- मुक्ता चैतन्य

सोशल मीडियाचा
आपल्या मनावरच नाही
तर आरोग्यावर आणि वर्तनावर
काय परिणाम होतोय हे सांगणारा
विशेष अंक.

संदर्भ : रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ या ब्रिटिश संस्थेने प्रसिद्ध केलेला ‘स्टेट्स आॅफ माइण्ड’ हा अभ्यास.

तू फेसबुकवर आहेस का?
- चालू वर्तमानकाळात या प्रश्नाइतका निरर्थक प्रश्न दुसरा कुठलाही नसेल. आपण एकमेकांशी ज्या पद्धतीने बोलतो, संवाद साधतो, कम्युनिकेट करतो ती पद्धतच सोशल मीडियाने बदलून टाकली आहे. ओळखीच्याच काय अनोळखी माणसांशीही कनेक्ट होण्याच्या पद्धती झपाट्यानं बदलत आहेत. आजच्या आपल्या आयुष्यातून सोशल मीडिया वजा करताच येऊ शकत नाही.
एकमेकांशी गप्पा मारण्याच्या, भांडण्याच्या, प्रेम करण्याच्या, कनेक्ट होण्याच्या, टीपी करण्याच्या सगळ्याच पद्धती बदलत आहेत. पूर्वी जी मजा तरुण मुलांना कट्ट्यांवर येत होती आज ती मजा कदाचित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये किंवा फेसबुकवर येते. फरक एवढाच की पूर्वी कट्ट्यावर फक्त ओळखीचीच माणसं, दोस्त होते आता सोशल मीडियात पूर्णत: अनोळखी माणसांशीही गप्पा, चर्चा, भांडणं, दोस्ती, वाद आणि दिलखुलास संवाद होऊ शकतो. इथं अनोळखीची माणसं एकमेकांच्या संपर्कात येतात, बोलतात, व्यक्त होतात, काही नवी नाती निर्माण होतात. काही तुटतात.
पण या सोशल मीडियाचे जसे अनेक फायदे आहेत तसेच धोकेही आहेत. सगळ्यात मोठा धोका म्हणजे सोशल मीडियाचं व्यसन. दारू आणि सिगरेटपेक्षा हे व्यसन गंभीर आहे आणि त्याचे परिणामही अत्यंत गंभीर आहेत असं आता मानसोपचारतज्ज्ञही सांगत आहेत.
फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट, यू-ट्यूब, इन्स्टाग्राम या साºयांचा मिळून जो सोशल मीडिया बनतो, त्यांचा वापर जगभरात तरुण मुलंच जास्त करतात. परिणामी या माध्यमाचे बरेवाईट परिणाम अर्थातच तरुण मुलांचा जास्त होतात.
रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ या ब्रिटिश संस्थेने अलीकडेच एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले. ‘स्टेट्स आॅफ माइण्ड’ हा हॅशटॅग वापरून प्रसिद्ध झालेला हा अभ्यास.
तरुणांचं मानसिक आरोग्य आणि सोशल मीडिया यांचा परस्पर संबंध काय आणि कसा आहे हे या संशोधनानं तपासून पाहिलं. ‘स्टेट्स आॅफ माइण्ड - सोशल मीडिया अ‍ॅण्ड यंग पीपल्स मेण्टल हेल्थ अ‍ॅण्ड वेलबिइंग’ या नावानं प्रसिद्ध झालेला हा रिपोर्ट बºयाच गोष्टींचा उलगडा करतो.
सोशल मीडिया वापरानं तरुणांच्या आरोग्यावर होणारे परिणाम, ताण, काळजी, एकटेपणा, झोप, अभिव्यक्ती, स्वओळख, बॉडी इमेज, समूह बांधणी, आॅनलाइन बुलिंग आणि फोमो या साºया गोष्टींविषयी तरुण मुलांना काय वाटतं, त्यांचे अनुभव काय याबाबत बराच तपशील हा अभ्यास सांगतो.
या अभ्यासात सोशल मीडिया व्यासपीठाच्या संदर्भात तरुण मुलांना चौदा प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांच्या आधारे कुठलं माध्यम मानसिक आरोग्याला हानिकारक आहे आणि कुठले त्यामानाने उपयोगी आहे याचीही उकल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हा अभ्यास ब्रिटनमधला असला तरी तो प्रतिनिधित्व करतो जगभरातल्या तरुण मुलांच्या सोशल मीडिया वापराच्या सवयींचं, परिणामांचं आणि दुष्परिणामांचंही.
म्हणूनच त्या अभ्यासावर आधारित हा विशेष अंक.
तो आपल्यासमोर आरसा धरतोय तपासून पाहू सोशल मीडिया आपलं नक्की काय करतोय ते...

संकलन-लेखन
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

४ भयानक गोष्टी ज्या तुम्हाला छळतात..

१) सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मोठ्या प्रमाणावर झोपेची समस्या निर्माण होत आहे. पुरेशी झोप झाली नाही तर त्यामुळे उद्भवणा-या शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही त्यामुळेच सुरुवात होते आहे.
२) आयुष्यात आलेलं नैराश्य घालवण्यासाठी, कंटाळा घालवण्यासाठी अनेकजण सोशल मीडियाकडे बघतात; पण सोशल मीडिया मनाची निराशा घालवू शकत नाही. उलट सतत हे माध्यम वापरल्यानं आपलं स्वाथ्य कमी होतं आहे. निराशा दाटते, आपण एकटे पडू, आपल्याला गोष्टी समजणार नाहीत या असुरक्षित वाटणाºया भावना बळावत चालल्या आहेत.
३) एरवी आपण ज्या विषयांबद्दल फारसं बोलत नाही ते दोन विषय म्हणजे शरीराचा स्वीकार आणि आॅनलाइन जगतात चालणारं बुलिंग. सोशल मीडियावर एखाद्याला त्रास देणं, एखाद्याच्या फोटोवर असभ्य कमेंट टाकणं असे प्रकार सर्रास होतात. त्याचा परिणाम वापरकर्त्यांच्या स्वत:च्या शरीराच्या कल्पनांवर होतो. बहुतेकदा तो नकारात्मक होतो. त्याचप्रमाणे बुलिंग आणि ट्रोलिंगमुळे प्रचंड मानहानी आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
४)फिअर आॅफ मिसिंग आउट अर्थात फोमो हा एक मानसिक आजार आहे. आपण जर सोशल मीडियाावर नसू तर आपण अनेक गोष्टी मिस करू अशी भीती वाटणं, आपण मागे पडू असं वाटणं, आपण स्पर्धेत नाही, पुढे नाही असं वाटणं अनेकांच्या मनात मूळ धरतं. ते होऊ नये म्हणून सतत सोशल मीडियावर असणं हा अजून एक अतिशय गंभीर प्रकार आहे.

५ गोष्टी सोशल मीडियानं केल्या सोप्या

१) आता माहितीला तोटा नाही, मी माहितीपासूनच वंचित राहिलो, मला माहितीच नाकारली, असं कुणी म्हणू शकत नाही. सोशल मीडियानं माहिती सा-यांसाठी खुली केली.
२) आरोग्याचे प्रश्न, तज्ज्ञ डॉक्टर, आजारांविषयीची माहिती, योग्य औषधोपचारांची माहिती, स्वमदत ग्रुप्स या साºयाची माहिती सोशल मीडियामुळे आपल्यापर्यंत सहज पोहचू शकते. आरोग्याच्या प्रश्नांविषयी जनजागृतीला मदत.
३) गंभीर आजार, मानसिक आजार, समुपदेशन यासाठीचे स्वमदत ग्रुप, माणसं सोशल मीडियानं जोडली गेली.
४) अनेकांना मोकळेपणानं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आता व्यक्त होणं, ते प्रसिद्ध करणं ही कुणाचीही मक्तेदारी उरलेली नाही.
५) आपल्याच कुटुंबाशी, मित्र परिवाराशी अनेकांचा आॅनलाइन कनेक्ट वाढला. बोलणं सुरू झालं.

* १६ ते २४ वयोगटातले ९१ टक्के तरुण- तरु णी सोशल नेटवर्किंग साइट्स वापरतात.

* सिगारेट आणि दारूपेक्षाही भयंकर दुष्परिणाम करणारं आणि जास्त अ‍ॅडिक्टिव्ह असं हे माध्यम आहे.


* पुरेशी झोप न होणं, सततचा ताण, नैराश्य आणि अस्वस्थता यांचा संबंध थेट सोशल मीडियाशी आहे.

* सरासरी १० पैकी ७ तरुण-तरुणींना तरुण सायबर बुलिंग अर्थात आभासी जगातल्या मानसिक छळाला सामोरं जावं लागतं.

* सोशल मीडियात झालेल्या ओळखीचं अनेकदा मैत्रीत रूपांतर होतं, मानसिक आधार मिळतो असं तरुण यूजर्स सांगतात. मानसिक आधारासाठी सोशल मीडियाचा वापर अनेकजण करतात.