कोवळ्या वयातच डसणारं अनावर शारीरिक आकर्षण इतक्या पटपट मर्यादा का ओलांडतंय? कॉलेजातल्या, तरुणच नव्हे; शाळेतल्या कच्च्याबच्च्या मुला-मुलींच्या अस्वस्थ सिक्रेट जगात डोकावून पाहणारा खास अंक

आठवी-नववीची मुलगी.
अचानक बातमी येते की तिच्यावर बलात्कार झाला. वर्गातल्याच पाच-सात मुलांनी एकत्र येऊन केलेला बलात्कार.सगळे शाळेतून एकत्रच निघाले. एका ठरलेल्या ठिकाणी जमले. आणि तिथे नको ते घडलं.
सात-आठ दिवसांनी तक्रार झाली. पोलिसी चौकशीची चक्रं फिरली. दोषी मुलांना अटक झाली. 
समाजाला धक्का. गोंधळ. स्वाभाविक संतापाच्या बातम्या. निदर्शनं. निषेध.
- काही दिवसांनी कळलं, की प्रकरण एवढं साधं नाही. संतापाऐवजी काळजी वाटावी असं आहे. अधिक गंभीर आहे.
ती मुलगी त्या मुलांच्याच गटातली. व्हॉट्स अ‍ॅपचा ग्रुप. फेसबुकवर सगळे फ्रेंडस. व्हॉट्स अ‍ॅपची ग्रुप चॅट तपासल्यावर पोलिसांनाही धक्का बसला असले मेसेजेस आणि फोटो. शिवाय क्लिप्स.
कोवळ्या वयातलं शारीरिक आकर्षण, अनुभवाची घाई, चोरटेपणातलं थ्रिल आणि आईवडिलांपासून शिक्षकांपर्यंत सगळ्यांचीच नजर सहज चुकवता येण्याच्या सोयी... यातून तयार होणारी शक्यता कोवळ्या वयातल्या मुलामुलींच्या आयुष्यात कोणतं वादळ आणते आहे, याची ही घटना हा एक नमुना.
-अशा बातम्या आता नेहमी ऐकू येतात.
हे का असं होतंय? जबाबदार कोण आहे या अकाळी उकळीला? सोशल मीडिया? तंत्रज्ञान? नको एवढा खाजगीपणा देणारे पासवर्डस? की या मुलांशी तुटलेला संवाद? त्यांच्या आयुष्यात आलेल्या कंटाळ्याचा तवंग?
पोलिसांना काय ‘दिसतं’? हेल्पलाईन्स चालवणारे समुपदेशक कोणती ‘सिक्रेट्स’ जाणतात?
- हे सगळं सगळं शोधण्याचा प्रयत्न आॅक्सिजनने केला आहे. त्याचा हा पहिला भाग!!!

.................................................


सुटायचंय?
यातलं काही तुम्हाला माहितीये? तुम्ही काही अनुभवलंय? कधी अडकला आहात, नको त्या गुंत्यात?
मदत हवी आहे तुम्हाला त्यातून सुटण्यासाठी? - तर मोकळेपणाने विचारा प्रश्न,शेअर करा तुमचे अनुभव.पुढच्या भागात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करू!
नाव लिहू नका. लिहिलंत तरी ते गुप्त राहील याची खात्री बाळगा: oxygen@lokmat.com