आंध्र प्रदेशात नोकरीसाठी गेलो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 05:31 PM2018-07-19T17:31:52+5:302018-07-19T17:32:27+5:30

बदली झाली, थेट आंध्र प्रदेशात. भाषा, जेवण, राहणीमान सगळंच वेगळं. पण पर्याय काय होता?

When I went for jobs in Andhra Pradesh ... | आंध्र प्रदेशात नोकरीसाठी गेलो तेव्हा...

आंध्र प्रदेशात नोकरीसाठी गेलो तेव्हा...

Next
ठळक मुद्देशहरं आपल्याला स्वीकारतात, आपण रुजलं पाहिजे!

- प्रशांत धमाळ

माझं पदवीर्पयतचं शिक्षण माझ्याच शहरात म्हणजे नागपूरलाच झालं. सरकारी नोकरी मिळावी या प्रयत्नात असताना झिरो बजेटचं आक्रमण झालं त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याचा मार्ग जवळ-जवळ बंद झाला होता.
वडील सेवानिवृत्त झाले होते. घराची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. शहाण्या पोरासारखं पुढील शिक्षण, सरकारी नोकरी इत्यादीच्या भानगडीत न पडता आपल्या शहरातच खासगी कंपनीत नोकरीला लागलो. काही दिवसांतच कंपनीनं कामानिमित्त मला दुसर्‍या राज्यात म्हणजे आंध्र प्रदेशातील कर्नुल या जिल्ह्यात पाठवण्याचं ठरवलं.
आपले शहर सोडून बाहेर न गेलेला मी, एकदम परराज्यात जाणं अवघड झालं. कंपनीने जाणं आवश्यक आहे असं स्पष्ट सांगितलं. नोकरी आणि पैशाची गरज लक्षात घेता, मी आपलं शहर सोडून परराज्यात जाण्याचा निर्णय घेतला.
स्वतर्‍चं घर, माणसं आणि शहर सोडून मी प्रथमच, एकटाच भलामोठा प्रवास करून आंध्र प्रदेशातील कनरुल जिल्ह्यात एका तालुक्याच्या ठिकाणी रहावयास गेलो. तेथील बस स्टॅण्डवर उतरताच मला रडू कोसळलं. फार मोठं आभाळ कोसळलं असं वाटू लागलं. लगेच घरी परत जावं की काय, असा विचार मनात येत होता. मला घेण्यासाठी तेथील एक कर्मचारी आला होता. त्याला मोडकंतोडकं हिंदी येत होतं. त्यानं माझं खूप प्रेमानं स्वागत केलं. बरं वाटलं, हायसंही वाटलं.  
तिथली भाषा, राहणीमान, संस्कृती अतिशय वेगळी.  मलासुद्धा ते वेगळेपण नकोसं वाटत होतं. तेथील खानपान, वातावरण यामुळे माझी प्रकृती आठवडाभरातच बिघडली.  मी कंपनीला परत बोलावण्यासाठी विनंती केली, परंतु कंपनीनं परवानगी नाकारली. मला अधिकच अस्वस्थ वाटू लागलं होतं. तब्येत खालावली होती. घरी याबाबत सांगणं योग्य नव्हतं. घरच्यांना त्रास नको म्हणून माझ्या अवस्थेविषयी घरी काहीच सांगितलं नाही. 
माझी ही अवस्था माझ्या त्या सहकार्‍याला मात्र दिसत होती. त्यानंच जेवण, राहणं याची सोय करायला मदत केली होती. एकदा त्यानं आग्रहानं मला आपल्या घरी रहावयास नेलं. त्यानं व त्याच्या पत्नीनं मला आधार दिला. दवाखाना, माझ्या आवडीचं जेवण, माझी आवड-निवड याबाबत ते विशेष काळजी घेऊ लागले. आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी मला माया दिली. त्यांना हिंदीसुद्धा फारशी येत नव्हती, इंग्रजी कळत नव्हतं आणि मला त्यांची भाषा म्हणजे तेलुगु येत नव्हती. तरीसुद्धा भावनिक नातं, माणुसकीच्या नातं होतंच. त्यातून एकमेकांशी बोलणं सुरू झालं. संवाद उत्तम होता. प्रेमाला भाषेची गरज नसते,  भावनेची बोली कळते हे तेव्हा उमजले. या संबंधांमुळे माझी प्रकृती सुधारली. मला माझ्या कामामध्ये आणि तेथील वास्तव्यात आनंद येऊ लागला.
परक्या गावी असा जीव लावणारी माणसं भेटतात, हा अनुभवच मला उभारी देऊन गेला.  त्या कुटुंबासोबत मी रुळलो. काही दिवसांतच मी  तेलगु भाषा शिकलो. जेवण आणि पोषाख (लुंगी आणि सदरा) आपलंसं  केलं. सलग तीन वर्षे तिथे वास्तव्य केले. याकाळात माझ्यामध्ये धीटपणा आला. गावाकडं येणं-जाणं, घराबाहेर राहणं याची सवय झाली, हिंमत वाढली.
या अनुभवातून नोकरीनिमित्त कुठेही जाण्याची मनाची तयारी झाली. पुढे दुसरी नोकरी चांगल्या पगाराची, महाराष्ट्रात जालना येथे मिळाली. हे दुसरं स्थलांतर. पहिल्या परराज्यातील अनुभवामुळे ते सुखावह ठरलं. नोकरीनिमित्त जालन्याहून औरंगाबाद, त्यानंतर वर्धा आणि आता पुणे असं स्थलांतर सुरूच आहे. हे स्थलांतर मला आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्टय़ा समृद्ध करत गेलं. घराबाहेर येणार्‍या अनेक अडचणी, नवीन लोकांशी होणारा परिचय, तडजोडी, संकटांना सामोरं जाण्याचं सामथ्र्य, घर सोडून बाहेर पडल्यानंतरच मिळालं.
नवीन शहरं, महानगरं यामध्ये आपण स्वतर्‍ला कसं स्वीकारतो त्यावर आपल्याला येणारा अनुभव अवलंबून असतो. आयुष्यात यशस्वी, स्वावलंबी होण्यासाठी स्थलांतर गरजेचं आहे. आजच्या स्पर्धात्मक दिवसांत, आपल्या सर्वागीण विकासासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी मित्रांनो स्थलांतरास तयार राहा. मोठी शहरं आपल्याला स्वीकारायला तयार असतात, याची खातरी बाळगा.
 

Web Title: When I went for jobs in Andhra Pradesh ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.