Wow शाबास ! असं कधी म्हणा तर खरं स्वत:लाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 03:13 PM2017-09-06T15:13:14+5:302017-09-07T07:10:40+5:30

माझ्याच वाट्याला हे का म्हणून आपण कुढतो. इतरांचं चांगलं चाललेलं पाहून जळफळतो. पण आपल्या वाट्याला जो आनंद येतो, तो नोटीस करतो कधी? बरंच चांगलं काही घडतं आपल्या आयुष्यात, त्या गोष्टींचं अप्रूप वाटतं आपल्याला, आपल्या जिवाभावाची माणसं आपल्यासोबत असतात त्याचं मोल करतो आपण? मनाची कवाडं उघडून जिंदगीला थॅँक्स म्हणतो कधी? - विचारा स्वत:ला...

Wow! If you say so, in fact the bribe itself! | Wow शाबास ! असं कधी म्हणा तर खरं स्वत:लाच !

Wow शाबास ! असं कधी म्हणा तर खरं स्वत:लाच !

Next

- प्राची पाठक

स्वत:बद्दल ‘वॉव’ वाटलेय कधी?
अरे, ही किती छान गोष्ट माझ्या आयुष्यात घडली असं वाटतं कधी?
माझं एखादं लहानसं काम किती सहज पूर्ण केलं मीच, ही टिकमार्क.
मला आवडते म्हणून मीही गोष्ट अशी सजवली घरात, अशी भावना.
स्वत:साठी एक छान डिश बनवली.
इतक्या धावपळीत आपण स्वत:साठी वेळ काढू शकतो, काही छान काम करतो याबद्दल कधी भारी वाटतं का? ज्याला आपण ‘वॉव फिलिंग’ म्हणतो असं कधी स्वत:विषयीच वाटतं का? अशा अनेक लहान-मोठ्या स्वकष्टाच्या आनंदाच्या वॉव फिलिंग्ज असतात, त्या आपल्याला जाणवतात का?
असं एकदम मस्त वाटतं का स्वत:विषयी कधी?
असं वाटतं का कधी?
आपल्या आजूबाजूचा परिसर बघायचा. रस्त्याने जाताना अचानक पारिजातकाच्या फुलांचा घमघमाट वाºयासोबत वाहून येतो आपल्याकडे. तेव्हा तिथंच उभं राहून एक खोल श्वास घेऊन त्या वाºयाला, त्या झाडाला, त्या फुलांना आणि फुलांच्या सुगंधाला वॉव म्हणालोय आपण कधी? हा सुगंध आपल्यालाच का मिळाला, आपल्यालाच का समजला, आपणच का तो सुवास अनुभवत पाच- दहा मीनिट इथे उभं राहू शकलो, असं मनात आलंय कधी? जरा काही वाईट घडलं आयुष्यात की, ‘माझ्याच वाट्याला हे का येतं’ असं मनात येतं. त्या भावनेला आपण मन पोखरू देतो. पण माझ्याच वाटेला इतका छान सुगंध कसा आला, याबद्दल कृतज्ञता कधीच वाटू नये?
आपल्या आजूबाजूचे सगळेच उत्तम शिकतात, मोठाल्या पॅकेजेसवर काम करतात, पटापट जॉब बदलतात, फॉरेन ट्रिप्स करतात, मोठाली घरे घेतात, त्यांचं आयुष्य कसं सुखात सुरू आहे, असंच आपल्याला वरचेवर वाटत असतं. कोणी स्वत:च्या आयुष्याबद्दल जरा कुरकुर केली की आपल्याला ते सगळे जाणून घ्यायचं असतं. आपल्याला हा त्रास नाही; पण त्याला/तिला आहे, याबद्दल मन अगदी सुखावत नसलं तरी ‘कसं ना बाबा हे दु:ख?’ अशा माहितीचे साठे आपल्या मनात भरून ठेवायची एक सवय आपल्याला लागलेली असते. हे साठे तुडुंब भरले की आपण ते पास आॅन करत राहतो. सगळा वेळ दुसºयाच्या पॅकेजवर. आपल्या आयुष्यात काही छोटंमोठं मस्त घडलं तर त्याला आपण पुरेसे स्वीकारत नाही की, नोटीसही करत नाही. त्या मस्त घडण्याचं आपल्याला फारसं काहीच वाटत नाही.
एखादी गाडी एखाद्या वेळी खूप उशिरा येते. बºयाच वेळी थोडीफार उशिरा येते, असेही समजू. पण अनेकदा आपल्याला हवी ती गाडी अगदी वेळेवरदेखील येतेच ना? गाडीने वेळेवर येणं अपेक्षितच असतं केव्हाही. परंतु, अशा अनेक प्रसंगात जेव्हा गाडी वेळेवर असते, त्यांची आपण दखलदेखील घेत नाही, हा खरा मुद्दा आहे. आपल्याला एखाद्या दिवशी महत्त्वाच्या कामाला जायचं आहे आणि गाडी पकडायला थोडा उशीर होतोय. अशावेळी गाडीचं ते उशिरा येणंदेखील मोजून आपण धावत पळत ती गाडी गाठतो. केवळ गाडी उशिरा येते म्हणून आपल्याला ती मिळते. त्यावेळी ती उशिरा आली याचाच आपल्याला कोण आनंद होतो. म्हणजे सगळं जगच आपण आपल्याच सोयीनुसार बघत असतो. आपण लेट होऊनदेखील गाडी मिळाली, तर स्वत:च्या हुशारीवर खुश असतो आणि आपण वेळेवर आणि गाडी उशिरा आली तर मात्र चिडचिड करतो. दोष देतो. असा हा सगळा मामला.
एखाद्या व्यक्तीबद्दल आपण सतत कुरकुरत असतो. याने/हिने असं तसं केलं तर मी खुश होईन. तर माझं चांगलं होईल. तर मला बरं वाटेल. प्रसंगानुरूप आणि दोन व्यक्तींमधल्या नात्यानुसार यात अनेक पैलू येऊ शकतील. पण समोरची व्यक्ती सदोदित वाईटच वागते आहे, त्रासच देते आहे, हे सगळ्याच प्रसंगात खरे असेल की नाही, याचा विचारदेखील आपण करत नाही. आपण सर्वच वेळी कायमच शंभर टक्के बरोबर कसं काय असू शकतो, असतो का, असा विचार करणं तर दूरच. त्यामुळे, समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी जेव्हा काही खूप छान केलेलं असतं, त्याला आपण क्रे डिट देण्यात, त्याबद्दल कौतुक करण्यात काहीच चूक नसतं. पण ते आपण करत नाही. एखादी छान गोष्टदेखील घडते की आपल्या आयुष्यात; पण त्याबद्दल आपण कृतज्ञ नसतो, तसं असावं यासाठी आपल्या मनात कोणतंच दार उघडं नसतं.
उघडा की मनाचं दार
आपल्या आजूबाजूच्या, आपल्या कोणत्या तरी गोष्टीबद्दल मनापासून ‘वॉव’ म्हणावंसं वाटणं, कृतज्ञता वाटणं ही आपल्याच आयुष्यातल्या अनेक निगेटिव्हीटीज्ना हाताळण्यासाठी बळ देणारी गोष्ट असते.
‘इतकं काही वाईट नाही यार जग’, अशी आश्वासक भावना असते ही. ही वॉव फिलिंग म्हणजे आहे त्यात सुख मानणं नाही. कशातही आणि कशालाही छान छान म्हणणंदेखील नाही. उलट आपल्या दैनंदिन कचकचीतदेखील काहीतरी मस्त घडतंय, अनुभवता येताहेत, फार छान काही क्षण आपल्या वाट्याला येणं हे समजणं आहे. ते समजून अनुभवणं आहे हेच ते छान वॉव फिलिंग. आपल्याबाबत काहीतरी छान होतंय आणि त्याबद्दल आपण मनापासून आनंदी असणं म्हणजे हे वॉव फिलिंग.
ही भावना आपल्याला अधिक आशादायी, उत्साही, आनंदी बनवते. निगेटिव्ह विचार सोडून पॉझिटिव्ह विचारांची गुंफण करते.
शोधा बरं, सापडते का तुमच्या आयुष्यात ही वॉव फिलिंग? करा तिची एक यादी.
 

Web Title: Wow! If you say so, in fact the bribe itself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.