गावठीपणाचा शिक्का पुसलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:02 PM2018-02-07T16:02:37+5:302018-02-08T08:46:01+5:30

शहरं भरभरून देतात, घ्यायचं काय हे आपण ठरवायचं!

Wasted seal! | गावठीपणाचा शिक्का पुसलाच!

गावठीपणाचा शिक्का पुसलाच!

Next

- अविनाश बाळू मोरे

अळसुंदे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातलं एक छोटसं गाव. वडील वारले तेव्हा वय अवघं सात वर्षं होतं. तेव्हापासून आई आणि मी, माझा लहान भाऊ जवळच्याच मामाच्या गावात राहात होतो. माझं दहावीपर्यंतच शिक्षण मामाच्याच गावात झालं. काहीतरी करायची जिद्द ठेवणारा प्रत्येकजण मोठ्या शहराकडे धाव घेतो तसा मी ही धावलो. जगणं घडवण्याची जिद्द बाळगून शहरात कॉलेजला जायचं ठरवलं.
घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी बार्शीला जायचा पर्याय निवडला. बार्शी तसं परवडणारं होतं. अकरावी-बारावीसाठी मी बार्शीत शिवाजी कॉलेजला प्रवेश घेतला. तो माझ्या शिक्षणाचा टर्निंग पॉइंट होता. छोट्याशा गावातून शहरात आल्यावर घरट्यातल्या पक्ष्याला आभाळाचं दर्शन झालं असंच म्हणावं लागेल. अभ्यासात थोडं दुर्लक्ष झालं म्हणून बारावीत मार्क्स कमी झाले; पण मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द अजून होती. राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करावा अशी मनात इच्छा होती; पण माझ्या आईच्या इच्छेखातर मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं.
त्यासाठी मला पुणे-मुंबईसारख्या शहरात जायचं होत; पण इथेपण आर्थिक बाजू नको म्हणाली. शेवटी मी कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजात प्रवेश घेतला. कोल्हापूर जरी महानगर असलं तरी आपल्या मातीशी जोडलेलं होतं. मराठीचं रांगडेपण या मातीत अजूनही जिवंत आहे. इथं आल्यानं मला मनासारखं वाट्टेल ते करायचं स्वातंत्र्य मिळालं होतं. मी भरभरून जगलो.
चार वर्षे होत आली. शेवटचं वर्ष हे करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं. इथं अडकला तर तो कायमचाच अडकतो. पण जर आपण ज्या उद्देशानं, जे मिळवायला इथं आलोय ते माझ्या लक्षात होतं. शेवटच्या वर्षात मोठ्या कंपनीत पदवी पूर्ण व्हायच्या आधी जॉबला लागणं हेच प्रत्येक इंजिनिअरचं स्वप्न असतं. मी गावातून आलेलो असल्यानं इथल्या शहरी मुलांच्या तुलनेत इंग्रजी भाषेत कमी पडायचो. इंग्लिश बोलता येत नसेल तर नामांकित कंपनीची स्वप्न सोडून द्यावी असा सगळ्यांचा सल्ला होता; पण मनात जिद्द पेटलेली होती. कॉलेजवर कॅम्प्स प्लेसमेंटसाठी येणारी पहिलीच मोठी कंपनी म्हणजे केपीआयटी. आपण याच कंपनीत प्लेस व्हायचं ही एकच जिद्द मनात ठेवून मी तयारी करत होतो. माझ्या तोडक्या-मोडक्या इंग्लिशची मित्र थट्टा करायचे; पण मी ठाम होतो. प्रयत्न करत होतो. माझ्या मोडक्या-तोडक्या इंग्लिशवर आणि मनातल्या जिद्दीवर शंभर विद्यार्थ्यांमधूनही मला नोकरी मिळाली. आईचं स्वप्न मी साकार केलं याचं मोठं सुख मनात होतं.
मोठ्या शहराकडे देण्यासारखं खूप असतं; पण आपल्याला काय पाहिजे हे आपणच ओळखायंच असतं. गावाकडचा पोरगा, गावराण भाषाशैली म्हणून गावठी असा टॅग मलाही सुरुवातीला लावण्यात आला. पण असा विचार करणाºया, स्वत:ला उच्चशिक्षित शहरी म्हणवून घेणाºयांकडे मी साफ दुर्लक्ष केलं. त्यांना आपल्या कर्तृत्वानेच उत्तर द्यायचं असा सकारात्मक विचार केला.
अळसुंदे ते कोल्हापूर अंतर तसं २५० किलोमीटरच, पण माझ्यासाठी हा प्रवास फार मोठा आणि महत्वाचा होता.
माझ्यासारखे कित्येकजण गावातून शहरात येतात. स्वत:ची ओळख निर्माण करतात. गावापासून दूर येतात; पण तरी आपल्या मातीची ओढ मनात कायमच असते. गाव मनात असतंच...
 

Web Title: Wasted seal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.