल्याचे अधीक्षक अभियंता कांबळे यांनी लेखी स्वरुपात खा.जाधव यांना दिले. त्यानंतर खा. जाधव यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, सदाशीव देशमुख, जि.प.सदस्य विष्णू मांडे, राम खराबे, प्रभाकर वाघीकर, सखुबाई लटपटे, अर्जून सामाले, मधुकर निरपणे, मनिष कदम, दशरथ भोसले, पंढरीनाथ घुले, रविंद्र धर्मे, विशाल कदम, संतोष एकलारे, संदीप भंडारी, बाळासाहेब निरस, सुनिता गाडगे, संगीता जागमे, अंजली पवार, कुसूम पिल्लेवाड, सूचिता गिरी, मीरा कपाळे, नगरसेविका मंगल कथले, रणजीत गजमल, गजानन देशमुख, जनार्दन सोनवणे आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Web Title: Decisions on demands after the army's agitation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.