कष्ट मागणार्‍या, परीक्षा पाहणार्‍या आणि तरीही वेडी चटक लावणार्‍या जगात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 07:00 AM2019-01-17T07:00:00+5:302019-01-17T07:00:02+5:30

भल्या सकाळी कुणी रस्त्यांवर पळतंय, कुणी सायकलवर मांड ठोकून निसर्गाच्या कुशीत शिरतंय, कुणी बाइकवर बसून वार्‍याशी स्पर्धा करतंय, कुणी जिममध्ये जाऊन घाम गाळतंय, कुणी जंगलात जाऊन आडवाटेच्या डोंगररांगा तुडवतंय, तर कुणी ‘स्व’च्या शोधात एकटंच प्रवासाला निघतंय. कुणी पायाला दोर बांधून उंच कडय़ावरून स्वतर्‍ला फेकून देताना झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेतंय, कुणी पाण्याखाली जाऊन तिथल्या नव्या जगाचा शोध घेतंय, रक्त गोठवणार्‍या थंडीत बर्फाची शिखरं कुणी पादाक्रांत करतंय, तर कुणी एखाद्या बॉलमध्ये स्वत: ला कोंडून कडय़ावरून ढकलून देतंय स्वत: ला..

why youth is going crazy for adventure & sports? | कष्ट मागणार्‍या, परीक्षा पाहणार्‍या आणि तरीही वेडी चटक लावणार्‍या जगात..

कष्ट मागणार्‍या, परीक्षा पाहणार्‍या आणि तरीही वेडी चटक लावणार्‍या जगात..

Next
ठळक मुद्देनेमकं काय आहे हे नवं जग? साहसांचं, खेळांचं, पॅशनचं आणि त्यानुसार बदलणार्‍या मानसिकतेचंही. तेच सांगणारा हा विशेष अंक..

 समीर मराठे

कल किसने देखा है?
- जो भी करना है, आज, अभी, इसी वक्त. तरुणाईचा हा पॉप्युलर फंडा. 
आयुष्य पार बदलून टाकणारा लाइफ चेंजिंग एक्स्पेरिअन्स त्यांना कायमच हवाहवासा वाटत असतो. त्या अनुभवासाठी ते आसुसले असतात. त्या शोधातच ते असतात. त्यातून एकदा का आपली पॅशन, आवड सापडली की मग त्यासाठी अक्षरश:   काहीही करायची तारुणाईची तयारी असते.
त्यांची हीच जिद्द मग वेगवेगळ्या साहसांचा पाठलाग सुरू करते. हे पॅशनच त्यांच्या जगण्याचं आणि अनेकदा साहसी खेळांचंही कारण बनतं.
सचिन तेंडुलकर नेहमी म्हणतो, भारत हा खेळांवर प्रेम करणार्‍या माणसांचा देश आहे, खेळणार्‍यांचा नव्हे! मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र बदलायला लागलं आहे. तरुण मुलांच्या जगात फिटनेस हा शब्द परवलीचा बनत चालला आहे आणि त्याचाच हात धरून आलेले काही खेळ त्यांच्या आयुष्याचा भाग बनू लागले आहेत.
त्यातले काही खेळ असे आहेत, ज्यात स्पर्धा नाही, चढाओढ नाही, मात्र जिंकण्याची तुफान नशा आहे. एकेकटय़ानं खेळायचे हे खेळ असले तरी ते खेळणं सामूहिक आहे. त्या समूहाची ऊर्जा अनेकांना आपलाच नव्यानं शोध घ्यायला भाग पाडते आहे. बघा आपल्या अवतीभोवती. तेच दिसेल तुम्हाला!
‘डर के आगे जित है’, हे आता नुसतं घोषवाक्य राहिलेलं नाही, एखाद्या जाहिरातीतलं पोकळ वाक्यही उरलेलं नाही तर भीतीवर स्वार होण्याची, अनाम भीतीपल्याडच्या आनंदाचा आस्वाद घेण्याची आणि त्यासाठी काहीही, अगदी काहीही करण्याची क्रेझ बनली आहे.
तशीही साहसाला कुठलीच मर्यादा नाही, ना वेळेची, ना वयाची! दुनियेला आग लागो, नाहीतर जगबुडी होवो, मला जे करायचंय ते मी करणारच ही जिद्द जेव्हा मनाच्या कप्प्यात खोलवर जाऊन रुजते त्यावेळी माणसं झडझडून उठतात आणि स्वतर्‍चीच परीक्षा पाहत शारीरिक ताकदीच्या मर्यादेवर मात करत सुटतात.
सध्या अनेक तरुण हेच करताना दिसताहेत. 
जे काही आयुष्य उपभोगायचंय ते आत्ताच, या हव्यासानं तरुणाईला झपाटलंय. तो झपाटा त्यांना घाम गाळायलाही भाग पाडतो आहे.
अनेकजण स्वतर्‍लाच चॅलेंज करताहेत, ते  चॅलेंज स्वीकारण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची त्यांची खुमखुमी वाढते आहे. आपल्या ताकदीपलीकडे स्वतर्‍ला ‘पुश’ करणं अक्षरशर्‍ ढकलून देणं सुरू झालेलं आहे.
नेमकं आहे काय हे सारं, याचाच शोध घेणारा आणि थेट साहसी खेळांसह मैदानावरच घेऊन जाणारा हा विशेष अंक. 
ही आहे एका नव्या वेडाची चटक. 
ते वेड खेळांचं आहे, पळण्याचं आहे, साहसाचं आहे आणि स्वतर्‍लाच ‘टेस्ट’ करून पाहण्याचंही आहे. 
जिद्द, पॅशन, कमिटमेन्ट, डेडिकेशन, डिव्होशन आणि रिस्क. एरवी सतत वापरले जाणारे हे शब्द, व्यसन लागल्यासारखं तरुणाईच्या रोजच्या आयुष्यात जादू भरत आहेत.
ही जादू कष्ट मागते, घाम गाळायला लावते आणि परीक्षाही पाहते; पण या जादूची चटकच अशी की तिचे दीवाने न चुकता त्या जगात शिरतात आणि त्या जादूनं रंगून जातात.  
या जगात मॅरेथॉन रंगतात, मैलोनमैल सायकलिंग चालतं, बाइक रायडिंग, ट्रेकिंग. यासारखे खेळ तर हजारोंना भुरळ घालताहेत.
नेमकं काय आहे हे नवं जग? साहसांचं, खेळांचं, पॅशनचं आणि त्यानुसार बदलणार्‍या मानसिकतेचंही.
तेच सांगणारा हा विशेष अंक..
हा अंक वाचल्यावर, आळस सोडून आपणही काहीतरी करावं, झडझडून धावावं स्वप्नांच्या मागे , असं जर तुम्हाला वाटलं तर समजा, या नव्या ‘जादूनं’ आपल्यावरही गारुड केलंय..

 

sameer.marathe@lokmat.com
(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्त संपादक आहेत.)

Web Title: why youth is going crazy for adventure & sports?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.