- श्रेणिक नरदे

घरच्या देवाला कधी पाया न पडणारा गडी, तिला भेटायला म्हणून देवाचा भक्त झाला. कुठंही जगात भेटायचं म्हटलं की कोणतरी शंभर टक्के ओळखीतलं तिसरं त्या ठिकाणी दुर्दैवानं असतंयच. म्हणून मग हा देवळात खिडकीबाहेर उभं राहायचा आणि ती आत. तिथं पण खच्चून चारपाच मिन्टाचीच भेट व्हायची. हा जवळ जाऊन हात धरायला लागला की ती लाल व्हायची आणि पळून जायची. आणि हा तिथंच बसून राहायचा. ही अशी लव्हस्टोेरी. ...गावाकडं अनेकांची अस्ती!!  

प्रेम ते काय नसतंय, सगळ्या मनाच्या समजुती हायीत, गरज संपली की प्रेम संपतंय, नंतर नंतर प्रेमाचा कटाळा येतोय. पण प्रेमात पडलेला नवीन गडी जमीन सोडून चारदोन फूट हवेतून चालत असतो. ती हवा बॉलिवूड शिनमातल्या गुलाबी हवेसारखी वाट्ती!
जग सगळं याच्याकडे भुताटकी झालीय अशा नजरेनं बघतं. 
पण हा त्याच्याच तालात धुंद असतो...
एका अशाच दोस्ताचं प्रेम. 
हा कॉलेजच्या शेवट वर्षाला होता. गडी मुलकाचा आळशी, पण बोलण्यात चारसोबीस. कपड्याचा ताळमेळ कशाला कशाचा नसायचा. अशी याची लाइफ सुखात आळसात मस्त चाललीती. 
प्रेम वगैरे गोष्टींपासून धा हात लांब असायचा. मैत्रिणी बक्कळ होत्या, पण सगळ्या एंगेज होत्या. गावातल्या पोरीकडं बघितलं तरी गावात लगेच चर्चा व्हायच्या आणि विषय हार्ड व्हायचा.
म्हणून काही पोरं ही आयुष्यभर सरळमार्गी राहत्यात. 
कॉलेज संपत आलं तरी आपलं जुळलं नाही मग आपण काय कॉलेजलाइफ जगलो? अशी प्रश्नं आयुष्यभर पडत राहतात. 


माणसाला कायम भूतकाळात डोकवायची सवय अस्ती. एकांतात राहिलं की भूतकाळात कधी मन जातं कळतसुद्धा नाही. मग तेव्हा असं करायला हवं होतं, मग असं झालं असतं असं बिनकामाचं स्वप्नरंजन होऊन मन फस्ट्रेट होतं. 
याला बऱ्याचदा वाटायचं आपणसुद्धा प्रेमात पडावं. आपली पण एक गर्लफ्रेंड असावी. सगळं तिच्याबरोबर शेअर करता यावं. आता ऐकायला तर कुणाकडे सवड असते? 
अशा सगळ्यात कॉलेजच्या सुरुवातीच्या दोन तीन दिवसानंतर ती उगवली. ती बसायची तिथंच कुठतरी हा बसायचा. बडबड्या स्वभावामुळं तिनं आपल्याकडं बघावं म्हणून हा काहीही बडबडत राहायचा. कधीतर ती मागं वळून बघायची. 
पहिल्या दिवशीच ती बोलली. ओळख झाली. 
सोशल मीडियाच्या मोबाइल जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप फॉर्म होतो. तसाच यांचाही झाला. तिथून गड्यानंं तिचा नंबर मिळवला. बोर्डाच्या परीक्षेत नंबर मिळण्यापेक्षा मोबाइल नंबर मिळायची खुशी वेगळी असते. पूर्वीच्या जमान्यातल्या आशिक लोकांनी ‘तू भेटलीस तेव्हा खूप काही सांगायच होतं, मन थोडं बोलत होतं, खूप काही लपवत होतं’ ..असा सगळा कुट्टाण्णा केलंला! 
आता ते बदललं. 
व्हाट्सपवर सांगता येतंय लपवलेलं काही. 
च्याटिंग वाढत होतं, ती कॉलेज अधेमधे चुकवायची, याची नजर दाराकडे लागलेली असायची, कुणीही आली की तीच आल्याचा भास व्हायचा. ती यायची नाही तेव्हा हा एक लेक्चर करून सटकायचा. 
पोराला एखादी पोरगी आपल्यासाठी झुरते हे कळायला अखंड आयुष्य जातंय पण पोरींना कोण मागावर हाय हे लगेच कळतं. 
तिला जाणवलं, तिने उलटतपासणी चालू केली.
मग याने पण कबुली दिली. आवडतीस... 
ती नॉय नॉय नॉय म्हणायची. हा मनवायचा. हे सुरू राहिलं. 
एक दिवस जरा भांडण झालं. आणि तिचा पहिला फोन आला तो पण रडत रडत!
‘आयुष्यात मला असं कुणी नाही बोललं’ म्हटली आणि फोन बंद केला. 
सगळीकडूनं ब्लॉक केलं. अशावेळी मित्रमैत्रिणीच धावतात. हे जाम घाबरलं होतं. त्यातच प्रेमात पहिला रडका कॉल. मित्रमैत्रिणीने आधार दिला म्हणून हा वाचला. 
तिनं पण नॉय नॉय करत ब्लॉक काढला. 
परत सगळं लेवल झालं. 
चोरून भेटीगाठी व्हायल्या. 
कुणीतरी बघतंय म्हणून ती दहा मिन्टातच सटकायची. 
हा तिचं जाणं बघत बसायचा.
ती सोडून आख्खी प्रिथ्वी ब्लर झालेली दिसायची. 
हजारदा कुणी ओरडून सांगितलं तरी ऐकणार नसलेला हा तिच्या एका बोलण्यावर जीमला पळायला लागला, वेळच्या वेळी कामं करायला लागला, अपडेटेड जगणं चालू झालं. 
इतरवेळी याला प्रश्न पडायचा हे प्रेमात पडलेले येडे लोकं एवढा वेळ फोनवर काय बोलत असतील? 
त्या प्रश्नांची उत्तरं आता सापडायला लागलीती, कॉलेजमध्ये चारचौघात भेट रोज झाली तरी पाहिजे ते बोलता येत नही. 
चोरून भेटायचं तर कॉलेजबाहेर, तिथं गाव सगळं वळखीचं. एकदा हा भेटायला गेला, तिनं ठिकाण ठरवलंतं. हा तिची वाट बघत बसला. ती येत होती, जवळ आली आणि पुढं तसंच न बोलता निघून गेली. याला वाटलं काहीतरी झालं असणार. मग पुढं जाऊन तिला विचारलं तर घरच्या शेजाऱ्याने बघिटलंतं. योगायोगानं तो याचा मित्र निघला. 
तिथून आल्यावर ती फोन करून परत रडायली, आता सगळं घरात कळतंय म्हणून. 
यालापण तेवढीच भीती वाटली. त्या शेजाऱ्याला यानं गाठलं आणि ‘तिच्याबरोबर माझी सेटिंग करून दे की’ म्हणून त्याच्या मागं लागला. 
ते पण घाबरलं. ‘मी नही जा’ म्हणटला. मग याला बरं वाटलं. 
त्याला कायच माहिती नाही हे कळल्यावर याच्या जिवाला चैन पडली. तिला सांगिटल्यावर तिला पण बरं वाटलं. प्रेम पवित्र वगैरे लोकं म्हणत्यात पण आपण एकटं हिंडताना कोण काळं कुत्रं आपल्याकडं बघत नही. पण एक पोरगी बरोबर असली की सगळ्यांच्या नजरा आपल्याकडं लागतात. कधीकधी वाटतंय जगात कोणच नसावं दोघांशिवाय. त्याला वाटायचं.
घरच्या देवाला कधी पाया न पडणारा गडी, तिला भेटायला म्हणून देवाचा भक्त झाला. कुठंही जगात भेटायचं म्हणटलं की कोणतरी शंभर टक्के ओळखीतलं तिसरं त्या ठिकाणी दुर्दैवानं असतंयच. म्हणून मग हा देवळात खिडकीबाहेर उभं राहायचा आणि ती आत. तिथं पण खच्चून चारपाच मिन्टाचीच भेट व्हायची. हा जवळ जाऊन हात धरायला लागला की ती लाल व्हायची आणि पळून जायची आणि हा तिथंच बसून राहायचा.
ही अशी लव्हस्टोेरी. 
गावाकडं अनेकांची असते.
त्यांची दोघांची अशीच. 
पण त्यांचंही तेच झालं. जे बाकीच्यांचं.
प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हायची वेळ येत्या तेव्हा रीतीरिवाज असलेल्या जातिधर्माच्या भिंती आडव्या येतातच. 
आल्याच.
या दोघांच्या धर्मजाती निराळ्या, प्रेमाची गाडी जोरात पळत असताना अचानक असले फाटक येतात. 
मोठ्या शहरात कुण्णाची कुण्णाला खबरबात नसते, गावात घरातलं लष्टक घरच्या अगोदर बाहेरच्या लोकांना कळतंय. त्याच त्याच धर्मजातीच्या अभिमानी भिंती मग त्यांना लांब लांब करतात..
आता मात्र त्या दोघांना..
त्यांच्यासारख्या अनेक दोघांना या भिंती ओलांडून जवळ यायचं आहे कायमचं...

( श्रेणिक फेसबुकवर अत्यंत प्रसिद्ध असलेला तरुण लेखक आहे आणि शेतकरीही आहे.)shreniknaradesn41@gmail.com