तुम्ही जे करताय, ते का करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 02:57 PM2019-07-11T14:57:58+5:302019-07-11T14:58:13+5:30

आपण एखादी गोष्ट करतो; पण ती का करतो, याचं उत्तर आपल्याकडे हवं. नाही तर ती कशी करतो याचे अर्थच बदलतात. म्हणून विश्लेषण करत बसण्यापूर्वी जरा संश्लेषण करा. मग बघा काय होतं.

Why are you doing, what you are doing? | तुम्ही जे करताय, ते का करताय?

तुम्ही जे करताय, ते का करताय?

Next
ठळक मुद्दे‘काय’ आणि ‘कसं’ हे तर गूगलही सांगू शकतं. ‘का’ कळलं की ‘काय’ आणि ‘कसं’ सहज समजतं.

- डॉ. भूषण केळकर

सॉफ्ट स्किल्समध्ये ‘विचारांची स्पष्टता’ ही आत्यंतिक महत्त्वाची आहे. आपण एखादी गोष्ट ‘कशी’ करतो  हे जसं महत्त्वाचं तसं ती गोष्ट ‘का’ करतो हेही महत्त्वाचं. त्या का चे उत्तर निर्‍संदिग्धपणे माहिती असणं म्हणजे विचारांची स्पष्टता असणं.
म्हणजेच हेतू जर माहिती असेल तर बहुतांश वेळा कृतीमध्येसुद्धा स्पष्टता येते.
हा हेतू माहिती करून घेणं म्हणजे sunthesis त्याला मराठीत संश्लेषण म्हणतात. विश्लेषण म्हणजे अ‍ॅनालिसिस हा शब्द आपण सहज वापरतो. त्यासोबत संश्लेषण करता येणं हे सॉफ्ट स्किल.
तुम्हाला मी काही साधी उदाहरणं देतो म्हणजे हे संश्लेषण किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल.
कसाई धारदार शस्त्रानं पोट फाडतो आणि निष्णात शल्यविशारदही तेच करतो; पण हेतू पूर्ण वेगळे! म्हणजे का या एका गोष्टीनं कृतीचा हेतू बदलला.
अजून एक उदाहरण. का नंतर कसं केलं याचं.
घरी पाहुणे आलेले असताना मला बायकोने ‘पटकन पोहे घेऊन ये’ असं सांगितलं आणि मी चिवडय़ाचे पातळ पोहे घेऊन आलो! पुढे, पाहुणे गेल्यानंतर आमच्यात जो प्रेमळ संवाद घडला त्याचं सविस्तर वर्णन देण्याची ही जागा नव्हे, नाही का? 
तर करिअर घडवतानासुद्धा आपण एखादी पदवी/ पदविका ‘का’ करतो आहोत याचं उत्तर आपण नीट जाणलेलं असणं महत्त्वाचं. त्यानं तुम्हाला खूप फायदे होतील.
जॉबच्या किंवा शिष्यवृत्तीसाठीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला यूपीएससी परीक्षा का द्यायची होती’ किंवा तुम्ही ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग का निवडलंत?’ किंवा तुम्हाला आमच्याच कंपनीत/ याच जॉब रोलमध्ये नोकरी का करायची आहे?
आता या सगळ्या आणि या प्रकारच्या का प्रश्नांना देवाची करणी अन् नारळात पाणी टाइपचे उत्तर देणं धोक्याचं आहे हे तुम्ही ओळखलं असेल!
काही वर्षापूर्वी मला धक्का बसला होता. तृतीय वर्ष बी.कॉम.च्या मुलानं मला फोन केला होता. हे विचारायला की आता तीन महिन्यात मी ग्रॅज्युएट होणार तर मी आता नोकरी करू, ती कशी शोधू की एमसीएम करू?
मी जेव्हा त्याला विचारलं, की तू जेव्हा तीन वर्षापूर्वी बी.कॉम. सुरु केलंसं तेव्हा तुझ्या मनात काय होतं? आपण बी.कॉम. करून कुठे नोकरी करणार? तर तो म्हणाला मी बी.कॉम. मित्र करत होते म्हणून केलं, फारसा विचार नाही केला! 
आजकाल मला असे धक्के बसणे कमी झालं आहे. याचं कारण हे नाही की मला अशी मुलं-मुली भेटत नाहीत, तर कारण हे आहे की इतकी मुलं-मुली भेटली आहेत की मन निर्ढावलंय!
सिमॉन सिनेक नावाच्या लेखकाचं एक पुस्तक खूप भावलं. ते तुम्हाला जाता जाता सांगून ठेवतो. त्याचं नाव आहे ‘स्टार्ट विथ व्हाय’
हेतू समजला तर निर्णयक्षमता वाढते यात शंकाच नाही. म्हणजेच ‘का’ समजलं तर ‘काय’ आणि ‘कसं’ हे सहजसाध्य असेल.
मी जेव्हा जेव्हा विद्याथ्र्याबरोबर संवाद साधतो तेव्हा तेव्हा हा विचार करतो की आज मी जे काही त्यांना सांगणार आहे ते ‘का’ सांगणं महत्त्वाचं आहे.  ‘काय’ आणि ‘कसं’ हे तर गूगलही सांगू शकतं. आजकालची पिढी ते सहज शोधूही शकते. ‘का’ कळलं की ‘काय’ आणि ‘कसं’ सहज समजतं.
नुसत्या माहितीपेक्षा ‘का’चा संदर्भ वापरून करतात ते संश्लेषण किती महत्त्वाचं आहे हे येतंय ना लक्षात?
बघा म्हणजे
रेड लेबल असं म्हटलं कुणी.
तर ते कोण, का, कसं, कधी म्हटलंय यावरून तुम्ही अर्थ काढता ना? मग कृती करता.
कधी चहा आणता आणि कधी.
कळलं ना? का किती महत्त्वाचं ते.



(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)
 

Web Title: Why are you doing, what you are doing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.