- प्रसाद सांडभोर

हिरवा - पिवळा - लाल. 
काउंटर सुरू.
१५०
१४९
१४८
आता आजची पुढची दोन मिनिटं या सिग्नलवर. 
सकाळची वेळ. 
गाड्या, बस, ट्रक - गर्दीच गर्दी. त्यात अधूनमधून चालणारी माणसं. 
या कोण आजीबाई येताहेत डावीकडून? 
केवढी मोठी टोपली आहे त्यांच्या डोक्यावर?
काय माहीत काय घेऊन चालल्याहेत! 
टोपली किती मस्तपैकी धरलीये.
खांदे - कोपर आणि मनगटं काटकोनात वाकवून. सोनेरी पदराची गडद निळसर साडी. पदर कमरेत खोवून नेसली आहे. पायांतल्या कातडी चपला चालून चालून झिजून गेल्यात. अशी टोपली डोक्यावर घेऊन चालणं नेहमीचं काम असावं त्यांचं. अगदी रोजचं सवयीचं दिसतंय. किती आरामात रस्ता ओलांडताहेत त्या. सिग्नल सुटेल म्हणून भीती, घाई बिलकुल नाही. उलट एक वेगळीच लय आहे त्यांच्या चालण्यात.
मनातल्या मनात कोणतं बरं गाणं गुणगुणत असतील? 
टोपलीत पांढरी फुलं आहेत वाटतं.
हो, मोगऱ्याची फुलं! 
सुगंध येतोय केवढा मस्त! 
टोपलीखाली पांढऱ्याशुभ्र केसांचा अंबाडा बांधलाय. त्याभोवती एक मोगऱ्याचा गजरा. ओह, आजीबाई नुस्ती फुलं नव्हे - मोगऱ्याचे गजरे विकायला घेऊन चालल्या आहेत! 
कुठून बरं आणत असतील इतकी फुलं? फुलबाजारातून की बागेतून? एकटीनं इतके गजरे ओवत असतील? 
घरी कोणी असेल मदतीला? कुठे बरं राहत असतील? कधीपासून गजरे विकत असतील? अजून काय काय करत असतील? काय असेल आजीबार्इंची गोष्ट? 
आजीबाई स्वत:च गोष्ट आहेत मुळी. सिग्नलवर सापडलेली दोन मिनिटाची गोष्ट. 
नुसत्या आजीबाईच का?
ही शेजारची स्कूटीवरची हेल्मेट घातलेली मुलगी, बसच्या दारात उभा कंडक्टर, हा रिक्षावाला, मी स्वत: प्रत्येकजण एकेक गोष्ट आहे. 
आपण नक्की आहोत कोण? माणसं? 
की गोष्ट? माणसं काय येतात आणि जातात. गोष्टी मात्र कायम राहतात. गोष्ट असण्यात जास्त गंमत आहे. 
तीन, दोन, एक. 
हिरवा. सिग्नल सुटला. 
चला...