परभणीतील 'त्या' जिल्हा परिषद शाळेच्या समायोजनेचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 07:24 PM2019-01-23T19:24:35+5:302019-01-23T19:24:57+5:30

एकाच विद्यार्थ्यासाठी तीन शिक्षक नियुक्तीला असल्याची बाब दोन दिवसांपूर्वी लोकमतने उजेडात आणली.

Adjustment order of 'Zilla Parishad School' in Parbhani | परभणीतील 'त्या' जिल्हा परिषद शाळेच्या समायोजनेचा आदेश

परभणीतील 'त्या' जिल्हा परिषद शाळेच्या समायोजनेचा आदेश

Next

गंगाखेड (परभणी ) : तालुक्यातील ब्रह्मनाथ येथील एकाच विद्यार्थ्याच्या शाळेचे प्रकरण लोकमतने उजेडात आणल्यानंतर शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन ही शाळा बंद करून या शाळेचे समायोजन खळी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ब्रह्मनाथ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या एकाच विद्यार्थ्यासाठी तीन शिक्षक नियुक्तीला असल्याची बाब दोन दिवसांपूर्वी लोकमतने उजेडात आणली. एकीकडे २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे धोरण जिल्हा परिषदेने आखले असताना ब्रह्मनाथ येथील शाळेत मात्र एका विद्यार्थ्यासाठी तीन शिक्षक नियुक्तीला असल्याने या अजब प्रकाराविषयी तालुक्यात चर्चा होत होती.

शिक्षण विभागाने तालुक्यातील पांढरीमाती तांडा येथील जिल्हा परिषद शाळेबरोबरच इतर शाळांचे नजिकच्या शाळांमध्ये समायोजन केले. पांढरी माती तांडा जि.प. शाळेत २४ विद्यार्थी संख्या होती. असे असतानाही या शाळेचे समायोजन करण्यात आले. तर दुसरीकडे ब्रह्मनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ एक विद्यार्थी शिकत असतानाही ही शाळा सुरू ठेवण्यात आली. विशेष म्हणजे या एका विद्यार्थ्याला शिकविण्यासाठी दररोज वेगवेगळ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर लोकमतने २० जानेवारी रोजीच्या अंकात ‘एकाच विद्यार्थ्यासाठी चालते शाळा’ हा मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली. २१ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी निलपत्रेवार यांनी दिवसभर शाळेत बसून तपासणी केली. त्यानंतर २२ जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनीही शाळेला भेट दिली. या शाळेत तिसरी वर्गात शिकणाऱ्या एकमेव विद्यार्थी असलेल्या कृष्णा उद्धव कऱ्हाळे यास व त्याच्या पालकांना शाळेत बोलावून चर्चा केली. या विद्यार्थ्याचे समायोजन इतर शाळेमध्ये करण्याबाबत एकमत घडवून आल्यानंतर कृष्णा कऱ्हाळे या विद्यार्थ्याचे समायोजन खळी येथील जिल्हा परिषद शाळेत करून तसा अहवाल कार्यालयास सादर करावा, अशा सूचना शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी केंद्रप्रमुख एम.एच. चव्हाण यांना दिल्या आहेत. त्यामुळे अखेर ब्रह्मनाथ शाळेचे समायोजन खळी जि.प. शाळेत करण्याचा निर्णय  झाला आहे. 

Web Title: Adjustment order of 'Zilla Parishad School' in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.