फुटबॉल दिवाना बना दे, पण ही दिवानगी येते कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:14 PM2018-06-15T14:14:41+5:302018-06-15T14:14:41+5:30

आपल्या शाळांत शारीरिक शिक्षणाचे गुरुजी मुलांसाठी मिळालेला फुटबॉल कपाटांत ठेवतात. पोरं फुटबॉलला पोरं लाथा मारून त्यातील हवा काढून टाकतील म्हणून. काही मुली आणि मुलंही फुटबॉल मिळाला तर टेनिस, रबरी बॉलप्रमाणे त्यानं ‘टप्पे टप्पे’ खेळतात, कॅच कॅच खेळतात. कसे होणार भारतीय खेळाडू फुटबॉलपटू?

whats makes football so crazy? | फुटबॉल दिवाना बना दे, पण ही दिवानगी येते कुठून?

फुटबॉल दिवाना बना दे, पण ही दिवानगी येते कुठून?

Next
ठळक मुद्देफुटबॉल म्हटलं की डोळ्यासमोर येतो जोश, आवेग, थरार. पण हा खेळ असा मर्यादित नाही. वेगवान रूप ही त्याची शोकेस. आत मात्र कमालीची अचूकता, समयसूचकता आणि ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत. त्या अफाट मेहनतीचा सोहळा..

- अभिजित दिलीप पानसे

काही दिवसांपूर्वी डेव्हिड बेकहॅमचा एक व्हिडीओ वायरल झालेला बघितला. समुद्रकिनार्‍यावर बेकहॅम, हातात शीतपेयाचा कॅन. दूरवर तीन बाजूला तीन कचरा पेटी ठेवलेल्या असतात. डेव्हिडचा मित्न त्याला विचारतो, की तू इथून तीन फुटबॉल त्या तीन कचरपेटीत टाकू शकतोस का.  डेव्हिड बेकहॅम हो म्हणतो. आणि सहज तीन फुटबॉल तीन किक्समध्ये त्या तीन कॅन्समध्ये टाकतो. तेव्हाचा त्याच्या मित्नाचा आवाज ऐकण्यासारखा आहे.
ही आहे साधना. सर्वोत्तम होण्याची.
फुटबॉल म्हटलं की डोळ्यासमोर येतो जोश, आवेग, थरार. पण फक्त इतक्यापुरताच हा खेळ मर्यादित नाही. ते तर त्याचं बाह्य शोकेस आवरण. पण फुटबॉलमध्ये अचूकता, समयसूचकता आणि ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनतही आवश्यक असते. 
आजपासून संपूर्ण जग तगडय़ा, मजबूत पायांची किमया, पदलालित्य बघणार आहे. आजपासून फिफा, द फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन वल्र्डकप सुरू होतो आहे. मायकल जॅक्सनच्या मून वॉकसाठी त्याचे चाहते वेडे होते. तसेच मेस्सी, रोनाल्डोच्या पायांची नजाकत, रग, ताकद बघण्यासाठी अख्खं जग वेडं होतं.
बत्तीस फुटबॉल देशांचा हा कुंभमेळा रशियात सुरू होतोय.
संपूर्ण विश्व ‘लेट्स फुटबॉल’ करणार आहे. 
त्यात आपणही आलोच. तसा क्रि केट हा एकमेव आपला लाडका बाकी सावत्न खेळ असं मानणार्‍या बहुतेक भारतीयांना फुटबॉलप्रेमी देशात फुटबॉल वल्र्ड कपवेळी पसरणार्‍या फुटबॉल ज्वराबद्दल आताशा तशी फक्त ऐकीव माहिती असते.
पण फुटबॉल वेगळा, क्रिकेट वेगळं.
क्रि केट हा सभ्य पुरुषांचा खेळ म्हणतात.  टेनिस, बॅडमिंटन हे काहीसे तांत्रिक खेळ आहेत. टेबल टेनिस हा इनडोअर तांत्रिक खेळ. गोल्फ हा खेळ तर उच्चभ्रू खेळ मानला जातो. त्या खेळाचा ऑराच अगदी उच्चभ्रू. त्यात जोश कमी क्लास जास्त जाणवतो.
पण फुटबॉल.? हा जेंटलमन्स गेम नाही. हा खेळ भावनाशून्य चेहरा करून खेळण्याचा, बघण्याचा नाही. हा आहे अस्सल मर्दानी, जोश से भरपूर, रांगडा खेळ. दहा मिनिटं धावल्यावर छातीचा भाता होणार्‍या तरुण मुलांत आणि एका व्यावसायिक फुटबॉल खेळाडूमध्ये काही प्रकाशवर्षाचं अंतर असतं. फुटबॉलमध्ये पणास लागतो तो इंडय़ूरन्स, स्टॅमिना.


जवळपास दोनशे दहा देशांत खेळला जाणारा हा खेळ. पण तो संपूर्ण जगाला या वल्र्डकपच्या काळात जोडतो. भावनिकरीत्या जगभरातले लोक परस्परांशी जोडले जातात.
तसे फुटबॉलप्रेमी वेडे असतात फुटबॉलसाठी. हे वेड कधी मर्यादा पार करतं. तेव्हा तर विरुद्ध टीम्सच्या समर्थकांमध्ये, चाहत्यांमध्ये मारामार्‍या होतात. युरोपियन देशांत, आफ्रिकन देशांत तर हा फुटबॉल जीव की प्राण आहे.
आणि आपल्याकडे? आपल्या शाळांत शारीरिक शिक्षणाचे गुरुजी मुलांसाठी मिळालेला फुटबॉल कपाटांत ठेवतात. पोरं फुटबॉलला पोरं लाथा मारून त्यातील हवा काढून टाकतील म्हणून. काही मुली आणि मुलंही फुटबॉल मिळाला तर टेनिस, रबरी बॉलप्रमाणे त्यानं ‘टप्पे टप्पे’ खेळतात, कॅच कॅच खेळतात. कसे होणार भारतीय खेळाडू फुटबॉलपटू. चिंता करितो भारतीय फुटबॉलची. नाही म्हणायला आम्ही समुद्रकिनारी गेल्यावर तिथून लाल, पिवळा मोठय़ा आकाराचा बॉल घेतो आणि तेवढय़ापुरतं कोणी पेले, डेव्हिड बेकहॅम, कोणी रोनाल्डो, मेस्सी होतं.
क्रि केट हाच एकमेव खेळ माहिती असणार्‍या एका मित्नाला रोनाल्डोबद्दल सांगत होतो, तर तो म्हणाला रोनाल्डो म्हणजे रोनॅल्ड पेन कंपनीचा मालक काय रे? 
 ‘मोहन बगान’ला गार्डन, पार्क समजणारे ‘महाबागवान’ मी याची देही याची डोळा बघितले आहेत.
पण भारतात खर्‍या अर्थाने फुटबॉल प्रेम दिसतं ते पश्चिम बंगालमध्ये. फुटबॉल न आवडणारा बंगाली होऊच शकत नाही असंही म्हटलं जातं. ‘यत्न यत्न बंगालीबाबू तत्न तत्न फुटबॉलप्रेमी!’ मोहन बगान हा फुटबॉल क्लब कोलकाताची शान आहे. 1889 मध्ये भूपेंद्रनाथ बोस यांनी स्थापन केलेला हा फुटबॉल क्लब भारतातील सगळ्यात जुना आणि  आशिया खंडातील सगळ्यात जुना आणि मानाच्या क्लबमधील एक आहे. फुटबॉलचं हेच वेड गोव्यांतही दिसतंच म्हणा.
नाही म्हणायला आता भारतात फुटबॉलबद्दलची आस्था, प्रेम वाढतंय. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सतरा वर्षाखालील विश्वकप स्पर्धेवेळी लोकांची उपस्थिती अबब म्हणणारी होती. शिवाय आता नीता अंबानी, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन सारेच भारतात फुटबॉल प्रेम वाढवण्याचं काम करायला सरसावलेत.
पण तो नुस्त्या मार्केटिंगनं कसा रुजेल?
भारतात सुनील गावस्कर सुनील शेट्टी सगळ्यांना माहिती असतात. अगदी सुनील पॉल सुनील ग्रोव्हरसुद्धा माहिती असतो. पण  सुनील छेत्नी किती जणांना माहिती?
सुनील छेत्नी हा भारतातील उत्कृष्ट फुटबॉलपटू. भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधार. त्याने लिओनेल मेस्सी या जगविख्यात फुटबॉलपटूचा 64 गोल्सच्या रेकॉर्डची नुकतीच बरोबरी केली. मेस्सीपेक्षा कमी मॅचेस तो खेळलाय. नुकताच सुनील छेत्नीने भावनिक आवाहन केलं होतं की,  किमान आम्हाला दूषणं देण्यासाठी, टीका करण्यासाठी तरी भारतीय फुटबॉल टीमचा सामना असताना मैदानात येऊन बघत जा. 
खरं तर पावसात मैदानात फुटबॉल जो खेळला त्यानं आयुष्याची मजा घेतली समजायचं. दुसर्‍यांच्या आयुष्यात, कामात तंगडय़ा घालण्यापेक्षा, व्यायामाने तगडय़ा तंगडय़ा कमावून फुटबॉल खेळण्याची मजा घ्यावी.
तसाही प्रत्येक खेळ हा मानवी आयुष्यालाच शोकेस करत असतो. पडायचं, हारायचं, उठायचं आणि जिद्द कायम ठेवून पुन्हा खेळायचं आणि जिंकायचं. सतत मन वर्तमानात ठेवून काळजी घेत योग्य वेळी किक मारून आपला गोल करावा. हेच हा खेळ सांगतो.
लेट्स फुटबॉल ! इट्स अ गोल!

abhijeetpanse.flute@gmail.com

Web Title: whats makes football so crazy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.