तरुणांच्या प्रयत्नानं शेतकऱ्यांच्या आयुष्यात हिरवा ओलावा..

- आॅक्सिजन टीम


डोंगरी माळरानावर असं पिकणार तरी काय? निसर्गानंही कायमच पाठ दाखवलेली.
पाऊस पडला तरी डोंगरउतारामुळे सारं पाणी कायम वाहून जातं. गावकरी पुन्हा कोरडेच.
यासाठी काय करता येईल? शासनानंही पुढाकार घेतला आणि कळवण तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला आणि चित्र हळूहळू पालटू लागलं.
कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा मुख्यत: आदिवासीबहुल भाग आहे.
पडणाऱ्या पावसाचे पाणी डोंगरउतारावरून वाहून गिरणा नदीला जाते. त्यामुळे या भागात ठराविक पिकांशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आजतागायत भात, नागली, वरई अशाच पद्धतीची पिके येथे घेतली जात होती.
निसर्गात समतोल राहावा, डोंगर खचू नये व त्यावर वृक्षसंवर्धन राहावे याकरिता शासनाने डोंगरांना ड्रिलिंग (छिद्रे) करून पावसाचे पाणी डोंगरात मुरवण्याची पद्धत अवलंबिली. याचा सर्वाधिक फायदा पश्चिम पट्ट्यातील गोसराने गावातील शेतकऱ्यांना झाला. पाणी डोंगरात मुरू लागल्याने आजपर्यंत कधी नव्हे ते चक्क भाजीपाल्याची शेतीही या परिसरात सुरू झाली आहे. 
मात्र हे हिरवे दिवस येण्याआधी त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्टही उपसले. त्यांनी मोठ्या कष्टानं लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली. डोंगरउतारावरुन वाहून जाणारं पाणी डोंगरातच अडलं जावं यासाठी प्रयत्न केले.
त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि हळूहळू परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे पाणी डोंगरात जिरवण्याचा हा उपक्रम सुरू आहे. 
डोंगर माळरानावर आता भाजीपाला पिकू लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यात नवनवीन प्रयोगही आता शेतकरी करीत आहेत.
गोसराने येथील शेतकरी गोपीनाथ साबळे यांनी प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर आपल्या तीन एकर शेतीत पाली या जातीचा हायब्रीड वाल लावला आहे. एकरी सहा किलोप्रमाणे १८ किलो पाली जातीचे बियाणे त्यासाठी लागले. बियाणांसाठी साधारणपणे नऊ हजार व इतर खर्च दहा हजार असा एकूण एकोणीस हजारांचा खर्च त्यांना आला. त्यातून चांगल्या मिळकतीची त्यांना अपेक्षा आहे. सध्याच्या दरानुसार सुमारे ४ ते ५ लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
बोडका डोंगर पाणीदार झाल्याने तरुण शेतकऱ्यांच्या आयुष्यातही आता हिरवा ओलावा निर्माण होत आहे.