मराठी तरुण मुलं काय वाचतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 05:50 PM2018-02-14T17:50:21+5:302018-02-15T10:39:16+5:30

आपल्या आवतीभोवती असलेल्या सामान्यत्वाच्या पलीकडे जाऊन उत्तुंग व्यक्तित्वांना, विचारांना भेटण्यााची सुवर्णसंधी पुस्तकं आपल्याला देतात. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून मानवी संस्कृतीतील विविध रुपातलं सत्त्व चाखण्याची संधी पुस्तकांमुळे मिळते;

 What do the Marathi youth read? | मराठी तरुण मुलं काय वाचतात?

मराठी तरुण मुलं काय वाचतात?

Next

- अमृत बंग

तरुण मुलं पुस्तकं वाचतच नाहीत का?
वाचतात तर काय वाचतात?
याचा ‘निर्माण’ चळवळीनं केलेला हा अभ्यास.

आपल्या आवतीभोवती असलेल्या सामान्यत्वाच्या पलीकडे जाऊन उत्तुंग व्यक्तित्वांना, विचारांना भेटण्यााची सुवर्णसंधी पुस्तकं आपल्याला देतात. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून मानवी संस्कृतीतील विविध रुपातलं सत्त्व चाखण्याची संधी पुस्तकांमुळे मिळते; मात्र ब-याच जणांना असं वाटत नाही. एकतर वाचायचं केव्हा तर परीक्षेसाठी अभ्यास करायचा म्हणून असंच अनेकांना वाटतं. लहानपणी ‘वाचाल तर वाचाल’ असं सांगून वाचण्याविषयी एक प्रकारची भीती (आणि म्हणून नंतर तिटकारा) बहुतेकांच्या मनात पैदा होते ही खूप दुर्दैवाची बाब आहे. आताचे समीकरण हे ‘वाचाल तर परीक्षेत पास व्हाल’ असे राहिले नसून ‘वाचा वाचा नाहीतर असेच पास व्हाल’ असे झाले आहे.
पण मला सांगा, पृथ्वीवरील माझी वेळ निघून गेली आणि या जगाविषयी, मानवी संस्कृतीविषयी फारसं न कळताच मी गेलो तर ते किती जास्त वाईट आहे! म्हणून वाचलं पाहिजे.
वाचन ही एक सिरीअसली करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. मी इंजिनिअरिंगला गेलो (२००३) तेव्हापासून आत्तापर्यंत वाचलेलं प्रत्येक पुस्तक मी नोंदवून ठेवलं आहे. दर वर्षी किती वाचलं, काय वाचलं, आता अजून काय वाचायला पाहिजे, माझी विश लिस्ट काय, हे सगळ मॉनिटर करायला मला आवडतं. नुकतीच मी अ‍ॅमेझॉनवरून साधारण ३३० पुस्तकं मागवली. ती यादी तयार करताना काय वाचायाचं आहे पुढच्या वर्षात हे काळजीपूर्वक ठरवताना खूपच मजा आली.
पण मग मी का वाचतो?
मी विविध कारणांसाठी वाचतो; पण अगदी मुख्य अशी तीन कारणं सांगायची तर..
१. माझ्या ज्ञानाच्या/विचारांच्या/कुतूहलाच्या कक्षा
रुंदावणं, हे जग कसं चालतं हे समजून घेणं.
२. एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून अधिक उन्नत होणं, साहित्य, विशेषत: फिक्शन हे यासाठी खूप मदत करतं.
३. काही विशिष्ट विषयांबाबतीत माझी समज व कौशल्य वाढवणं. हे प्रामुख्यानं माझ्या कामाशी निगडित असं वाचन.
ज्या निर्माण युवा गटासोबत मी काम करतो त्यामध्येसुद्धा वाचनाची आवड जोपासली जावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. निर्माणच्या दर शिबिरात बुक क्लब असतो ज्यामध्ये साधारण विविध विषयांवरील १५-२० पुस्तकं शिबिरार्थी इतरांसमोर मांडतात. पुस्तक कशाविषयी आहे आणि ते वाचून माझ्या मनातील रिफ्लेक्शन्स काय हे ते सांगतात. चांगल्या पुस्तकांची ओळख व्हायला आणि स्वत: वाचण्याची इच्छा होण्यास यामुळे नक्कीच मदत होते. नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आमचा निर्माणचा मित्र शुभम घोरमोडे याने तर यापासून प्रेरणा घेऊन स्वत:च्या कॉलेजमध्येच आता एक बुक क्लब सुरू केला आहे.
‘‘आजची पिढी, ‘सोशल मीडिया’ वरच्या माहिती, मतांना ‘वाचन’ समजते. पुस्तकं, मासिकं आणि विविध दिवाळी अंक वाचणं तर यांना माहितीच नाही, आम्ही तर खूप वाचन केलं...’ हे सहसा वयस्कर लोकांचं आजच्या युवाबद्दलचे मत.
मात्र आजचा युवा सहसा काय वाचतो, याची अनुभूती नुकत्याच पार पडलेल्या निर्माणच्या आठव्या बॅचच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळी आली. यामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरील ११ राज्यांतून एकूण ७०२ अर्ज आले. प्रवेश अर्जामध्ये एक प्रश्न -
‘तुम्ही वाचलेली आणि तुम्हाला आवडलेली पाच पुस्तकं कोणती?’ असा होता. ज्यांची शेवटी निवड झाली त्यातील १७५ अर्ज घेऊन आम्ही त्यांच्या उत्तराचं विश्लेषण केलं. त्यातील आम्हाला जाणवलेल्या काही ठळक गोष्टी इथं मांडत आहोत.
महाराष्ट्रातील एकूण युवकांची संख्या लक्षात घेता १७५ हा आकडा कमी असला तरीही विश्लेषणाच्या दृष्टीने याकडे आपण प्रातिनिधिक म्हणून पाहू शकतो. ‘निर्माण’सारख्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणारा, तुलनेने संवेदनशील आणि विचारी युवा वर्ग नेमका काय वाचतो याचा अंदाज यानिमित्ताने आपल्याला येतो. आजचा युवा काहीनाकाही नक्कीच वाचत आहे हे निदर्शनास आले. परंतु, चिंतेची बाब वाटते की, वाचलेली अनेक पुस्तके ही काही उत्कृष्ट म्हणावी अशा दर्जाची नाहीत. त्यामुळे सुधारणेला भरपूर वाव आहे. बुक क्लब्स गरजेचे आहेत तर...!
योग्य पुस्तकं वाचल्यास दृष्टिकोन व्यापक होण्यास आणि विचारांची खोली वाढण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. अनेक युवकांना नक्की कोणती पुस्तके वाचावीत हा संभ्रम असतो. त्यामुळे युवक फक्त प्रसिद्ध (पण प्रसंगी उथळ) किंवा इतर मित्रांनी वाचलेली पुस्तकंच वाचतात असं होतं. त्यामुळे वेगळा आणि चांगला विचार करायचा असेल तर दर्जेदार पुस्तकं वाचणं हेदेखील तितकंच आवश्यक आहे. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून आपल्याला क्षणार्धात एका उत्कृष्ट संगतीत घेऊन जाण्याची क्षमता या पुस्तकांत असते.

(माहिती संकलन- गजानन बुरडे)


तरुणांना आवडलेली
पहिली १० पुस्तकं


१७५ युवकांनी वाचलेल्या विविध पुस्तकांत एकूण ४२३ युनिक, वेगवेगळी नावे आलीत. त्यातील २०८ इंग्रजी, १९५ मराठी आणि २० हिंदी पुस्तके होती. अनेक युवांच्या वाचनात कॉमन असलेल्या अशा ‘पॉप्युलर’ पुस्तकांतील पहिली दहा नावं पुढील प्रमाणे. त्यात अर्थातच काही पुस्तकं इंग्रजी, काही अनुवादित आहेत.

१) अग्निपंख- डॉ. अब्दुल कलाम
२) मृत्युंजय- शिवाजी सावंत
३) श्यामची आई- साने गुरुजी
४) द अल्केमिस्ट- पाऊए कोएलो
५) एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर
६) माझे सत्याचे प्रयोग- महात्मा गांधी
७) श्रीमान योगी- रणजित देसाई
८)प्रकाशवाटा- डॉ. प्रकाश आमटे
९)द मॉँक हू सोल्ड हिज फेरारी- रॉबिन शर्मा
१०) ययाती- वि. स. खांडेकर


युवा पिढीचं उत्कृष्ट पुस्तकांचं वाचन कसं वाढेल यावर विशेष लक्ष द्यायची नक्कीच गरज आहे; पण अनेक तरुण मुलांचा प्रश्न असतो की वाचायचं नेमकं काय? कोणती पुस्तकं वाचावीत हे आम्हाला कुणी सांगतच नाही. त्यासाठी ‘निर्माण’चा हा एक प्रयत्न. युवकांनी जरूर वाचावीत अशा काही निवडक पुस्तकांची यादी निर्माणच्या वेबसाइटवर आहे. त्यांना ती यादी पुढील लिंक वर पाहता येईल..

http://nirman.mkcl.org/downloads.html

ज्यांना वाचनात विशेष रस आहे त्यांनी बिल गेट्सचा हा ब्लॉग पाहावा. त्यानं स्वत: वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहिलेला हा ब्लॉग आहे.

www.gatesnotes.com 

Web Title:  What do the Marathi youth read?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.