VR - आभासी जग घडवण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 07:00 AM2019-01-03T07:00:00+5:302019-01-03T07:00:13+5:30

जे नाही त्याचा आभास निर्माण करणारं अजब तंत्रज्ञान. त्या नव्या दुनियेत शिरणं मात्र सोपं नाही.

VR - The opportunity to create a virtual world | VR - आभासी जग घडवण्याची संधी

VR - आभासी जग घडवण्याची संधी

Next
ठळक मुद्दे करमणुकीपासून सुरुवात होऊन अशक्यप्राय गोष्टी किमान भासरूपानं अनुभवण्यार्पयत अनेक कामांसाठी व्हीआर तंत्रज्ञान मोठय़ा प्रमाणावर वापरलं जाईल.

अतुल  कहाते  

व्हीआर हा शब्द हल्ली सतत कानावरून जातो. मराठीत त्याला सत्याभास म्हणता येईल. म्हणजेच अस्तित्वातच नसलेलं, प्रत्यक्ष नसलेलं काहीतरी ते आहेच असं वाटून आपल्याला अनुभवता येईल आणि ते आपल्याला अगदी खरं आहे असं वाटेल, अशी प्रतिसृष्टीच तयार करणारं हे व्हीआरचं तंत्रज्ञान. 
आपल्या दैनंदिन आयुष्यामधल्या अनेक गोष्टींसाठी व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. खासकरून जिथे आपल्याला कशाचा तरी आभास निर्माण करायचा असेल अशा ठिकाणी व्हीआर तंत्रज्ञान अगदी चपखल ठरतं. जेव्हा काही गोष्टी अशक्य असतील; पण भासातून आपल्याला त्याचा अनुभव कुणाला द्यायचा असेल तेव्हा हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरतं. उदाहरणार्थ हे तंत्रज्ञान वापरलं जाणारी यंत्रणा हेल्मेटसारख्या उपकरणामध्ये बसवून असं हेल्मेट आपण घातलं तर आपण आपल्या घरी नसून गोव्याच्या समुद्रकिनारी असल्याचा आभास निर्माण करता येईल. आपण जणू त्या समुद्रकिनारी फेरफटका मारत असल्याचा अनुभव आपल्याला मिळेल. साहजिकच करमणुकीपासून सुरुवात होऊन अशक्यप्राय गोष्टी किमान भासरूपानं अनुभवण्यार्पयत अनेक कामांसाठी व्हीआर तंत्रज्ञान मोठय़ा प्रमाणावर वापरलं जाईल.

हे भविष्यात महत्त्वाचे का ठरेल?


आता व्हीआर या तंत्रज्ञानाचे ‘ऑग्मेण्टेड रिअ‍ॅलिटी (एआर) आणि ‘मिक्स्ड रिअ‍ॅलिटी’ (एमआर) असे प्रकारही अस्तित्वात आले आहेत. व्हीआरमध्ये आपल्या खर्‍या भौतिक जगाचं अस्तित्व पूर्णपणे मिटवून टाकलं जातं. उदाहरणार्थ आपण व्हीआर तंत्रज्ञानासाठीचं उपकरण परिधान केलं की आपण पेंग्विन्सच्या थव्यामध्ये असल्याचा भास निर्माण केला जाईल. म्हणजेच आपल्याला आपल्या सभोवताली पेंग्विन्स दिसायला लागतील आणि आपण त्यांच्याबरोबर चालत आहोत असं आपल्याला वाटेल. 
एआर तंत्रज्ञानामध्ये आपल्या आजूबाजूला असं काहीतरी असल्याचा भास तर निर्माण केला जाईलच, पण शिवाय त्याला कॅमेरा किंवा स्मार्टफोन यांच्यासारख्या उपकरणांची जोडही दिली जाईल. ‘पोकेमॉन गो’ हा मध्यंतरी अत्यंत लोकप्रिय झालेला गेम हे याचं ठळक उदाहरण आहे. यात आपण जिथे असू त्या परिसरात काहीतरी अवतरलं असल्याचा भास निर्माण केला जातो. तसंच समजा आपण घरीच गोव्याच्या समुद्रकिनार्‍याचा दृश्य अनुभव घेत असू तर आता आपल्याला पायी चालताना गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावरच्या वाळूवर चालण्याचा अनुभवसुद्धा मिळेल. एमआर या तिसर्‍या तंत्रज्ञानामध्ये व्हीआर आणि एआर या दोन्ही तंत्रज्ञानांचा समावेश होतो. याखेरीज या तंत्रज्ञानांमधल्या गोष्टी एकमेकांशी संवादसुद्धा साधतील. म्हणजे वरच्या उदाहरणामध्ये बागेमधल्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या गेममधला पक्षी पक्षीभाषेत बोलत असल्याचा भास आपल्याला होईल! 

हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?

सर्वसाधारणपणे व्हीआर तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली चार कौशल्यं महत्त्वाची मानली जातात. 
त्यामधलं पहिलं कौशल्य ‘नेटिव्ह अ‍ॅप डेव्हलपमेंट’ म्हणून ओळखलं जातं. यात आभास निर्माण करण्यासंबंधीचं सॉफ्टवेअर लिहिलं जातं. यासाठी त्रिमितीय दृश्यांविषयीच्या संकल्पना स्पष्ट असाव्या लागतात. याखेरीज ‘युनिटी’सारखं एखादं सॉफ्टवेअरही वापरावं लागतं. त्यामधले प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी जावास्क्रिप्टसारखी भाषा यावी लागते. 
दुसरं कौशल्य ‘सिनेमॅटिक व्हीआर क्रिएशन’चं असतं. यात खास कॅमेरांचा वापर करून दृश्य टिपलं जातं. चित्रपट, मालिका वगैरेंमध्ये भन्नाट दृश्यं दाखवण्यासाठी हे लागतं. यासाठी खास एडिटर सॉफ्टवेअर मिळतं. ते शिकून घ्यावं लागतं. त्यात फक्त 360 अंशांचंच नव्हे तर त्रिमितीय दृश्यं टिपणं शक्य होतं. म्हणजेच समजा आपण हातात कॅमेरा घेऊन ही दृश्यं टिपत चाललो तर अशी त्रिमितीय चित्रफीत आपल्याकडे तयार होते. त्यात आपण आपल्याला हवी असलेली त्रिमितीय दृश्यं मिसळू शकतो. म्हणजेच खरोखर टिपलेली दृश्यं आणि इतर दृश्यं यांची अत्यंत सहजपणे सरमिसळ करता येते. 
चौथं कौशल्य ‘वेब डेव्हलपमेंट’चं असतं. यामध्ये आपण वापरत असलेल्या वेबसाइट्समध्ये व्हीआरचा वापर करून आभासी दृश्यं मिसळली जातात. उदाहरणार्थ फेसबुकवर असताना आपण ‘व्हीआर शॉपिंग’ करू शकतो. यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हीआरवर काम करणं हे एकटय़ा माणसाच्या क्षमतेपलीकडचं असतं. यासाठीच्या प्रकल्पावर अनेक लोकांची टीम एकत्र काम करते. त्यामधल्या निरनिराळ्या लोकांची कौशल्यं वेगवेगळी असतात. म्हणजेच आपल्या कौशल्याला पूरक असलेली इतर कौशल्यं इतरांकडे असतात आणि सगळ्यांची एकत्रित कौशल्यं मिसळून व्हीआरचा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.

रोजगाराच्या संधी कोणत्या?

1) व्हीआर आणि त्याच्याशी संबंधित असलेलं तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी शिकणं तसं सोपं नाही. याचं कारण म्हणजे या तंत्रज्ञानामध्ये अनेक क्षेत्रांमधल्या संकल्पनांचा वापर केला जातो. त्यात गणित, अभियांत्रिकी, प्रोग्रॅमिंग, कला, दृश्यकला अशा अनेक मुद्दय़ांचा समावेश होतो. म्हणजेच अशा सगळ्या गोष्टींसंबंधी एक व्यापक दृष्टिकोन असलेला माणूसच या क्षेत्रात तग धरू शकतो. 
2. ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं असेल त्यांच्यासाठी हे क्षेत्र जास्त सोयीचं ठरतं. अर्थातच इंजिनिअरिंगमध्ये अनेक तांत्रिक विषयांची ओळख झालेली असल्यामुळे आणि गणिती  संकल्पना जास्त स्पष्ट झालेल्या असल्यामुळे हे घडतं. इतर पदव्या घेतलेल्यांनाही गणिताची सखोल पाश्र्वभूमी असेल तर त्यांना हे जमू शकतं. 
3. गणित इंजिनिअरिंग, त्रिमितीय संकल्पना हे समजून घेण्याला ज्यांना अडचणी येत असतील त्यांनी मात्र या क्षेत्राकडे वळू नये. ज्यांना कलात्मक अंगानं या क्षेत्रात यायचं असेल त्यांचा याला अपवाद असतो. 

Web Title: VR - The opportunity to create a virtual world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.