''अब की बार, पेट्रोल 'नव्वदी' पार'' परभणीत पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:18 PM2018-09-11T14:18:58+5:302018-09-11T14:23:07+5:30

परभणीमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली असून शहरात पेट्रोल ९०.१६ तर डीझेल ७८.०६ रुपये प्रती लिटर घ्यावे लागत आहे. 

"Ab ki Bar, petrol 'Navvadi' crosses'' parbhani', the price of petrol has reached high | ''अब की बार, पेट्रोल 'नव्वदी' पार'' परभणीत पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक

''अब की बार, पेट्रोल 'नव्वदी' पार'' परभणीत पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक

Next

औरंगाबाद/परभणी : देशभरात इंधन दराच्या वाढत्या दराने नागरिक त्रस्त आहेत. या विरोधात काल झालेल्या भारत बंद नंतरही आज पुन्हा पेट्रोलच्या दरात १४ ची तर डिझेलच्या दरांमध्येही १५ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे परभणीमध्येपेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली असून शहरात पेट्रोल ९०.१६ तर डीझेल ७८.०६ रुपये प्रती लिटर घ्यावे लागत आहे. 

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. परभणी जिल्ह्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर एवढे जास्त का? याचा आढावा घेतला असता तेलडेपोंचे अंतरच दरवाढीसाठी कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली.

परभणी जिल्ह्यात मनमाड आणि सोलापूर येथून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो. दोन्ही तेलडेपोंचे अंतर जिल्ह्यापासून साधारणत: ३०० कि.मी. पेक्षा अधिक आहे. इंधन पुरवठा करताना इंधनाच्या मूळ किंमतीमध्ये व्हॅट, राज्य शासनाचा कर आणि वाहतूक खर्च लावला जातो. मूळ किंमतीवर ३९.८ टक्के व्हॅट आणि २.४० रुपये प्रति लिटर प्रति किलोमीटर या प्रमाणे वाहतूक खर्च लावला जाते. ३०० कि.मी. अंतराच्या आत एकही तेलडेपो नसल्याने जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे भाव सर्वाधिक झाले आहेत. त्यामुळे तेलडेपोंचे अंतरच परभणी जिल्ह्याच्या मुळावर उठले आहे. देशभरात दरवाढीच्या झळा बसत असल्या तरी परभणीत त्याची तीव्रता अधिक आहे. यामुळे परभणीकर त्रस्त झाले आहेत. 

परभणीला मंजूर झाला होता तेलडेपो
राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता परभणी जिल्हा हा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने १५ वर्षांपूर्वी परभणी तालुक्यातील पेडगाव येथे तेलडेपो उभारण्यास मंजुरी मिळाली होती. मुंबईपासून ते परभणीपर्यंत पाईपलाईनद्वारे तेल पोहोचती करणे आणि परभणीतून इतर जिल्ह्यांना तेल पुरवठा करण्याचा हा प्रकल्प होता. परंतु राजकीय उदासिनतेमुळे हा प्रकल्प परभणीत होऊ शकला नाही. अखेर परभणी ऐवजी मनमाड येथे हा तेलडेपो उभारण्यात आला. 

बंदचा झाला नाही परिणाम

इंधन दरवाढीविरोधात काल काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली होती. या बंदला 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. या बंदला देशभरातून प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध केला. देशभरातील भारत बंदचा जोर पाहून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत सर्वसामान्य जनतेच्या त्रासाची आपल्याला कल्पना असल्याचं म्हटलं. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणं सरकारच्या हातात नसल्याचं म्हणत त्यांनी हात वर केले.
 

Web Title: "Ab ki Bar, petrol 'Navvadi' crosses'' parbhani', the price of petrol has reached high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.