परभणी जिल्ह्यात घरकुलांची ५४७ कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:16 PM2019-03-17T23:16:50+5:302019-03-17T23:17:16+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ५४७ घरकुलांची कामे सुरू असली तरी बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी उभा टाकल्या आहेत़ या शिवाय मजुरांना काम उपलब्ध होऊनही पुरेसा मोबदला मिळत नसल्याने रोहयोची कामे संथगतीने सुरू आहेत़

547 works of houses in Parbhani district | परभणी जिल्ह्यात घरकुलांची ५४७ कामे सुरू

परभणी जिल्ह्यात घरकुलांची ५४७ कामे सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ५४७ घरकुलांची कामे सुरू असली तरी बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी उभा टाकल्या आहेत़ या शिवाय मजुरांना काम उपलब्ध होऊनही पुरेसा मोबदला मिळत नसल्याने रोहयोची कामे संथगतीने सुरू आहेत़
जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागात शेतीची कामे शिल्लक नसल्याने मजुरांची उपासमार होत असून, कामाच्या शोधार्थ या मजुरांचे जिल्ह्याबाहेर स्थलांतर वाढले आहे़ अशा काळात गावातच काम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे़ मागेल त्याला काम देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविली जात असली तरी रोहयोकडे काम मागणाऱ्या मंजुरांची संख्याही मोठ्या प्रमाणात नसल्याने रोहयोची कामे संथगतीने सुरू आहेत़ रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात घरकुलांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे़ केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी रोहयोच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जात आहेत़ मागील आठवड्यात घरकुलाची ५४७ कामे जिल्हाभरात सुरू झाली़ या कामांवर मजुरांच्या हाताला काम मिळत असले तरी प्रत्यक्षात वाळूची मोठी अडचण ठरत आहे़ त्यामुळे काम उपलब्ध होऊनही वाळू अभावी बांधकाम ठप्प असल्याने मजुरांना त्यांचा अपेक्षित मोबदला पदरात पडत नाही़ परिणामी काम मिळूनही मजुरांची ओढाताण कायम आहे़ तेव्हा रोजगार हमी योजनेतून सुरू झालेल्या घरकुल योजनांच्या कामांवर वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे़
साडेपाच हजार मजुरांच्या हाताला काम
जिल्ह्यात मागील आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात आली आहेत़ जिल्ह्यात ८५२ कामे सुरू असून, या कामांवर ५ हजार ७६६ मजूर काम करीत आहेत़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आतापर्यंत २४५ कामे प्रगतीपथावर आहेत़ त्यामध्ये जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ५७ कामे प्रगतीपथावर असून, गंगाखेड तालुक्यात ३३, परभणी तालुक्यात ४१, मानवत १८, पालम ११, पाथरी २५, पूर्णा १४, सेलू २६ आणि सोनपेठ तालुक्यात २० कामे प्रगतीपथावर आहेत़ तसेच नव्याने काही कामे रोहयोच्या माध्यमातून उपलब्ध केली असून, त्यात जिंतूर तालुक्यामध्ये २६८, गंगाखेड १३८, परभणी १२९, सेलू ८६, पूर्णा ५६, पाथरी ५४, मानवत ३६, पालम ३२ आणि सोनपेठ तालुक्यात ५३ कामांना मंजुरी देण्यात आली आहे़
४जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता सुरू असलेली कामे आणि त्यावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या लक्षात घेता ही कामे अतिशय तोकडी आहेत़ ग्रामीण भागात कुठेही शेतीचे काम उपलब्ध नाही़ शहरी भागातही रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे़ ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन रोहयोची कामे पटीने वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़
परभणी जिल्ह्यात घरकुलांची सर्वाधिक कामे
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कामांना सुरूवात करण्यात आली आहे़ त्यामध्ये घरकुलांची सर्वाधिक ५४७ कामे सुरू असून, सिंचन विहिरींची १९७, तुती लागवडीची ६०, वृक्ष लागवडीचे २, शोष खड्डे तयार करण्याचे २०, ढाळीचे बांध उभारण्याचे १, फळबाग लागवडीचे १०, विहीर पुनर्भरणाचे ६ आणि रोपवाटिकेचे ९ कामे सुरू आहेत़
घरकुलाची सर्वाधिक २३७ कामे जिंतूर तालुक्यात सुरू असून, त्याखालोखाल गंगाखेड तालुक्यात १०९, सेलू तालुक्यात ८६, परभणी ३९, पाथरी २९, सोनपेठ ३३, पूर्णा ५५ आणि पालम तालुक्यात ९ कामे सुरू आहेत़ वृक्ष लागवडीची केवळ २ कामे गंगाखेड तालुक्यात सुरू असून, इतर तालुक्यात एकही काम सुरू नसल्याचे निदर्शनास येत आहे़ शोष खड्डे, ढाळीचे बांध, विहीर पुनर्भरण ही कामे केवळ गंगाखेड तालुक्यातच सुरू आहेत़
रोपवाटिकेची कामे केवळ जिंतूर आणि सेलू या दोनच तालुक्यांत आहेत़ तुती लागवडीची कामेही पाथरी, परभणी आणि पालम या तीनच तालुक्यांत सुरू आहेत़ त्यामुळे रोहयोच्या माध्यमातून कामांची संख्या वाढविण्यासाठी मोठा वाव असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़

Web Title: 547 works of houses in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.