गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले हा प्रश्न का छळतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:07 PM2018-11-15T17:07:53+5:302018-11-15T17:14:13+5:30

इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणींचे सांगाडे आहेत. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच रुजता येत नाही. ही तुझी अडचण आहे.

village or city, what pulls you? a small town conflict | गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले हा प्रश्न का छळतो ?

गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले हा प्रश्न का छळतो ?

Next
ठळक मुद्देदिवाळीचे चार दिवस गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले असा छळणारा प्रश्न सांगणारं एक स्वगत.

- अरु ण तीनगोटे

गाव बदलत नाही.  गाव पुढं सरकत नाही.  गाव धूळभरल्या रस्त्यांची साथ सोडत नाही.  माणसं सोडून गेलेली मोडकळीस आलेली घरं कुणाची वाट पाहतात समजत नाही.. दारातला प्राजक्त आता बहरत नाही. गावात आता पूर्वीची रया नाही. नुसता फुफाटा आणि धुराळा आहे. गावातल्या म्हातार्‍या दिवसेंदिवस अधिक जख्ख म्हातार्‍या होत जात आहेत. भुवयांचे आणि पापण्यांचे केस पांढरे झालेल्या म्हातार्‍या आपल्या चेहर्‍याकडे निरखून पाहतात; पण तरी ताळमेळ लागत नाही. आपण आपली ओळख करून दिली तरी ती त्यांना पटतेच असं नाही. म्हातारी चेहर्‍याकडे असं पाहते जणू ती तिचाच तरुण भूतकाळ आपल्यात शोधते आहे. 
कुबडय़ा घेऊन चालत राहणार्‍या आजीला सांग की,   तू आमक्याचा तमका आहेस. तुमच्या शेजारी राहायचो. तिच्या पाया पड. ती तुला आशीर्वाद देईन. तिला विचार, तू कशी आहेस? अजून तरी बरी आहे, असं ती म्हणेन.   
त्याचा अर्थ लावू नको. त्याचा अर्थ शोधू नको. तिला काही देऊ नको. तिच्याकडे काही मागू नको. तुझा भूतकाळ शोधू नको. नवं नातं बांधू नको. 
गाव तुला तसंच दिसत असलं तरी आतल्या उलथापालथी तुला समजतीलच असं नाही. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच जाता येत नाही. ही तुझी अडचण आहे. आणि  गावात किंवा शहरात असलेल्या कुठल्याही अडचणीपेक्षा ही मोठी अडचण आहे. 
गाव वाढत चाललं आहे. सर्वत्न जंगी घरं बांधली जात आहे. गावच्या मातीचा वास सीमेंटच्या वासात हरवून जात आहे. 
तुझं जुनं घर इथं शोधू नकोस. 
इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणीचे सांगाडे आहेत. 
आणि तसंही तुझं मन अधांतरीच होतं आणि आहे. पोपडे आलेल्या भिंतींना पोतेरं मारणार्‍या आईचं थकलेलं शरीर, संध्याकाळी घरी येणार्‍या बापाचा आराम शोधणारा देह, दारातलं मोठं गुलमोहराचं झाड, त्याच्या वाळलेल्या शेंगा, त्याला उन्हाळ्यात  येणारी लालबुंद फुलं किंवा त्याची नाजूक हिरवी पानं, त्या गुलमोहरावर फक्त कावळ्यांचीच वस्ती का असायची.? 
शेजारच्या घरातील मांजरीचं  पिल्लू, बकरीच्या दुधात गुळाचा चहा बनवणारी शेजारची मावशी, त्यांनी झाडावर पाळलेलं माकड, संध्याकाळी थकून आल्यांनतर गणित  शिकवण्याचा प्रयत्न करणारा बाप.. 
ही अशी वाढत जाणारी रांग थांबणार नाही. 
पण तू थांब. 
परत मागे फिर. 
शहराकडे चालायला लाग. 
हे गाव तुला पुन्हा कुशीत घेणार नाही आणि तू मेला तरी शहराचा होणार नाहीस. 
तुझी मुळं शोधणं कठीण आहे..

 

Web Title: village or city, what pulls you? a small town conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.