‘सेल्फी’ हा शब्द दोनच वर्षांपूर्वी माणसांच्या आयुष्यात झंझावातासारखा घुसला होता. आणि फक्त दोनच वर्षात तो जुनाही झाला.

नुस्ता सेल्फीच नाही, तर ‘सेल्फी’ काढणार्‍यांची मानसिकताही दोन वर्षांतच बदलली. खरं तर आपल्याकडे आत्ता कुठं लोकांच्या हाती स्मार्टफोन येऊ लागले आहेत. इतके दिवस जे फोन होते, त्याला कॅमेरा होता. मात्र, त्या कॅमेर्‍यानं इतरांचेच फोटो काढण्याचा सोर्स जास्त. त्याआधी आपल्याकडे डिजिटल कॅमेरे आले, त्याचंही तेच. म्हणजे इतरांचेच फोटो आणि निसर्गचित्र टिपण्यासाठीच त्याचा उपयोग. आपला फोटो कधी काढायचाच असेल, तर दुसर्‍याला सांगावं लागायचं, प्लीज जरा एक फोटो क्लिक करा ना.
मग आपला ऑकवर्डनेस, फोटो काढून घेण्याची लाज वाटणं, कसाबसा एखादाच फोटो निघणं हे सारं त्या फोटोतल्या चेहर्‍यावरही वाचता येत असे. 
आता मात्र, या सार्‍या कालबाह्य जुनाट गोष्टी असाव्यात असं वाटावं इतक्या वेगानं काळ बदलला आणि हाती स्मार्टफोन आले. ज्याला फ्रण्ट कॅमेरा असतो. त्या कॅमेर्‍यानं कुणीही दुसर्‍या कुणाच्या मदतीशिवाय स्वत:चाच फोटो काढू शकतो.
हा स्वत:नेच स्वत:चा काढलेला फोटो म्हणजे ‘सेल्फी’. त्याची लाट जगभर आली. जो तो आपापलाच फोटो काढून तो इतरांना दाखवण्यासाठी फेसबुकवर टाकू लागला.
मात्र, ही लाट जितकी वेगानं आली तितक्याच वेगानं फुटलीपण! 
कारण आता माणसांना आपले एकट्याचेच फोटो काढण्यात काही फार मज्जा वाटेनाशी झाली, कुणासोबत तरी फोटो पाहिजे असा एक वेगळाच ट्रेण्ड सुरू झाला. आणि कुणासोबत तरी म्हणजे जीवंत माणसांसोबतच नाही तर अगदी प्राणी-पक्षी-निर्जिव वस्तू यापैकी कशाच्या तरी सोबत माणसं फोटो काढून टाकू लागली.
त्यातही आघाडीवर आहेत ‘ग्रुपी’. खरं तर या ग्रुपीनेच सेल्फीची सद्दी संपवून टाकली. सेल्फी तर काय कुणीही काढेल, तुमचे ग्रुपी अर्थात ग्रुप फोटो किती शेअर होतात, तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या ग्रुपबरोबर असता, किती हॅपनिंग आयुष्य जगता यावर अनेकांची सोशल नेटवर्किंगवरची शान ठरू लागली. आणि म्हणूनच मोठमोठय़ा ग्रुपचे, त्यात टिंबाएवढय़ा दिसणार्‍या चेहर्‍यांचे फोटो टाइमलाइनवर झळकू लागले.
पण, तरुण मुलांचं काही तरी फॅड एवढय़ापुरताच या ट्रेण्डचा परीघ र्मयादित नाही. त्याच्या पोटात एक वेगळी मानसिकताही आहेच.
ती आहे जगणं सेलिब्रेट करण्याची, एकत्र येऊन आपण जास्त उत्साही जगू शकतो या भावनेची! आणि तिच्या पोटात असलेल्या असुरक्षिततेचीही. एकटेपणा आणि एकाकीपणा याची भीती मनात कुठं तरी खोल असावी, आणि आपण एकटे नाही हे जगाला सांगण्याचा आटापिटा सुरू असावा असं वाटावं इतका या ग्रुपचा सपाटा दिसतो.
अर्थात एवढा खोलवर जाऊन विचार काही कुणी करत नाही, जमले मित्र की काढ फोटो, कर शेअर. चित्र-विचित्र कपडे, एक्स्प्रेशन आणि आपलं जगणं जगाला लाइव्ह दाखवण्याची घाई एवढंच या ग्रुपीतून दिसतं.
आणि म्हणूनच आजच्या घडीला जगातला सगळ्यात पॉप्युलर आणि हॅपनिंग शब्द कुठला असेल तर तो हा ग्रुपी.
 
- चिन्मय लेले

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.