एकटीने राहण्याच्या प्रयोगातले काही धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:17 PM2019-01-10T15:17:22+5:302019-01-10T15:19:02+5:30

मी ज्या इमारतीत राहात होते, तिथं कामाला असलेला वॉचमन माझ्याकडे येणार्‍या पाहुण्यांना कुतूहलानं विचारत असे, जवान लडकी अकेली क्यू रहती हैं? - मी करतेय तो प्रयोग इतका ‘सहज’ नाही; हे हळूहळू कळत गेलं!

Some life Learning Experiences- alone but lonely. | एकटीने राहण्याच्या प्रयोगातले काही धडे

एकटीने राहण्याच्या प्रयोगातले काही धडे

Next
ठळक मुद्देएकटी! ..एकाकी नव्हे!

प्राची  पाठक 

- तर आता, माझी गोष्ट!
मी प्राची.
ज्या वयात तरुण मुलामुलींच्या मागे घरीदारी लग्न करा, लग्न करा असा तगादा लागलेला असतो, त्या वयात मी सुखासुखी एकटीने राहायचा प्रयोग केला.
शिक्षणाचा एक टप्पा संपला होता. पहिली नोकरी लागली होती आणि ती सुटलीसुद्धा होती. मग वेगळ्या प्रकारचं करिअर आखणं एकीकडे सुरू होतं आणि दुसरीकडे हा एकटं राहून बघायचा प्रयोग. 
शिक्षणासाठी, नोकरीसाठी, लग्न झाल्यावर जोडीने असताना लोकांनी एकेकटं राहणं वेगळं आणि अगदीच तरु ण वयातल्या एकटय़ा मुलीनं असे प्रयोग करणं वेगळं. त्यात ‘मैं घर छोड के जा रही हूं’ प्रकारचा आईवडिलांसमोर केलेला ड्रामासुद्धा नव्हता. म्हणजे, कोणी विरोध केला की आणखीनच खुमखुमी येईल स्वरूपाचा. पण तसंही काही फारसं नव्हतं. 
अर्थात घरी काही विरोध नाही, सगळा सपोर्टच तर आहे मग काय प्रॉब्लेम आहे, इतकं सहजही नव्हतं म्हणा काही.
पण तरी जमलं, जमवलं खरं तर!
मग लक्षात यायला लागलं, एकटं राहात असताना खूप गोष्टींचं भान ठेवायला लागतं. आपल्या कमाईत एकटय़ानं घर घेऊन राहाणं तर आणखीनच आव्हानात्मक असतं. त्यात मी काही आयटीवाली नव्हते की वजनदार पॅकेजच्या नोकर्‍या सुरुवातीलाच मिळतील असंही काही नव्हतं. त्यामुळे आहे त्या कमाईत सगळं भागलं पाहिजे हे भान आणि आपल्याला अगदीच बोगस ठिकाणी जाऊन राहायचं नाहीये ही तगमग, अशी ती कथा होती. घरांची शोधाशोध, लोकांचे प्रश्न, भाडय़ानं घर मिळवण्यात कराव्या लागणार्‍या टेक्निकल गोष्टी, असं सगळं हळूहळू शिकत गेले. आपलं शहर सोडून दुसर्‍या शहरात राहायला आले. माझा तो एक प्रौढीने सांगायचा प्रोजेक्टच होता बराच काळ. 
पण मी ज्या इमारतीत राहात होते, तिथं कामाला असलेला वॉचमन माझ्याकडे येणार्‍या पाहुण्यांना कुतूहलानं विचारत असे, जवान लडकी अकेली क्यू रहती हैं? 
जवळची माणसं मला कधी सहजच हे सांगत असत तेव्हा मला कळत गेलं की हा इतका सहज असा प्रयोग नाही. ‘मुलीच्या जातीला अमुक तमुक अवघडच’ प्रकारचे डायलॉग ऐकणं आणि सहन करणं म्हणजे काय असतं याचा जिताजागता अनुभव मी तेव्हा घेतला! खरं तर माझ्या मनात काहीच अवघड नव्हतं; पण लोकांची दृष्टी अनेक प्रकारची असू शकते, याचं भान मला या प्रसंगानं दिलं. 
साधारण आधुनिक, नव्या विचारांच्या मुली स्वयंपाक करतच नाहीत, असा एक समज असतो; पण आपल्या पायावर उभं राहाणं आणि स्वतर्‍पुरता किमान स्वयंपाक करता येणं ही खरं तर जेन्डरपलीकडची गोष्ट असते. तुम्ही मुलगा असा की मुलगी की थर्ड जेंडर, बेसिक असा स्वयंपाक तुम्हाला आलाच पाहिजे. तुम्ही तो रोजच्या रोज करायचा की नाही, कोणाकडून करून घ्यायचा की नाही तो तुमचा प्रश्न. स्वयंपाक करणं, तो आवडीनं किंवा नावडीनं करणं, जेवणं हे सगळे मुद्दे वेगळे आहेत. आपल्या बेसिक जगण्यासाठी तरी उत्तम-पौष्टिक अन्न आपल्या पोटात जाण्यासाठी, स्वच्छतेचं भान रुजण्यासाठी आणि स्ट्रेस बस्टर म्हणूनसुद्धा स्वयंपाकाकडे बघता येतं. ते आपल्याला बरंच काही देतं, आपलं सेल्फ मेड असणं असं इथून सुरू होतं.
आपल्याला आयुष्यात नेमकं करायचं काय आहे, ैहा प्रश्न आपला आपल्याला कालांतराने सुटत जातो. पण आपण नेमके आहोत तरी कोण, काय क्षमता आहेत आपल्या, आपल्या हिमतीवर काय दर्जाचं आयुष्य आपण जगू शकतो, ते सुंदर कसं करता येईल, हे आकळण्याचा राजमार्गच ठरला हा प्रयोग माझ्यासाठी.
 मन रमवायला अनेक सुंदर गोष्टींमध्ये तुम्ही गुंतू लागता. वाटेल तेव्हा लोकांमध्ये जाता, वाटेल तेव्हा आपल्या सुखी एकटय़ा बेटावर परत! जबाबदार स्वातंत्र्य ही काय चीज असते, ते आपलं आपल्यालाच समजून घेता येतं. 
आर्थिक भान येतं. आपल्या गरजा नेमक्या कळतात. नात्यांचे गुंते कसे आणि कितपत झेपतील आपल्याला याची स्पष्टता येते. ‘आजकाल माणसं फार स्वकेंद्रित होत चालली आहेत’, अशी एक एकांगी ओरड आपण सतत सर्वत्र ऐकत असतो. पण व्यक्तिकेंद्रितपणासुद्धा अत्यंत उमदा, जबाबदार आणि हेल्दी असू शकतो, ते इतरांना कळणार तरी कसं?
त्याचं उत्तरं हेच की, ते अशा वेगळ्या वाटेने जाणार्‍या, रसरसून जगणार्‍या लोकांमुळेच शक्य होऊ शकतं! स्वकेंद्रित असणं म्हणजे आत्ममग्न असणं नाही आणि स्वार्थी असणं तर अजिबातच नाही, हे मला नीटच समजलं. हे सारं या एकटं राहाण्यातून आपोआप उलगडत गेलं.
 आपले बरेवाईट अनुभव म्हणजेच जगाबद्दलचं सार्वत्रिक आणि अंतिम सत्य नसतं. एखाद्या गोष्टीला अनेक पैलू असतात. आपल्याला जे वाईट वाटतं ते कोणासाठी सुंदर असू शकतं. एकच कोणती बाजू अंतिम सत्याची बाजू नसते, अशा अनेक जगाबद्दलच्या आणि सेल्फ रीअलायझेशनच्या गोष्टी मी माझ्या एकटं राहून बघायच्या प्रयोगात प्रत्यक्ष जगूनच शिकले! एकटं असणं म्हणजे एकाकी असणं नसतं, हा एक डायलॉग फार प्रचलित असला तरी तो अर्थपूर्ण आत्मभानाकडे नेणाराचा आहे.

1. एकटं राहाण्याचा निर्णय घेतल्यावर आपण कसे राहातो, आपल्या गरजा काय आहेत यावरदेखील मी खूप विचार करत गेले. 
2. आपण तयार करत असलेला घरातला कचरासुद्धा एक असेट होऊ शकतो, कमाईचे साधन होऊ शकतो, ते ही मला या प्रयोगातच कळलं. 
3. मी ज्या ज्या गोष्टी वापरत असे, त्यांचे नीटच ऑडिट करून कमीत कमी सामानात जगायला शिकले. दोन जीन्स आणि चार टॉप्सवरसुद्धा इच्छा कॉम्प्रोमाइझ न करता मजेत राहाता येतं हे लक्षात आलं.
 4. तसं जगून बघितल्यावर जगण्यातला सुटसुटीतपणा अंगवळणी पडला. मिनिमलिस्टिक लाइफ स्टाइल म्हणजे आवडी-निवडीला मुरड घालणं नाही, हे मी समजून घेतलं. आपण तयार करत असलेला रोजचा कचरा विकूनसुद्धा आपल्याच लहान -मोठय़ा गरजा भागतात, ते कळल्यावर मी त्या विषयाच्या आणखीन खोलात गेले. 
5. मानवी मलमूत्र व्यवस्थापन हीसुद्धा एक ज्ञान शाखा असते, हे मला कळलं. आपल्या ओंजळीत मावेल इतका आहार आपल्याला पुरेसा असतो, याचं भान त्या शिक्षणाने मला दिलं. आपण जे आणि  जितकं खातो आणि त्यातून जे बाहेर पडतं, त्यात जे न्यूट्रिअन्टस असतात, तेच पुन्हा आपल्या गरजेइतकं अन्न मातीत उगवायला पुरेसे असतात, असाही विचार याच प्रवासात मला मिळाला.
एकटं राहाणं असं समृद्ध होण्याची वाट दाखवत राहिलं.
 

Web Title: Some life Learning Experiences- alone but lonely.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.