कॉमनवेल्थमधलं तरुण रक्त

By प्रसाद लाड | Published: April 19, 2018 08:32 AM2018-04-19T08:32:15+5:302018-04-19T08:32:15+5:30

भारतातली क्रीडासंस्कृती आता बदलू लागली आहे, याचा पहिला प्रत्यय. 

young generation in commonwealth | कॉमनवेल्थमधलं तरुण रक्त

कॉमनवेल्थमधलं तरुण रक्त

Next

‘प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं...’
‘योग्य वयात गोष्टी घडल्या नाहीत ना तर पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येतील...’
ही वाक्यं तुमच्या प्रत्येकाच्याच घरात कधीना कधी बोलली-ऐकली गेली असतीलच. प्रत्येकाचे आई-बाबा किंवा नातेवाईक या वाक्यांचे बाण आपल्यावर सोडत असतात आणि आपण ‘हो.. हो.. माहितीये, खरंय ते ! मी घेईन काळजी’ अशी आश्वासनं देऊन त्या लेक्चरच्या समरप्रसंगातून आपली सुटका करून घेतो.
पण काही गोष्टी खरंच त्या त्या वयातच करायच्या असतात, खासकरून खेळाडूंसाठी वय हे फार महत्त्वाचं असतं. भारतातील क्रीडाक्षेत्रातील काही वरिष्ठ व्यक्तींना या गोष्टीचं महत्त्व पटलं आणि त्यामुळेच सध्या राष्ट्रकुल क्र ीडा स्पर्धेत भारताच्या पदक विजेत्यांमध्ये युवा खेळाडूंची संख्या लक्षणीय आहे.
अमेरिका आणि रशिया यांचं जागतिक क्रीडाक्षेत्रावर वर्चस्व होते. पण त्यांचं हे वर्चस्व मोडीत काढलं ते चीनने. गेल्या २-३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये चीनने अमेरिकेला मागे टाकलं आहे. आणि हीच क्रीडासंस्कृती आता भारतामध्येही रुजायला सुरुवात झाली आहे. नेमबाज अनिश भावन, मनू भाकेर अ‍ॅथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा, महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू, ही काही त्याच बदलत्या संस्कृतीची उदाहरणं आहेत.
भारताचे या पाच जणांसह आणखीही काही युवा तारे आता क्रीडाक्षेत्राच्या नभांगणात चमकायला लागले आहेत. हे युवा खेळाडू नव्या युगाची आशा आहेत, त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये भारतीयांना या युवा खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा असतील. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आता ऑलिम्पिकमध्ये हे युवा खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

अनिश भावन : वय वर्ष १५
आधी कॉमनवेल्थमध्ये ‘गोल्ड’ आता दहावीची परीक्षा देणार!

दहावीची परीक्षा तोंडावर आली होती. परीक्षा द्यायची की राष्ट्रकुल स्पर्धा खेळायची, हा यक्ष प्रश्न अनिशच्या समोर होता. दहावीची परीक्षा यापुढे कधीही देऊ शकतो; पण राष्ट्रकुल स्पर्धेची संधी गमवायची नाही, हे अनिशने ठरवलं. यापूर्वी त्याचं नाव कधीही प्रकाशझोतात आलं नव्हतं.
१९९८मध्ये अभिनव बिंद्रा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यावेळी अभिनवचं वय १५ इतकं होतं. भारताकडून सर्वात कमी वयात राष्ट्रकुलमध्ये सहभागी होण्याचा मान तेव्हापासून अभिनवच्या नावावर होता. तो यंदा अनिशनं मोडला. इतकंच नव्हे, तर सर्वात कमी वयात राष्ट्रकुलमध्ये भारताकडून सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचा विक्र मही अनिशनं त्याच्या नावावर केला.
काही दिवसांपूर्वीच नेमबाज मनू भाकरनं १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. मनूचा हा विक्र मदेखील आता अनिशच्या नावावर जमा झाला आहे. भारतीय नेमबाजीचं भविष्य उज्ज्वल असल्याचं अनिशनं दाखवून दिलं आहे.
आता भारतात आल्यावर अनिश दहावीची परीक्षा देणार आहे.


मनू भाकेर : वय वर्ष १६

धोक्याच्या वर्षातच कॉमनवेल्थमध्ये गोल्ड

लहानपणापासून मनूला बॉक्सिंग, टेनिस, स्केटिंग, कराटे या खेळांचे वेड होतं. प्रत्येक खेळात तिची कामगिरी उल्लेखनीय होती. पण फक्त एकाच खेळात कारकीर्र्द घडवण्याचा सल्ला तिला कुटुंबीयांनी दिला. त्यावेळी तिने नेमबाजीची निवड केली आणि साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण कुटुंबीयांना मनूवर विश्वास होता. तिच्या बाबांनी तब्बल दीड लाख रु पये मनूच्या नेमबाजीवर खर्च केले आणि मनूनेही त्यांना निराश केलं नाही. कारण या वर्षी झालेल्या नेमबाजीच्या विश्वचषकात तिने दोन सुवर्णपदकं पटकावली आणि मनू नावाचा जयघोष भारतामध्ये सुरू झाला. कारण नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदक पटकावणारी ती भारताची सर्वात युवा खेळाडू ठरली.
सोळावं वर्ष धोक्याचं म्हटलं जातं; पण याच सोळाव्या वर्षी तिने जग जिंकलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनूने भारताची अनुभवी नेमबाज हीना सिद्धू हिला मात देत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
....................................................

नीरज चोप्रा :वय वर्ष २०

..आला आणि थेट वर्ल्ड रेकॉर्डच!

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला पदक मिळेल, ही आशा बºयाच जणांनी सोडली होती. पण त्यांची ही आशा पल्लवित केली आहे ती भालाफेकपटू नीरज चोप्राने. कनिष्ठ विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी नीरज २०१६ साली पोलंडला गेला तेव्हा त्याचं नाव बºयाच जणांना माहितीही नव्हतं. पण या स्पर्धेत त्याने फक्त सुवर्णपदकच पटकावलं नाही विश्वविक्र मालाही गवसणी घातली.
त्यानंतर नीरज चर्चेत आला.
त्याच वर्षी दक्षिण आशियाई खेळांमध्येही नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली. भुवनेश्वरला २०१७ साली झालेल्या आशियाई स्पर्धेतही नीरजने सोनेरी कामिगरी केली.
नीरजसाठी राष्ट्रकुल ही मोठी स्पर्धा होती. पण या स्पर्धेचं दडपण त्याने घेतलं नाही आणि आपला सुवर्णपदकांचा धडाका येथेही कायम ठेवला.

राहुल आवारे : वय वर्ष २६

मराठी मातीचा डंका

महाराष्ट्रातल्या मातीतला गुणवान मल्ल, अशी राहुलची ओळख आहे. राहुलला कुस्तीचं बाळकडू त्याच्या वडिलांकडूनच मिळालं. राहुलचे बाबा बाळासाहेब हे नामांकित कुस्तीपटू होते. जत्रेमध्ये होणाºया कुस्तींच्या दंगलीतील त्याच्या बाबांचं नाव आघाडीवर होतं. राहुलच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह त्यांच्या कुस्तीवरच चालायचा. राहुल लहानपणापासून त्यांच्याबरोबर जात होता. राहुलने जत्रांमधील कुस्त्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली. पण तो तिथपर्यंत थांबला नाही. त्यानंतर त्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावलं.
हरिश्चंद्र बिराजदार यांच्या तालमीत राहुल घडत गेला. पाचवेळा त्याने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. २००८-०९ या कालावधीमध्ये राहुलने तब्बल तीन आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली. पण तरीही त्याला ऑलिम्पिकसाठी मात्र पाठवलं गेलं नाही. तो राजकारणाचा बळी ठरला. राष्ट्रीय स्तरावर झालेलं राजकारण राहुलच्या कारकिर्दीला मारक ठरलं.
पण आता जेव्हा त्याला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पाठवलं गेलं, तेव्हा त्या संधीचं त्याने सोनं केलं. आता यापुढे आॅलिम्पिक पदक पटकावण्याची इच्छा राहुलने बोलून दाखवली आहे.
 

मीराबाई चानू : वय वर्ष २३

निराशा झटकून थेट सुवर्णपदकाची कमाई

मीराबाई ही मणिपूरची. इम्फाळपासून जवळपास २०० किलोमीटर लांब तिचं गाव. कुंजुराणी ही त्यावेळी वेटलिफ्टिंगमध्ये भन्नाट फॉर्मात होती. मीराबाईने कुंजुराणीला प्रेरणास्थानी ठेवलं. त्यावेळी याच खेळात कारकीर्द घडवायचं तिने ठरवलं. गावात कोणतीही खेळाची साधनं नव्हती. घरची परिस्थितीही बेताचीच; पण काही करून वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्र्द घडवायची, हे तिने मनाशी पक्क केलं होतं.
वयाच्या १३व्या वर्षी मीराबाई घरापासून जवळपास ६० किलोमीटर लांब असलेल्या खुमान क्र ीडा संकुलात सराव करायला लागली. २०११ साली तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पदकं पटकावली आणि आपली दखल घ्यायला तिने भाग पाडलं.
२०१३ साली ती वेटलिफ्टिंगमध्ये देशातील सर्वोत्तम खेळाडू होती. २०१४ साली झालेल्या ग्लासगो येथील राष्ट्रकुल खेळीत तिने रौप्यपदक पटकावलं. त्यावेळी २०१६ साली होणाºया रिओ आॅलिम्पिकमध्ये मीराबाई देशाला पदक जिंकवून देणार, अशी शाश्वती काही जाणकारांना वाटत होती. पण या स्पर्धेत ती सपशेल अपयशी ठरली. त्यानंतर ती निराशेच्या गर्तेत अडकली होती. मानसोपचारतज्ज्ञांना तिच्यावर उपचार करण्यासाठी बोलवावं लागले. काही दिवसांमध्ये तिने निराशा झटकली आणि पुन्हा एकदा सुवर्णपदकाच्या ईर्षेने सरावाला लागली.

२०१७ साली झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने तब्बल २२ वर्षांनी या मानाच्या स्पर्धेत पदक पटकावलं होते. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरीने १९९४ आणि १९९५ साली विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.
राष्ट्रकुलसाठी गोल्ड कोस्टमध्ये दाखल झाल्यावरही मीराबाई सुवर्णपदक जिंकेल, असं बºयाच जणांना वाटलं नव्हतं. पण गुणवत्ता, अथक मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर मीराबाईने सुवर्णपदकाला गवसणी घातली.


 

Web Title: young generation in commonwealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.