त्याला काय अक्कल आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:58 PM2017-09-21T12:58:22+5:302017-09-21T13:00:51+5:30

दुसऱ्यांवर फणकाऱ्यानं टीका करता; पण स्वत:तलं किंवा इतरांमधलं काही चांगलं, उमेदीचं शोधण्याचा प्रयत्न तरी केलाय का?

What's the common sense of him? | त्याला काय अक्कल आहे?

त्याला काय अक्कल आहे?

Next
ठळक मुद्देसारखं डोकं मोबाइलमध्ये खुपसून बसायचं. त्यात सतत इतरांचं काय चाललंय, काय म्हणणंय हे कळतं. मनाला इतरांचीच उठाठेव जास्त? बरं त्यातही आपण काही चांगले बघू शकतो का? फुल टाइम चुका शोधा मोहिमेवर?

- प्राची पाठक
सारखं डोकं मोबाइलमध्ये खुपसून बसायचं. त्यात सतत इतरांचं काय चाललंय, काय म्हणणंय हे कळतं. म्हणजे मनाला इतरांचीच उठाठेव जास्त? बरं त्यातही आपण काही चांगले बघू शकतो का? फुल टाइम चुका शोधा मोहिमेवर? मग आपण अधिकारवाणीने कोणी खेळाडू, राजकारणी, हिरो, अमुक-तमुक अशा सगळ्यांच्या कामातल्या, वागण्यातल्या चुका सांगू लागतो. स्वत: काहीही विशेष न करता आपण सगळ्यातले तज्ज्ञ होऊन जातो एकदम. पण त्याचा उपयोग काय?

'आजकालची मुलं घराबाहेर पडतच नाहीत, सतत फोनमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात'. किंवा ‘दिवस दिवस घराबाहेर असतो, मित्रांसोबत असतात; पण सगळे त्या फोनशी खेळत असतात’ अशा दोन प्रतिक्रि या सगळ्या ‘आजकालच्या’ मुलांबाबत! त्या सोयीनुसार इतरही नात्यांना, वयाला लावल्या जातात. कुणाला तरी तुमचा वेळ हवाय आणि तो वेळ न मिळायचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या हातातला मोबाइल, टॅब, लॅपटॉप आहे, अशी एक तक्रार असते. दुसरी तक्रार म्हणजे हे काय चालणारच, आधी आपलं करिअर मार्गी लावा, मग फोन घेऊन बसा. अमुक अभ्यास पूर्ण करा, तमुक जॉब तोच फोन घेऊन शोधा, सेटल व्हा आणि मग काय त्यात डोकं खुपसायचं ते खुपसा. जन्म पडलाय या साऱ्यासाठी!

हे सल्ले तसे ‘सेटल’ झालेल्या मंडळींकडून दिले जातात. अगदीच झूठ नसतात ते; पण सेटल झालेल्या अनेक मंडळींबद्दलदेखील हीच तक्रार करता येते. काय सतत फोनमध्ये डोकं खुपसून बसलेत? एका वाचक मित्रानं कळवलं, फोनमध्येच तुमचा लेख वाचला. स्वत:बद्दल छान वाटते का, कधी आणि कशाबद्दल वाटले, एक यादी करा. आपण फोनमधूनच असा लेख लिहिणाºया व्यक्तीला मेसेज करून टाकतो, याद्या करून काय फायदा? आमच्या मनाचे प्रश्न सुटायला अजून काही सांगा. फोन सुटतच नाही हातातला त्याचं काय ते सांगा. कोण म्हणतं, फोन संन्यास घ्यावा? कोण सांगतं, दिवसातून, आठवड्यातून काही वेळ फोन वापरू नका. महिन्यातून एक दिवस फोन दूर ठेवा. दूर ठेवायला जमत नसेल, तर जिथे रेंज नाही, तिथे जा फिरायला! मनावर थेट नाही तर असा ताबा मिळवा. हे कमीच, मध्येच फोन कसा आवश्यक असतो, हे सांगणारे पाच पन्नास लोक येणार. या सगळ्या मत मतांतरात स्वत:बद्दल छान कधी वाटलं होतं ते आठवायचं राहून गेलं.
त्यात कुणी म्हणतो, मी कायमच छान असतो, मी तर थोरच, मी, मी, मी असेही खूप होऊन गेले. सारखं मी मी केल्याने अहंकार वाढीला लागतो, असं तावातावाने मांडणारे काही बोलून गेले. आपण स्वत:त डोकावणं सोडूनच दिले. तसंही याद्या बनवून काय होणार आहे, या विचारांच्या शिडीवर तात्पुरते चढून बसलो.

असे बरेच प्रश्न, बऱ्याच शंका गेल्या काही दिवसांत मेलमधून आमच्यापर्यंत पोहचल्या.

मात्र विचार करा, आपल्या मनाला आपल्याबद्दल बरं वाटावं अशा कोणत्या सूचना आपण आपल्याला देतो? आपल्या शरीराला बरं वाटावं, जिभेला बरं वाटावं म्हणून आपण वरचेवर काहीतरी करत असतो. मनाला बरं वाटावं म्हणून काय करतो? आपल्या शरीराला बरं वाटावं म्हणून केल्या जाणाऱ्या गोष्टी कुठेतरी मनाशी जोडलेल्या असतातच. तर ते मनाचेच खेळ आहेत, असं म्हणता येईल.
पण आपल्या मनाचा फोकस आपल्या आजूबाजूच्या छान, चांगल्या गोष्टींवर जरा वेळ तरी जातो का? की ते मन कायम स्वत:च्या आणि इतरांच्या चुका, वैताग शोधायच्याच कामी लागलं आहे? कुणाबद्दल काही बरं शोधलं तरी शेवटी तुलना, असूया यांनी मन घेरून जातं. आधी तरी आजूबाजूचं सर्कल छोटं होतं. संपर्कात येणारी माणसं मर्यादित होती.

आता सारखं डोकं एका उपकरणात खुपसून बसायचं. ते यंत्र छोटं पण मनाला इतरांचीच उठाठेव जास्त, असं होतंय का?
तिथेतरी आपण काही चांगले बघू शकतो का? की मन ‘फॉल्ट फाइंडिंग’च्या कामावर, फुल टाईम? आजूबाजूचं सर्कल कमी पडतं की काय, मग आपण अधिकारवाणीने कोणी खेळाडू, राजकारणी, हिरो, अमुक-तमुक अशा सगळ्यांच्या कामातल्या, वागण्यातल्या चुका सांगू शकतो. स्वत: काहीही विशेष न करता आपण सगळ्यातले तज्ज्ञ होऊन जातो एकदम. ‘त्याला काय अक्कल आहे’, हे एकदम आत्मविश्वासाने म्हणतो.

दुसऱ्यांच्या जेन्युइन चुका काढता येत असतील, त्या मांडता येत असतील, नीट आणि आपल्या परीने उपायदेखील सुचत असतील तर छान आहे. मनाची एक्झरसाइझ म्हणून निदान चर्चेपुरती! पण आपल्यात आणि दुसºयातही काहीतरी जेन्युइन चांगलं शोधणं वाटतं तितकं सोपं नसतं. मी मी न होऊ देता स्वत:ची जमेची बाजू कळणं, तिच्यावर अजून काम करणं आणि नुसतेच छान-छान, खोटे-खोटे गोड न बोलता दुसऱ्याला काही चांगलं म्हणता येणं हे शिकावंच लागतं. म्हणूनच यादी बनवायची. एक नाही, जास्त काही शोधायचं आहे, असं म्हटलं तर निदान एका गोष्टीचा विचार सुरू होतो. खरंच काही घडतंय का बरं आपल्या आजूबाजूला, ज्यामुळे आपल्यालाही हे जगणं छान आहे यार असं वाटेल, असा शोध. आयुष्यानं आपल्याला काहीतरी दिलंच आहे की छान, त्याला आपल्या मनात तरी थँक्स म्हणता येणं जमू शकेल का?
हे जमलं की इतरांमधलंही काहीतरी वेगळं छान आपल्याला सापडेल. ते केवळ वरवरची स्तुती न वाटता त्यांना पोहोचवता येईल. मग हळूहळू त्यांच्याशी संवाद साधायचा तर निमित्त शोधावं लागणार नाही. कुठून सुरू करू, असा प्रश्न पडणार नाही.
सापडतील आपल्यालाही छान वाटणाऱ्या, आनंद देणाऱ्या गोष्टी!

Web Title: What's the common sense of him?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.