- बालाजी सुतार

मोबाइलचं झेंगट - ग्रामीण भागातल्या मुलामुलींच्या हातात मोबाइल आले, मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप आले,चॅटिंग आले, ते बोलत सुटले, जे ‘दिसतं’ ते पाहत सुटले. लोक म्हणतात, पोरंपोरी बिघडले. पण बिघडले, ते नेमके कुणामुळे? कशामुळे?

वर्षभरापूर्वी फक्त मुलींच्या शाळेत एका कार्यक्रमाचा पाहुणा म्हणून गेलो होतो. कार्यक्र मात पालकांचाही सहभाग असणार होता. तिथे कार्यक्र माच्या आधी मुख्याध्यापिका बार्इंच्या कार्यालयात चहा पिताना बाई म्हणाल्या, 
‘आज तुम्ही मनाशी काय ठरवलं असेल ते भाषण कराच, पण त्यासोबत ‘मुलींना स्वतंत्र मोबाइल फोन देऊ नका’ असंही सांगा पालकांना.’ 
मी जरासा चकित झालो. मग बाई म्हणाल्या, ‘काय आहे, या वयात मुलींच्या हाती फोन असल्यामुळे बरेचसे नको ते प्रश्न उद्भवत आहेत. मुली परस्पर मुलांशी बोलत असतात. कधी तास चालू असतानाही गुपचूप मेसेजेस पाठवत, वाचत असतात. मोबाइलमुळे वाईट वळण लागू शकतं या अडनिड्या वयातल्या मुलींना.’
मी माझ्या भाषणात असं काही आवाहन केलं नाही; पण ही अशी परिस्थिती खरोखर प्रत्यक्षात आहे, हे मला माहीत होते.
एकदा एक ज्येष्ठ मित्र भेटले. ते वैतागून आणि संतप्त होऊन सांगत होते, ‘तो अमका तमका वाह्यात पोरगा माझ्या मुलीच्या मागे मागे चालतो रस्त्याने. शाळेत तिच्याच वर्गात आहे. पण बाहेरही कुठे क्लासला किंवा आणखी कुठे जातानाही तिचा पाठलाग करतो. त्याच्या बापालाही सांगून पाहिलं, काही फरक नाही.’ 
योगायोगाने तो पोरगा माझ्या थोड्याशा परिचयातला होता. एके दिवशी भेट झाली तेव्हा मी त्याला माझ्याकडे बोलावलं. तो आल्यावर इतर काहीबाही बोलत त्याच्याशी ‘तो’ विषय काढला तेव्हा तो बोलायचा गप्प झाला. मग मी त्याला त्याचं (आणि तिचंही) वय केवढं लहान आहे, या वयात त्याने अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे वगैरे गोष्टी समजुतीच्या सुरात सांगितल्या. 
तेव्हा बराच वेळ गप्प बसलेल्या त्या मुलाने त्याचा स्मार्टफोन काढला आणि त्यातली फोटो गॅलरी उघडून मला काही फोटो दाखवले. ते त्याच्या वाढदिवसाचे होते आणि त्या प्रत्येक फोटोत ती मुलगी त्याच्याशी सलगीने उभी होती. एकमेकांना केक भरवणं वगैरे. तो म्हणाला, आमचं प्रेम आहे. 
दहावीतला मुलगा. दहावीतलीच मुलगी. ते फोटो पाहून मीच गप्प झालो. प्रयत्न म्हणून आणखी काहीबाही वेगवेगळ्या पद्धतीने बोलून पाहिलं की, तुझं हे एकतर्फी नाहीये हे चांगलं आहे, पण तुमचं हे जे काही चालू आहे त्यासाठी हे वय योग्य नाही. नीट अभ्यास करा, मोठे व्हा, मग तुमचे निर्णय तुम्ही घेऊ शकालच, वगैरे. त्याला कितपत पटलं माहीत नाही, पण आम्ही असं वागू असं त्यानं कबूल केलं.
तालुक्याच्या गावात वरिष्ठ महाविद्यालयात शिकवणारा एक प्राध्यापक मित्र आहे. त्याचं कॉलेज गावाच्या बरंच बाहेर आहे. कॉलेजच्या भोवतीने सगळी शेतं आहेत. तो म्हणाला, ‘साली या शेतातली पिकं वाढली की एक नवंच झेंगट लागतं आमच्या मागं.’ 
मी विचारलं, ‘कसलं झेंगट? शेतातल्या पिकांचा आणि तुमचा काय सबंध?’ तो म्हणाला, ‘लक्ष ठेवावं लागतं पोरापोरींवर. फोनवर बोलत बोलत वेगवेगळ्या दिशेनं पिकात शिरतात एकदम.’ मी म्हणालो, ‘हे असं सरसकट कसं म्हणू शकतोस यार तू?’ तो म्हणाला, ‘सरसकट नाही म्हणत, पण असं एकदोन वेळा झालं आहे. त्यामुळे प्रत्येकानं याबाबतीत लक्ष ठेवावं, असा आम्हाला संस्थेचाच खासगीत आदेश आहे.’
संस्थेची भीती अगदी अल्प प्रमाणात का होईना रास्तच आहे, असं मला वाटून गेलं.
***
तीन वेगवेगळे प्रत्यक्षात घडलेले प्रसंग आहेत, ज्यांचा तत्काळ-सारांश मुला-मुलींच्या हाती मोबाइल देऊ नये, असा काढता येईल. यामुळे हे दुखणं संपेल का, असा प्रश्न तरीही निर्माण होतोच. मोबाइल हातात नव्हते तेव्हा कोवळ्या वयातली प्रेमप्रकरणं होत नव्हती काय, असा दुसरा प्रश्नही उत्पन्न होऊ शकतो. मोबाइलमुळे मुलामुलींना सहज (आणि गुप्त) संपर्काचं एक प्रभावी माध्यम उपलब्ध झालेलं आहे हे खरंच आहे, पण मुद्दा इथे संपत नाही.
वयाच्या त्या त्या टप्प्यावर उसळून किंवा उमलून येणाऱ्या नैसर्गिक ऊर्मी ही गोष्ट या सगळ्याचं मूळ आहे, हे विसरून चालणार नाही. त्या वयात अपरिहार्यपणे शरीरात होणारे बदल आणि त्यातून प्रकट होणाऱ्या मानसिक-शारीरिक भावना यांना कशा पद्धतीने हाताळावे किंवा किमान नियंत्रित करावे, याचं काहीही शिक्षण आपल्या मुलामुलींना आणि अर्थातच पालकांनाही नसतं, यातून हे प्रश्न निर्माण होतात. आपल्याकडे शाळा-महाविद्यालयांतून लैंगिक शिक्षण देण्याबाबत नेहमीच बोललं जातं, पण प्रत्यक्षात त्या पातळीवर परिणामकारक असं काहीही घडताना दिसत नाहीय.
फोनवरून सहज साधता येणारा संपर्कआणि स्मार्टफोनच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमातून सर्व प्रकारचं यलो लिटरेचर अगदी पोर्न मूव्हीजसकट केवळ बोटांच्या स्पर्शाच्या अंतरावर येऊन बसलेलं असताना कोवळ्या वयातल्या मुलांची काळजी करावी अशीच परिस्थिती आहे, हे खरे आहे. पण आजच्या वेगाने शहरीकरण होत असलेल्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींकडे मोबाइल असणं ही आता नुसती चैनीची गोष्ट नाही, तर एक आवश्यक गरजही झालेली आहे. या धकाधकीच्या काळात विस्तारलेल्या शहरातली घरापासून शाळा-कॉलेजेसपर्यंतची अंतरं, त्या दरम्यान उद्भवू शकणारे अपघातासारखे धोके लक्षात घेतले तर मुलांशी पटकन संपर्क करता येईल अशी उपकरणे त्यांच्याकडे असू देणे ही एक महत्त्वाची गरज आहे. हातातून फोन काढून घेणे हा उपाय होऊ शकत नाही. 
मात्र ‘कुठल्याही गोष्टी’त स्मार्टफोनच्या वापरापासून एकूण स्वातंत्र्याचा, आई-वडील आपल्यावर टाकत असतात त्या विश्वासाचा, नात्यांदरम्यानच्या धाग्यांचा, कोवळ्या वयातल्या निसरड्या वळणाचा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो हेही त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. आई-बाबांसोबत मुलांचं नातं कितपत मोकळं आहे, यावर बऱ्याच गोष्टी आधारलेल्या असतात. अर्धवट कोवळीकीतून येणाऱ्या वेगाचं, स्वत:तल्या ‘वेगळेपणाच्या’ कल्पनेचं, अगदी शरीरसंबंधातल्या अनावर ओढीचं आणि एकूणच जगण्यातलं दुसऱ्या टोकाचं थ्रिल या गोष्टींवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येणं शक्य होईल.
‘नियंत्रण’ हा शब्दही तितकासा योग्य नाही. पण ‘संस्कार’ या शब्दाला फार पारंपरिक वास येतो म्हणून ‘नियंत्रण’.
‘संवाद’ हीच एकमेव गोष्ट कुठल्याही समस्येच्या सोडवणुकीकडे घेऊन जाणारी असते, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं होऊ शकेल. 

.......................
(लेखक ग्रामीण प्रश्नांचे अभ्यासक, ख्यातनाम कवी आहेत.majhegaane@gmail.com)