यू-ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर स्नॅपचॅट या पाच प्रसिद्ध सोशल मीडिया व्यासपीठांचा तरुण यूजर्सच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठीचे हे १४ प्रश्न.
त्या प्रश्नांच्या उत्तरातून पुढे आलेला तपशील, हाती आलेली माहिती ‘नेट पॉझिटिव्ह’ आणि ‘नेट निगेटिव्ह’ या दोन गटात विभागली आहे. शून्य ते वजा दोन म्हणजे नेट निगेटिव्हिटी; अर्थात या पाच सोशल मीडियाचा यूजर्सवर होणारा नकारात्मक परिणाम. आणि शून्य ते अधिक दोन म्हणजेच यूजर्सवर होणारा सकारात्मक अर्थात ‘नेट पॉझिटिव्ह’ परिणाम.
या सर्वेक्षणात यू-ट्यूबला सर्वात सकारात्मक व्यासपीठ म्हणून पसंती मिळालेली दिसते, तर ट्विटरला दुसरं स्थान देण्यात आलं आहे. फेसबुक आणि स्नॅपचॅटला अनुक्र मे तिसरं आणि चौथं स्थान मिळालंय. सर्वाधिक नकारात्मक परिणाम करणारा सोशल मीडिया म्हणजे इन्स्टाग्राम असं हा अभ्यास सांगतो.

सोशल मीडिया आपण वापरतो.
पण त्याचा फायदा काय?
तोटा किती, असं कधी मोजतो का?
मोजून पहा,
कळेल की आपल्यासाठी सगळ्यात घातक काय?
उपयोगाचं काय?
त्या मोजमापाचे हे काही प्रश्न.
त्यांची उत्तरं सोपी नाहीत
आणि परिणाम तर त्याहूनही जटिल आहेत.
फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर आणि यू-ट्यूब.
सोशल मीडियातल्या पाच सगळ्यात महत्त्वाच्या साइट्स. या साइट्सवर गेल्याशिवाय हल्ली तरुणांचा दिवस मावळत नाही. तासन्तास इथंच असतात अनेकजण.
म्हणून मग स्टेट्स आॅफ माइण्ड या सर्वेक्षणात १४ ते २४ वयोगटातल्या १४७९ तरुण-तरुणींना या पाच साइट्स संदर्भातच काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. या सोशल मीडिया व्यासपीठावर वावरताना या तरुण- तरुणींना स्वत:च्या सवयी कशा दिसतात? त्यांच्यावर प्रत्येक व्यासपीठाचा स्वतंत्र काय परिणाम होतो. किती होतो. तिथला अनुभव या मुलांना नेमकं काय देतं याचा हा तपशीलवार अभ्यास.
म्हणून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक सोशल व्यासपीठाला काही मार्क देण्यात आले. ते मार्क देण्याची रीत अशी की,
० म्हणजे, काहीच परिणाम होत नाही.
० ते वजा २, म्हणजे अगदीच वाईट, खूपच नकारात्मक परिणाम होतो.
० ते अधिक दोन म्हणजे हे माध्यम वापराचे खूप चांगले परिणाम पण आहेत किंवा परिस्थिती फार वाईट नाही.
या आधारे केलेला अभ्यास आपल्याला आपल्याच सोशल मीडिया वर्तन-सवयींबद्दल बरंच काही सांगतो.

प्रश्न काय? उत्तरं काय मिळाली?

१) निरनिराळ्या आजारांची माहिती या माध्यमांतून मिळते का? जनजागृतीसाठी ही माध्यमे उपयोगी पडतात का? लोकांचे आपल्या आरोग्याविषयीचे अनुभव तुम्हाला इथं समजतात का?
२) ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल अशा आरोग्य विषयात काम करणाºया तज्ज्ञ लोकांपर्यंत ही माध्यमं तुम्हाला पोहचवतात का? कालपर्यंत जी माणसं आपल्या संपर्क कक्षेच्या बाहेर होती ती आज या माध्यमामुळे आपल्या संपर्कात आली आहेत, असं वाटतं का?
३) कुटुंब, दूर गेलेले नातेवाईक, मित्रपरिवार हे सारे सोशल मीडिया वापरून तुम्हाला भावनिक आधार देतात का?
४) अस्वस्थता, काळजी या भावनांमध्ये सोशल मीडियाच्या वापरानंतर वाढ झाली आहे, असं तुम्हाला वाटतं का?
५) सतत नैराश्य येतं का? तुम्ही सतत दु:खी आणि डाऊन असता का?
६) एकटेपणा जाणवतो का? आजूबाजूला माणसं असूनही आपण सतत एकटे आहोत असं वाटत का?
७) झोपेवर परिणाम झालाय का आणि कसा? शांत झोप लागते का? झोप पुरेशी होते का?
८) अभिव्यक्तीसाठी अर्थात व्यक्त होण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया खरंच वापरता का?
९) सोशल मीडियामुळे तुम्हाला तुमची आयडेण्टीटी, स्वओळख मिळाली आहे असं वाटतं का?
१०) तुम्ही कसे दिसता? तुमचं वजन, बांधा, चेहरा, रंग याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जेव्हा स्वत:चे फोटो सोशल मीडियावर टाकता तेव्हा तुमच्या मनात काय भावना असतात?
११) खºया आयुष्यातली नाती सांभाळायला सोशल मीडिया तुम्हाला उपयोगी पडतो का?
१२) समविचारी लोकांबरोबर जोडून घ्यायला सोशल मीडिया उपयुक्त ठरतोय का?
१३ ) तुम्ही ट्रोलिंगचा अनुभव घेतला आहे का? सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यावर अत्यंत वाईट टीका कुणी केली आहे का?
१४) आपण जर सोशल मीडिया वापरला नाही तर आपण जगाच्या मागे राहू, आपल्याला कुणीही विचारणार नाही असं वाटत का? फिअर आॅफ मिसिंग आउट - अर्थात फोमोची भीती तुम्हाला वाटते का?