इथं संघर्ष अटळ आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:55 PM2018-07-12T15:55:54+5:302018-07-12T15:56:00+5:30

पुण्यात आलो. फसलो, फसवलो गेलो, पण मागे हटलो नाही.

The struggle here is inevitable ... | इथं संघर्ष अटळ आहे...

इथं संघर्ष अटळ आहे...

Next
ठळक मुद्देनवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. चांगलं-वाईट कळतं, दिसतं, अनुभवायला येतं.

- महेश रणमाळे

मी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोर्‍हाळे या छोटय़ाशा गावचा. परिस्थिती खूपच हालाखीची. जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आईबाबांसोबत गहू विकायला जायचो, नाशिकला. रस्त्यावर उभं राहून गहू विकायचो, रात्री तिथंच झोपायचो. अशा परिस्थितीत शिकलो. दहावी झालो.
वडिलांना वाटायचं, मुलगा मोठा झाला. हाताशी आला. पण आईला वाटायचं मुलानं शिकावं. आपल्यासारखी वेळ त्याच्यावर यायला नको. तिनं मला अहमदनगरला मामाकडे शिकायला पाठवलं. मामाच्या गावी, हॉस्टेलवर राहून डिप्लोमा पूर्ण केला. तिथं आजीनं व मोठय़ा मामानं मला फार जीव लावला. नंतर मी लोणीला जाऊन इंजिनिअरिंग केलं. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झालो. इकडे बहिणीच्या लग्नासाठी वडिलांना होतं ते शेतही विकावं लागलं.
इंजिनिअर झाल्यावर मी पुण्यात आलो नोकरीच्या शोधात. 2008 साल. सगळीकडे जागतिक मंदीची चर्चा. खूप प्रयत्न करून एक जॉब मिळाला. पुढं लग्न झालं. बरं चाललं होतं. त्याच काळात एका मित्रानं सांगितलं तुला विदेशात नोकरी मिळवून देतो. खूप आशेला लावलं. इण्टरव्ह्यूपण अरेंज करून दिला. निवड झाली. मी हातातला जॉब सोडला. आणि मग कळलं की, तो मित्रच खोटा होता. त्यानं मला फसवलं होतं. फार वाईट वाटलं; पण पुन्हा नोकरीच्या शोधात प्रयत्न केले. वाईट दिवस असे अनुभव देऊन गेले. आता मी एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उत्तम पदावर काम करतो. कामानिमित्त विदेश दौरापण करून आलो. आता पुण्यात स्थिरावलोय. पुण्यासारख्या शहरात आपलं घर व्हावं हे स्वप्न मनात आहे. पूर्वी एकटा होतो आता या संघर्षात माझी पत्नी अर्चना उत्तम साथ देते आहे.
मी हा लेख लिहिला कारण माझा अनुभव म्हणतो की, नवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. चांगलं-वाईट कळतं, दिसतं, अनुभवायला येतं.  आपल्याला भेटणारे सगळेच लोक चांगले असतात असं नाही. त्यात आपण एका छोटय़ा खेडय़ातून आलेलो असतो. साधे असतो. त्याचा लोक फायदा घेतात. कुठलाही निर्णय घेणं ही परीक्षा आहे. आता मी एकच सांगतो, कुठलाही निर्णय मोठय़ा शहरात विचारपूर्वक घ्या. मोठय़ा शहरात कोण फसवणूक करेल सांगता येत नाही. 
आणि तसं झालं तरी आपण आपला संघर्ष आणि मेहनत सोडायची नाही.
 

Web Title: The struggle here is inevitable ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.