वनपिंगळा

By अोंकार करंबेळकर | Published: May 31, 2018 10:40 AM2018-05-31T10:40:17+5:302018-05-31T10:40:17+5:30

घुबड म्हटलं की लगेच शुभ-अशुभ संकेत अनेकांच्या डोक्यात वळवळतात. पण कोल्हापूरच्या गिरीश जठारनं अभ्यासाचा विषय म्हणून घुबडाचीच निवड केली

On the trail of Forest owl - Girish Jathar | वनपिंगळा

वनपिंगळा

Next


घुबड असं नुस्तं म्हटलं तरी आपल्याकडे नाक मुरडलं जातं. हा बिचारा पक्षी अनेक गैरसमजुतींमुळे उपेक्षित राहिला आहे. मात्र निसर्गाच्या अन्नसाखळीतील हा महत्त्वाचा पक्षी या गैरसमजांमुळेच अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्याच्या अस्तित्वावरच या गैरसमजांनी आणि मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपाने अतिक्रमण केले आहे. मूळच्या कोल्हापूरच्या गिरीश जठारने वनपिंगळा म्हणजे फॉरेस्ट आऊल या पक्षालाच अभ्यासाचा विषय म्हणून निवडलं. कोल्हापूरमध्ये शिकत असताना त्याच्या स्काउटचे कॅम्प्स राधानगरी अभयारण्य, आंबा घाट, विशाळगड, पन्हाळा अशा ठिकाणी जायचे. त्यामुळेच निसर्ग भ्रमंतीची आवड निर्माण झाली. एकदा चांदोली अभयारण्यात फिरायला गेला असताना गिरीशची एका मित्राशी ओळख झाली. या मित्राने त्याच्या पुढच्या आयुष्याची दिशा बदलेल अशी एक भन्नाट मदत त्याला केली. ती म्हणजे तो मित्र त्याला कोल्हापुरातील विश्व प्रकृती निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ)च्या कार्यालयात घेऊन गेला. इथे त्याला माहितीचा मोठा खजिनाच मिळाला. तिथले अधिकारी सुनील करकरे यांच्या मार्गदर्शनामुळे त्याला पक्षीअभ्यास या विषयाची आवड निर्माण झाली. नववी ते बारावी या तीन वर्षांमध्ये त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मोठ्या अभयारण्यांमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि इथेच त्याच्या पक्षी अभ्यासाचा पायाही पक्का झाला.
दहावीनंतर त्याच्या पक्षी अभ्यासाचे वेड सतत वाढतच गेलं त्यामुळे त्यानं याच विषयात करिअर करायचे निश्चित केलं. या विषयात करिअर करण्याचे दोन मार्ग होते. पहिला मार्ग वनविभागात नोकरी करण्याचा आणि दुसरा वन्यजीव अभ्यासक होणं. गिरीशने दुसरा पर्याय निवडला कारण त्यानं वन्य अभ्यासकांबद्दल वाचलेल्या पुस्तकांचा त्याच्यावर विशेष परिणाम झाला होता. सलीम अली, फार्ले मोवाट, रेमण्ड डिटमार्स, जेन गुडाल अशा थोर वन्यप्राणी अभ्यासकांची पुस्तकं वाचल्यामुळे त्याच्या मनामध्ये वन्यजिवांबद्दल ओढ निर्माण झाली होती. यासर्व करिअरबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याचे पालक साशंक होते मात्र त्यांनी त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला व शक्य ती सर्व मदतही केली.

याच पक्षीअभ्यासाचा त्याला पुढे मोठा फायदा होणार होता तो म्हणजे वनपिंगळा प्रकल्प. वनपिंगळा म्हणजे फॉरेस्ट आऊल हा पक्षी नामशेष झाल्याचं समजलं जात होतं. पण २५ नोव्हेंबर १९९७ रोजी जवळ जवळ ११३ वर्षांनी अमेरिकन पक्षाअभ्यासक बेन किंग आणि पामेला रॅसम्युसेन यांना तोरणमाळच्या संरक्षित जंगलामध्ये हा पक्षी अस्तित्वात असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर आॅक्टोबर २००१मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे वनपिंगळ्याचा अभ्यास सुरू करण्यात आला. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आणि मेळघाटामध्ये या पक्ष्यांचे अस्तित्व असल्याचं या अभ्यासातून समजलं. या दोन्ही जंगलांमध्ये वनपिंगळ्याची ९८ संख्या असल्याचं लक्षात आलं. वनपिंगळा सापडणं हे आनंदाची गोष्ट असली तरी या अभ्यासातून गिरीश आणि सर्व अभ्यासकांच्या लक्षात आलं ते म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे वनपिंगळ्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. तोरणमाळमध्ये जंगल तोडून जंगलाच्या जागेवर अतिक्रमण करणं, जळणासाठी सरपण गोळा करण्यासाठी झाडं, फांद्या तोडणं, भोंदूबाबांकडून तंत्रविधी करण्यासाठी वनपिंगळ्याची अंडी पळवली जाणं असे प्रकार या जंगलांमध्ये भरपूर होत असल्याचे दिसलं. तसेच काही लोक जंगलाला मुद्दाम आग लावत असल्याचेही त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर वनपिंगळ्याची नेहमीची ठिकाणं, घरं शोधून, अंडी घातलेली ठिकाणं शोधून त्या भागामध्ये मानवी हस्तक्षेप होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले. स्थानिक रहिवासी तसेच आदिवासी यांनाही वनपिंगळ्याचे संरक्षण करण्यासाठी विनंती करून त्या पक्ष्याची माहिती देण्यात आली. दीर्घकाळाचा विचार झाल्यास वनपिंगळ्यासारखा अन्नसाखळीतील महत्त्वाचा पक्षी वाचण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकेल.

गिरीश सध्या क्लायमेट चेंज अ‍ॅण्ड हिमालया प्रोग्राम या बीएनएचएसच्या मोहिमेत काम करत आहे. हिमालयातील फेजंट आणि फिंच पक्ष्यांवर हवामान बदलाचा होणारा अभ्यास तसेच बेंगाल फ्लोरिकन पक्ष्याचा ईशान्य भारतातील विस्तार, संवर्धन, ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील संकटात सापडलेल्या पक्ष्यांचा अभ्यास अशा विविध प्रकल्पांमध्ये तो सहभागी आहे. तसेच ENVIS Centre on Avian Ecology (पर्यावरण माहिती प्रणाली - पक्षी अभ्यास) बीएनएचएससाठी प्रकल्प संघटक म्हणून काम करतो. याबरोबर तो सीसीआयएल म्हणजे कॉन्झर्वेशन आॅफ सेंट्रल इंडियन लॅण्डस्केप या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. त्यानं मुंबई विद्यापीठात प्राणिशास्त्रात पीएच.डी. पदवीही प्राप्त केली असून, त्याच्या अभ्यासावर आधारित ३८ शोधनिबंध विविध नियतकालिकांमध्ये, अहवालांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तो स्पेसिज सर्वायवल कमिशन, आययूसीएन अ‍ॅण्ड सिनिअर रिसर्च असोसिएट, ग्लोबल आऊल प्रोजेक्ट यूएसए यांचाही तो सदस्य आहे.
गिरीश म्हणतो, ‘या सगळ्या कामातून मिळणा-या आनंदाचा विचार केला तर आपण या आवडीच्या निसर्ग क्षेत्रात काम करण्याचा घेतलेला निर्णय एकदम बरोबर ठरला असं वाटतं. कदाचित भरपूर पैसे मिळवणारी कामं मिळाली असती किंवा आजही मिळतील; पण सध्या मिळत असलेला आनंद व समाधान त्या कामांमध्ये मिळणार नाही. या क्षेत्रामध्ये तुमच्या कौशल्याची कसोटी लागते; पण स्वत:ला खरोखर समजून घ्यायचे असेल तर यासारखं दुसरं क्षेत्र नाही !’

वनपिंगळा राहतो कुठं?
वनपिंगळा संधीप्रकाशातही भक्ष्य शोधू शकतो. सागाची झाडं असणाऱ्या थोडे गवताळ पट्टेही असलेल्या जंगलामध्ये वनपिंगळा राहातो. पाली, उंदिर, लहान पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक हे त्याचं भक्ष्य. आॅक्टोबर ते मे हा वनपिंगळ््याचा विणीचा हंगाम असतो. झाडांच्या ढोलींमध्ये किंवा झाडांमध्ये तयार झालेल्या पोकळ भागांमध्ये वनपिंगळ््याची मादी अंडी घालते. पिलं मोठी होईपर्यंत नर वनपिंगळा खाद्य आणणं, आपल्या हद्दीतील परिसराचं, अंड्यांचं रक्षण करणे अशी कामं करतो. अंड्यातून पिलं बाहेर आली की दोघंही खाद्य आणून पिलांना भरवण्याचं काम करतात.

Web Title: On the trail of Forest owl - Girish Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल