मेकअप करण्याचे शब्दश: हजारो ट्रेण्ड यंदा आले. यादी करायची म्हटलं तरी लांबलचक होईल. पण म्हणूनच २०१६ मध्ये जगभरात गाजली आणि काहीशी वादांनी वाजलीही अशी एक मुव्हमेण्ट होती, ‘नो-मेकअप मुव्हमेण्ट’. 

* मेकअपलाच नाही म्हणणारी ही चळवळ सोशल मीडियावर बरीच गाजली. ग्लॅमर नावाच्या अतिप्रसिद्ध फॅशन मॅगझिनच्या आॅगस्टच्या कव्हरपेजवर मिला कुनीस नावाची अभिनेत्री ‘मीला, विदाउट मेकअप’ अशा हेडलाइनसह झळकली. तेव्हा त्याची कॅचलाइनच होती ‘वेल, धीस मेक्स लाइफ इझी!’

* कुनीसनं या अंकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की, मेकअप केल्यावरच आपण सुंदर दिसतो हा एक भ्रम आहे. आपण सुंदरच आहोत आणि कुणा दुसऱ्याच्यान नजरेला आपण सुंदर दिसत नसलो तर हा त्याचा प्रॉब्लम आहे, आपला नाही!’

* या चळवळीला हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सेट, स्कारलेट जॉनसन व कॅमेरून डाएझ यांनीही साथ दिली. मेकअपपेक्षा आपल्या शरीराचा सन्मान, आपण आहोत तशाच सुंदर आहोत या भावनेचा सन्मान हा संदेश त्यांनी सोशल मीडियातून पोहोचवला. आणि त्या स्वत:ही मेकअप न करता वावरल्या. स्वत:चे अजिबात मेकअप न केलेले फोटो त्यांनी धाडसानं आपापल्या सोशल प्रोफाइलवर टाकले.

* केट विन्सेटनं तर एक मेसेजही स्वत:च्या फोटोसह पोस्ट केला. ती म्हणते, मला माहिती आहे की माझे गाल असे चबी चबी आहेत. माझे केसही बरे दिसत नाहीयेत. डोळ्याखाली काळी वर्तुळं आहेत. पण त्यापलीकडेही मी आहे, हे मला आज तुम्हाला सांगायचं आहे. मी जशी आहे तशीच आहे, हॉलिवूड दिवाज म्हणून ज्या मिरवतात त्याही परफेक्ट नसतात. त्यामुळे आपण जसं आहोत तसं स्वत:ला स्वीकारा, प्रेम करा स्वत:वर!

खूप कौतुक झालं तिच्या मेसेजचं. काहींनी टीकाही केल्या की, हे पब्लिसिटीचे धंदे आहेत म्हणून.. मात्र तरीही या चळवळीचं जगभर कौतुक झालं.

* या चळवळीचा भाग नसली तरी भारतात अभिनेत्री सोनम कपूरनं एक लेख अलीकडेच प्रसिद्ध केला. त्यात तिनं स्पष्ट सांगितलं की, मी सुंदर दिसावं म्हणून माणसांची, एक्सपर्टची एक फौज काम करते. मी रोज सकाळी झोपेतून उठते तेव्हा इतकी सुंदर दिसत नाही. त्यामुळे उगीच बॉलिवूड स्टारसारखं दिसण्याचा आटापिटा करू नका. तो फोल आहे.

* रंग-कातडी यापलीकडे माणसांचं अस्तित्व आणि सौंदर्य मान्य करणारी ही चळवळ या काळात म्हणून महत्त्वाची म्हटली पाहिजे.