- अमोल दळवी

कोणीतरी माझ्यासाठी ठरवलेली जगण्याची रीत त्या दिवसापासूनच मी विवेक वापरून माझ्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेण्याचं ठरवलं.समाजाची रीत तर नाकारली, पण जीवन जगण्याची आणखी वेगळी पद्धत काय असते? याला आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचंय, असं जरी मी म्हणत होतो, तरी ‘वेगळं’ म्हणजे काय हे मला माहिती नव्हतं. ते शोधत शोधत मी ‘निर्माण’मध्ये पोचलो...

‘‘गणित छान जमतं की तुमच्या मुलाला! इंजिनिअरिंगला द्या टाकून.’’ ‘‘अहो! मी सांगतो तुम्हाला, बिनधास्त सरकारी डिप्लोमा कॉलेजला टाका.’’ ‘‘एक काम करा, मेकॅनिकल घेऊन टाका, त्याला मरण नाही. आपल्या पाहुण्यांची कंपनी आहे, तिथे लावून टाकू.’’ ‘‘डिग्री झाली की एमपीएससी-यूपीएससी तर सहज पास करेल तुमचा मुलगा, लगेच क्लास वन आॅफिसर!’’ - दहावी-बारावीत गेलेल्या मुलाच्या पालकांभोवती असलेला ‘आॅल टाइम करिअर कौन्सिलिंग’चे सल्ले देणारा जत्था माझ्याही आईबाबांना चुकला नव्हता. नाही नाही म्हणता मी इंजिनिअरिंगला गेलोसुद्धा ! कोणत्या शिक्षणाला ‘मार्केट व्हॅल्यू जास्त’ फक्त हे पाहून जेव्हा माझ्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, तेव्हा समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत वागण्याच्या मानसिकतेवर मला पहिला प्रश्न पडला. मग त्यापुढे जाऊन, शिक्षण-नोकरी-निवृत्ती हे चक्र ही विश्वासार्ह वाटेना. पुनर्जन्मात विश्वास ठेवणाऱ्यांपैकी मी नाही. मग मिळालेल्या आयुष्यात इतकं रुटीन आणि ठरलेलं (‘ठरवलेलं’ असं वाचा) आयुष्य जगण्यात काही मला सार्थक वाटेना. कोणीतरी माझ्यासाठी ठरवलेली जगण्याची ही रीत सर्वप्रथम मी नाकारली. खऱ्या अर्थाने, त्या दिवसापासूनच मी विवेक वापरून माझ्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेण्याचं ठरवलं. समाजाची रीत तर नाकारली, पण जीवन जगण्याची आणखी वेगळी पद्धत काय असते? ‘‘मला आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचंय’’ असं जरी मी म्हणत होतो, तरी ‘वेगळं’ म्हणजे काय हे काही मला स्पष्ट नव्हतं. इंजिनिअरिंगही नुकतंच संपलं होतं. वेगळं करण्याच्या नादात कॉलेजमध्ये प्लेसमेंटलाही बसलो नव्हतो. त्याचवेळी ‘निर्माण ६’ची प्रवेशप्रक्रि या सुरू झाली. ‘अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात असलेल्या युवांचा समूह’ म्हणजे निर्माण. जीवनाला अर्थ कसा द्यायचा, हा मनात रेंगाळणारा प्रश्न घेऊन मी ‘निर्माण’मध्ये आलो. मी कोणाचा? माझी समाजात कोणाला गरज आहे का? माझ्या शिक्षणाचा समाजासाठी काही उपयोग करता येईल का? जीवनाला अर्थ असावाच का? समाजोपयोगी कामं करताना मला जीवन अर्थपूर्ण वाटेल का? - असे बरेच प्रश्न ‘निर्माण’ने माझ्या पुढ्यात उभे केले. थोडा बेसिकपासून विचार करायला सुरुवात केली. मी तसा ठीकठाक आर्थिक परिस्थितीत-संस्कृतीत-भौगोलिक ठिकाणी-जाती-धर्मात जन्मलो. पण यासाठी मी कधी कष्ट (‘पुण्य’ असं वाचा) करायला गेलो नाही. याचवेळी मी समाजात असे काही घटक बघतो, ज्यांना त्यांचा जन्मच नकोसा वाटत असेल. पण त्यामागे त्यांची मागच्या जन्माची काही थकबाकी असेल, यावर माझा विश्वास नाही. थोडक्यात, मला मिळालेलं प्रिव्हिलेज किंवा त्यांना मिळालेलं दु:ख, ही असमानता एक अपघात आहे असं मी मानतो. म्हणून प्रिव्हिलेज न मिळालेल्या समाजातील तळागाळातील घटकांना त्यांचं आयुष्य थोड्या फरकाने सुसह्य करण्यासाठी मदत करण्यात मला माझ्या जगण्याचा अर्थ सापडतो. निंबकर शेतकी संशोधन संस्था (नारी) फलटण येथे तेव्हा नेमकीच एका इंजिनिअरची गरज होती. नारी ही संस्था ग्रामीण भागातील समस्यांवर तंत्रज्ञानाद्वारे उत्तर शोधण्याचे काम करते. एक वर्ष नारीत काम करत असताना ग्रामीण भागातील प्रश्न खूप जवळून बघायला मिळाले. फिल्ड टेस्टला गावातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसोबत झोपडीत केलेला स्वयंपाक, अंधाऱ्या झोपड्यांमध्ये त्या भूमिहीन-शिक्षणहीन लोकांच्या ऐकलेल्या समस्या हे सगळंच खूप काही शिकवणारं होतं. सामाजिक समस्यांसोबतची ही समोरासमोर भेट. ‘निर्माण’मुळे अशा भेटी पुन्हा पुन्हा होत गेल्या.. समाज, सामाजिक प्रश्न आणि मी स्वत: मला नव्याने समजत गेलो. गेल्या सात महिन्यांपासून मी ‘झुंज दुष्काळाशी’ या ‘निर्माण’च्याच उपक्र माचा समन्वयक म्हणून काम पाहतो. या उपक्र माअंतर्गत गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश दुष्काळग्रस्त भागांमध्ये प्रत्यक्ष जाता आलं. टीव्हीवर दुष्काळ पाहून हळहळ व्यक्त करणं आणि प्रत्यक्ष दुष्काळात त्या परिस्थितीचा अनुभव घेणं हा फरक मला अनुभवता आला. ऊसतोड कामगारांचा जगण्यासाठी संघर्ष, मरत चाललेली शेती, पाण्याविना जीवन, खचत चाललेली मानसिकता, गावागावांत वाढत चाललेला बकालपणा हे मूर्त स्वरूपात प्रत्यक्ष गावात जाऊन जेव्हा तुम्ही बघता, दुष्काळग्रस्तांशी बोलता तेव्हा काही निवडक समाजघटकांच्या जगण्यातली दाहकता समजते. आणि वर सांगितलेल्या निसर्गाच्या त्या अपघाताची चीड येते. ही चीडच मला या परिस्थितींना माझ्या परीने बदलण्यासाठी एक ऊर्जा देत राहते. शेवटी कोणी काळा कोणी गोरा राहीलच, कोणी गरीब कोणी श्रीमंत राहीलच, कोणी सवर्ण कोणी दलित आदिवासी राहीलच, कोणी मुंबई-दिल्लीत कोणी झारखंडमध्ये राहीलच हा अपघात कायमचा टाळता येणं तरी शक्य नाही. एकदा नायना (डॉ. अभय बंग) म्हणाले होते, ‘‘जशा जगात मी जन्माला आलो, तशा जगात मी अजिबात मरणार नाही.’’ - एवढी एक गोष्ट मी नक्की करू शकतो.