वर्ल्ड कपसाठी सज्ज भारतीय संघासाठी Yo Yo टेस्टचा स्कोअर नेमका किती आहे? - काय आहे ही Yo Yo टेस्ट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:58 PM2019-05-23T16:58:25+5:302019-05-24T17:00:12+5:30

ही टेस्ट नाही, आव्हान आहे, रोज आपणच आपल्याला करायचं. आपला पळण्याचा वेग, क्षमता आणि चिकाटी वाढवण्याचं. क्रिकेट खेळाडूंना आता ही टेस्ट देऊनच संघाचं दार ठोठवावं लागतं. मात्र हे आव्हान फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नाही तर ज्याला फिटनेसचं वेड आहे त्या प्रत्येकासाठीचं आहे !

what is Yo Yo Test? why it is important for cricket world cup & Indian cricket team? | वर्ल्ड कपसाठी सज्ज भारतीय संघासाठी Yo Yo टेस्टचा स्कोअर नेमका किती आहे? - काय आहे ही Yo Yo टेस्ट ?

वर्ल्ड कपसाठी सज्ज भारतीय संघासाठी Yo Yo टेस्टचा स्कोअर नेमका किती आहे? - काय आहे ही Yo Yo टेस्ट ?

Next
ठळक मुद्देभारतीय क्रिकेटच नाही तर जगभरात फुटबॉलसह अनेक खेळांत आणि सैन्यातही अग्रक्रमानं आणि सक्तीनं केली जाणारी ही टेस्ट का महत्त्वाची आहे?

- अनन्या भारद्वाज

 यो यो टेस्ट किंवा बिप बिप टेस्ट असं या टेस्टचं नाव.
‘बिप बिप’ म्हणजे तसलं काही सेन्सॉर नव्हे, शिव्या नव्हेत.
मग काय हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवि शास्री यांना विचारा. ते म्हणतात, ‘यो यो टेस्ट अत्यावश्यकच आहे, ती द्यावीच लागेल आणि ती पास केली तर छानच. नाही तर सरळ बाहेरचा रस्ता धरा, संघात काही जागा नाही, चूक झाली तर संधी नाही!’
त्यांच्या या मताशी कर्णधार कोहलीही सहमत आहे. कोहली स्वतर्‍ फिटनेस फ्रिक आहेच, मात्र आपल्या सातत्याचं आणि यशाचं सिक्रेट आपला उत्तम फिटनेस आहे हे तो सतत सांगतो. त्याच्या फिटनसेकडे पाहून अनेक तरुण क्रिकेटर्स आपल्या फिटनेसवर जोरदार काम करताना दिसतात. आहार, मानसिक सराव, उत्तम लाइफस्टाइल, पुरेशी झोप आणि जोरदार व्यायाम हे सगळं अत्यंत महत्त्वाचं ठरायला लागलं आहे. भारतीय संघच कशाला आता डोमेस्टिक क्रिकेटमध्येही अनेकजण फिटनेसवर भर देतात आणि त्या संघात निवडचाचणी होतानाही ही यो यो टेस्ट दिलीच जाते. त्यात पास झाले तर पुढे नाही तर संघाबाहेर हे सूत्र आहेच.
त्यावर चर्चा अशीही होते की, फक्त यो यो टेस्ट ठरवणार का खेळाडूचं संघातलं स्थान? फक्त फिटनेसला महत्त्व देणार की खेळाडूच्या स्किलला, त्याच्या क्रिकेटमधल्या कौशल्याला, त्याच्या प्रेशर हाताळण्याच्या ताकदीचं काही महत्त्व असणार की नाही?
मात्र यासार्‍याच्या पलीकडे जात आता यो यो टेस्ट सक्तीचीच झाली आहे आणि जो फिट नाही, जो यो यो टेस्ट पास करू शकत नाही तो संघाबाहेर असं चित्र निर्माण व्हायला लागलं आहे.
त्याचं कारण म्हणजे क्रिकेटला आलेला वेग. भयंकर वेग. एखाद्या अ‍ॅथलिटसारखा स्टॅमिना, एण्डय़ुरन्स, चिकाटी, जबरदस्त पळण्याची क्षमता हे सारं क्रिकेटमध्येही आवश्यक ठरू लागलं आहे. त्यात लांबलचक दौरे. क्रिकेटचे बदलतं स्वरूप. या सार्‍यात टिकायचं तर खेळाडूंचा मानसिक -शारीरिक स्टॅमिना उत्तम लागतोच, तो परीक्षा पाहतो. आणि ते नसेल तर मग आता संघाबाहेर राहण्याची वेळ येऊच शकते.
मात्र गंमत अशी की वर्ल्डकपची तयारी करणार्‍या आजच्या भारतीय संघाचा यो यो टेस्टचा स्कोअर काही फार ग्रेट नाही. म्हणजे जगातल्या इतर संघाशी तुलना करता तो जेमतेम आहे. आजच्या घडीला जगातला सगळ्यात फिट आणि यो यो टेस्टमध्ये नंबर वन असा संघ आहे न्यूझीलंडचा. आणि त्यात आघाडी घेतली आहे ती पाकिस्तान संघानं. पाकिस्तान संघाच्या फिटनेसवर तर सतत अनफिट असल्याचे आरोप होत असतात. त्यात त्यांचं सतत सामने हरणं आणि सपशेल लोटांगण घालणंही गाजतंच. मात्र आजच्या घडीला पाकिस्तान संघानं स्वतर्‍च्या फिटनेसवर इतकं प्रचंड काम केलं आहे की, त्यांचा यो यो फिटनेस स्कोअर हा अन्य संघापेक्षा कित्येकपट जास्त आहे.
आता वल्र्डकप जसजसा जवळ येईल, जशी चुरस वाढेल तशी या फिटनेसचीही चर्चा वाढेल. आणि ही टेस्ट असते काय याबद्दलचं औत्सुक्यही वाढेल.
मात्र ही टेस्ट आता फक्त खेळाडू किंवा अ‍ॅथलिट यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर ज्यांना फिट राहायचं आहे, आपला स्टॅमिना, पळण्याची क्षमता, आपला एण्डय़ुरन्स तपासून पहायचा आहे, त्या सार्‍यांना ही यो यो टेस्ट करता येते. त्यासंदर्भातला भरपूर तपशील गूगल केला तर मिळतो. अनेक जण आपला यो यो स्कोअरही अभिमानानं मिरवताना दिसतात.
मात्र खरं सांगायचं तर यो यो ही एक अत्यंत बेसिक फिटनेस टेस्ट असते आणि ती कुणालाही देता येऊ शकते. मात्र त्यासाठी जो व्यायाम करावा लागतो तो केला नाही, तसा स्टॅमिना कमावला नाही तर या टेस्टला काही अर्थ नाही. केवळ ट्रेण्ड आहे, चर्चा आहे म्हणून ही टेस्ट करण्यापेक्षा ज्यांना विराटच्या फिटनेसलाच फॉलो करायचं त्यांनी आपल्या फिटनेसकडेच पाहिलेलं बरं !
अर्थात जसे फॅशन ट्रेण्ड येतात तसे फिटनेस ट्रेण्डही येतात. त्यातच सध्या या यो यो टेस्टची चर्चा आहे.

****
 

यो यो टेस्ट काय असते?
यो यो टेस्ट ही एक एण्डय़ुरस तपासण्याची चाचणी असते. जी बिपद्वारे मॉनिटर केली जाते म्हणून तिला बिप असे म्हणतात. डॅनिश सॉकर फिजिओलॉजिस्ट आणि फुटबॉल कोच डॉ. जेन बांगबो यांनी ही टेस्ट तयार केली. 1990ची ही गोष्ट. त्यात लेव्हल एक आणि लेव्हल दोन असे दोन प्रकार असतात. फुटबॉलपटूंचा फिटनेस वाढावा, त्यांचा पळण्याचा वेग आणि क्षमता वाढावी, रोज एक प्रकारचं रुटीन कायम राखत आपला स्टॅमिना वाढवावा, जास्त अंतर उत्तम वेगात आणि सलग पळता यावं म्हणून ही यो यो टेस्ट तयार झाली.

यो यो टेस्ट करतात कशी?
यो यो टेस्ट करायला खरं तर काही फार साधनं लागत नाहीत. दोन कोन किंवा दोन कोणत्याही वस्तू घेऊन ती करता येते.
साधारण 20 मीटर अंतरावर हे कोन ठेवले जातात. आणि बिप वाजला की एका कोनापासून दुसर्‍या कोनर्पयत पळत जावं लागतं, ते दुसरा बिप वाजण्याच्या आत. मग परत त्या कोनापासून पहिल्या कोनार्पयत बिप वाजण्यापूर्वी यावं लागतं. सुरुवातीला बिप वाजण्याचा वेग कमी असतो, मात्र हळूहळू तो वाढतो. त्यामुळे बिप भराभर वाजतात, त्या वेगात पळावं लागतं.
दोनदा बिप वाजले आणि पळणारा कोनर्पयत पोहचला नसेल तर यो यो टेस्ट संपते. आणि ती बिप टेस्ट तिथंच थांबवून तुमचा स्कोअर पाहिला जातो. सुरुवातीला फुटबॉलर्ससाठी तो स्कोअर 20च्या आसपास होता आता तो 17.2 च्या आसपास नसेल तर अनुत्तीर्ण केलं जातं. आणि पुन्हा टेस्ट द्यावी लागते.
त्यामुळे पळण्याचा वेग, स्टॅमिना, क्षमता हे सारंच या टेस्टमध्ये तपासलं जातं.
 
भारतीय संघ आणि क्रिकेट जगात यो यो टेस्ट कशी?

सगळेच खेळ वेगवान झाले आहेत. क्रिकेटला फुटबॉल इतका वेग नसला तरी आता क्रिकेटमध्येही पळणं, फिल्डिंग, रनिंग बिटविन द विकेट यासार्‍याला महत्त्व आले आहे. त्यामुळेच यो यो टेस्टही आली.
भारतात अनिल कुंबळे प्रशिक्षक असताना त्यानं ही यो यो टेस्ट टीमसाठी सुरू केली असं म्हणतात. पुढे सर्वच संघांना, आयपीएललाही ही टेस्ट केली जाऊ लागली.
आणि आता तर कर्णधार विराट कोहलीचा फिटनेसवर अत्यंतिक भर असल्यानंही यो यो टेस्टशिवाय खेळाडूंना संघात स्थान मिळत नाही. 
सर्वच क्रिकेट संघ एवढंच काय अनेक देशांत तर त्यांची सैन्यदलं, रग्बी आणि फुटबॉलसारखे खेळ आणि चीनमध्ये तर शालेय अभ्यासक्रमातही यो यो टेस्ट आता सक्तीची करण्यात आली आहे.

****

रोज. स्वतर्‍ला चॅलेंज करण्याची हिंमत- - मनोज उपरेटी
(फिटनेस आणि यो यो टेस्ट मार्गदर्शक)


यो यो टेस्ट कुणीही करू शकतो. अगदी साधी टेस्ट आहे. मात्र त्या टेन्समध्ये पळण्याची, एण्डय़ुरन्सची जी चाचणी होते तिची तीव्रता अधिक असते. प्रोफेशनल अ‍ॅथलिट ही टेस्ट म्हणूनच अधिक प्रमाणात करतात. मुळात आपला एरोबिक एण्डय़ुरन्स मोजणं हे या चाचणीचं काम. त्यात पळावं तर खूप लागतं; पण किती काळ किती वेगात तुम्ही पळू शकता हे तपासलं जातं.
त्यामुळे ज्याला कुणाला आपल्या फिटनेसवर काम करायचं त्यानं ही टेस्ट देणं मनात ठेवणं काही गैर नाही. त्याविषयीची भरपूर माहितीही आजकाल इंटरनेटवर उपलब्ध आहे. मात्र ही चाचणी देणं हे काही कुणाचं ध्येय असू शकत नाही. लक्ष्य असावं लागतं ते आपला फिटनेस वाढवण्याचं, आपला पळण्याचा वेग आणि सातत्य वाढवण्याचं. त्यासाठी तुम्हाला उत्तम फिटनेस मार्गदर्शक हवा. त्यासोबतच हवं एक रुटीन.
या चाचणीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे ते म्हणजे रुटीन. सातत्य. एक दिवस केलं, काही दिवस केलं असं नाही तर रोज तुम्हाला सराव करावा लागतो, विशिष्ट लाइफस्टाइल जगावी लागते. त्याला म्हणतात फिटनेस रुटीन. ते जगावं लागतं. तर तुमचा कार्डिओ एण्डय़ुरन्स वाढतो. त्यालाच म्हणतात रोज आपण स्वतर्‍ला चॅलेंज देणं, आव्हान देणं आहे.
आपण आपलंच चॅलेंज रोज स्वीकारतो, रोज स्वतर्‍लाच हरवतो का, जिंकतो आपण रुटीन, हे खरं तर या चाचणीचं महत्त्व आहे.

(लेखिका स्वतंत्र पत्रकार आहेत.)

Web Title: what is Yo Yo Test? why it is important for cricket world cup & Indian cricket team?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.