792 proposals for 'Ramai Housing' in Pathri taluka | ‘ रमाई आवास’साठी पाथरी तालुक्यात ७९२ प्रस्ताव दाखल

पाथरी ( परभणी ): रमाई आवास घरकूल योजनेसाठी पाथरी तालुक्याला ५८४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ डिसेंबर अखेर यासाठी ७९२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाले असून, या प्रस्तावांची छाननी पंचायत समितीस्तरावर सुरू आहे.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावे तसेच त्यांच्या निवाºयाचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागात त्यांच्या स्वत:च्या जागेवर घरकूल बांधून देण्याची रमाई आवास योजना शासनाने सुरू केली आहे. यासाठी २०११ च्या जातनिहाय सर्वेक्षणानुसार प्राधान्यक्रम यादीच्या निकषाबाहेरील असावा, अशी अट यामध्ये ठेवण्यात आली असून, या अंतर्गत १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते़ पाथरी तालुक्यासाठी २०१७-१८ या वर्षात ५८४ घरकूल बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या अंतर्गत लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते़ या अंतर्गत ३१ डिसेंबर अखेर ७९२ लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे दाखल केले आहेत़ सध्या या प्रस्तावांची छाननी सुरू आहे़

इंदिरा आवासच्या याद्यांचीही छाननी
केंद्र शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत पूर्वी मागासवर्गीय कुटूंबियांना लाभ दिला जात होता़ रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर या सर्व प्रस्तावांची छाननी करताना इंदिरा आवास योजनेच्या पूर्वीच्या सर्व लाभार्थ्यांच्या यादीचीही छाननी करण्यात येत आहे़ रमाई आवास योजनेसाठी दाखल झालेल्या प्रस्तावांबाबत परभणी येथे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त यांच्या कार्यालयात ९ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अंमलबजावणीसाठी चर्चा होणार आहे़ यानंतर लाभार्थी निवडले जाणार आहेत़ ही प्रक्रिया पूर्ण करून धनादेश देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे़ 

सर्वाना लाभ मिळणार 
रमाई आवास योजनेसाठी दाखल झालेल्या प्रस्तावात पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढली तरी लाभ मिळणार आहे़ 
- ए.एफ. शेख, सहाय्यक गटविकास अधिकारी