Towards the dream .. | स्वप्नाच्या दिशेनं..

-डॉ. रोशनकुमार पाटील

मी अभिनव बालविकास मंदिर, नाशिक येथे मराठी माध्यमातून शिक्षण घेत होतो. इयत्ता चौथी म्हणजे स्कॉलरशिप. माझी तब्येत साधारण. स्कॉलरशिपच्या अभ्यासाचे ओझे पेलवले जाणार नाही म्हणून या परीक्षेला बसू द्यायचे नाही, असा आईचा अट्टाहास. पण अभिनव बालविकास शाळेचे तांदळेसर यांनी मला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवण्याबद्दल आई-वडिलांची समजूत घातली. मला परीक्षेला बसवले गेले. या परीक्षेअगोदर सावित्रीबाई फुले म्हणून रुंग्ठा हायस्कूलला परीक्षा होती, तिचे स्वरूप स्कॉलरशिपच्या परीक्षेसारखेच असल्याने पूर्वतयारी म्हणून ही परीक्षा घेतली जायची. ती परीक्षाही मी दिली. परीक्षेच्या निकालाची तारीख दिली गेली. त्या दिवशी मी माझे आई-वडील असे रुंग्ठा हायस्कूलला गेलो. तेथे निकाल ऐकण्यासाठी बरीच गर्दी. कोणी चारचाकी, कोणी दुचाकीवर आलेले. आम्ही या गर्दीत हरवून गेलो. आपला नंबर वैगेर नसणार म्हणून शेवटी एका कोपºयात स्थिरावलो. शेवटी निकाल जाहीर झाला. माझा पहिला नंबर आला होता. आम्हाला स्टेजवर बोलावले गेले. सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळचा तो क्षण आम्ही कदापिही विसरू शकणार नाही. पुढे स्कॉलरशिपची मुख्य परीक्षा झाली. निकालाच्या दिवशी पहाटे वडिलांना दूरध्वनी आला की रोशन जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सर्वांना आनंद झाला. त्यावेळी मात्र आई-वडिलांची खात्री झाली की हा शिक्षणात मागे नाही. पुढेही वर्गात पहिला येण्याचा मान मी सोडला नाही.

मी एनटीएस नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेला उत्तीर्ण होऊन स्कॉलरशिपला पात्र ठरलेलो होतोच. मला सीईटी या परीक्षेला चांगले गुण प्राप्त झाल्याने मला कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. मी माझ्या निर्णयाने मुंबईमधील केईएम या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. नाशिक सोडून मुंबई गाठली. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी नाशिक शहरातील सर्व नामांकित डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यात डॉ. राज नगरकर यांनीही मला चांगले मार्गदर्शन केलं. मी एम.डी. या पदव्युत्तर शिक्षणासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे प्रवेश घेतला. कॅन्सर या रोगावर अभ्यास करू लागलो. आज मितीस मी तीन वर्षे कालावधीचे कॅन्सर या रोगावर शिक्षण घेऊन रेडियशन अ‍ॅन्कोलॉजी या विषयात एम.डी. झालोय.

एक प्रसंग सांगतो, साधारण ५ ते ६ महिन्यापूर्वी जोडून सुट्टी होती म्हणून मी एकदा आई-वडिलांना भेटण्यासाठी नाशिकला यायचं ठरवलं. तिकीट आरक्षित करून ठेवलं. बॅग घेऊन टाटा हॉस्पिटलमध्ये आलो. तोच एक माता तिच्या मुलाला घेऊन टाटा हॉस्पिटलमध्ये आली. मी तिच्या मुलाची परिस्थिती जवळून पाहिली. त्याला तत्काल उपचारांची गरज होती. नाशिकचं तिकीट रद्द केलं आणि कामाला लागलो.
स्थलांतराच्या या प्रवासात असे कर्तव्याचे क्षण जागोजागी भेटले. माझे आई-वडील, बहिण डॉ. धनश्री, डॉ. भाग्यश्री सोबत होतेच. आमच्या घराण्यात कोणीही डॉक्टर नसताना मला माझ्या वडिलांनी त्यांच्या लेखनिक या पेशात न अडकवता मला डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू दिलं..

त्या प्रवासाचा आनंद आहे.