Snake friend | सापांचा दोस्त
सापांचा दोस्त

तुम्हाला वाटतं का रानावनात फिरावं, प्राणी-पक्ष्यांचं निरीक्षण करावं, नदीत पोहावं, झाडावर चढावं..
वाटतं ना, पण वेळ असतो कुणाकडे? तुम्ही एमबीए, बीई करताय; पण डोक्यात काहीतरी भलतंच असं होतं का कधी?
होत असेल तर या अक्षयची गोष्ट तुम्हाला नक्की आपलीशी वाटेल.
अक्षय खांडेकर हा तुमच्या आमच्या सारखाच साधासुधा मराठी मुलगा. सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या हिवतड गावचा. आटपाडी परिसर तसा दुष्काळाच्या झळा बसलेला. त्यामुळे गावच्या आसपास डोंगर, रानंवनं असली तरी लोडशेडिंगमुळे टीव्ही ही वस्तू बहुतांश घरात तशी निरुपयोगीच; पण ज्या वयात खेळ सोडून मुलं टीव्हीसमोर जाऊन बसतात त्या वयात अक्षयला घराबाहेर जाऊन डोंगरावर भटकायची आवड लागली. तिकडे जाऊन पक्षी पाहात बसा, किटक-मुंग्यांचं निरीक्षण करणं हे याचे छंद. जरा मोकळा वेळ मिळाला की अक्षय चालला डोंगरावर. नंतर नंतर शाळेला जातोय असं सांगूनही रानात-डोंगरात फिरायला त्याने सुरुवात केली, पण हे बिंग फुटलं. एकेदिवशी ही 'आवड' घरी समजलीच. शाळेला बुट्टी मारुन मुलगा डोंगरात फिरायला जातोय हे लक्षात आल्यावर त्याच्या आई-बाबांनी व्यवस्थित 'समजावलं'ही त्याला. शेवटी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी आटपाडीला पाठवायचं ठरवलं.


तालुक्याच्या गावी गेल्यावर अक्षयचं डोंगरावर फिरणं कमी झालं, पण त्याच्या हातात आला पुस्तकांचा खजिना. आटपाडी जवळच्याच माडगूळचे सुपुत्र आणि ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर. तात्यांची पुस्तकं त्याला लायब्ररीमध्ये सापडली. आपल्याच भागामधील एका लेखकाने रानावनात भटकून मिळवलेल्या अनुभवांवर आधारित पुस्तकं त्याला प्रेरणा देणारी ठरली. माडगूळकरांच्या जोडीला मारुती चितमपल्ली, अतुल धामणकर यांच्या पुस्तकांनीही त्याचं निसर्गज्ञान वाढवलं. वाचनामुळे त्याच्या निसर्गओढीला एक प्रकारची दिशा मिळाली. आपली फिरायची-भटकायची आवड योग्य दिशेने वाढवली तर त्यातूनही काहीतरी चांगलं करता येऊ शकते हा विचार घेऊनच तो जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगलीला कॉलेजमध्ये गेला. आपल्या मुलानेही इंजिनिअर, डॉक्टर व्हावं असं त्याच्या पेशाने शिक्षक असणाºया बाबांनाही वाटायचं. त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते; मात्र तोपर्यंत वन्यजीवांच्या अभ्यासातच करिअर करायचं अक्षयने निश्चित केलं होतं. अशाही क्षेत्रामध्ये काम करता येतं हे त्याच्या आई-बाबांच्या गावीही नव्हतं. पण त्याची आवड पाहून त्यांनी त्याला वन्यजीव क्षेत्रात करिअर करण्यासाठी परवानगी दिली. सांगलीत कॉलेजमध्ये शिक्षण घेताना अक्षयने डेहराडूनच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया, नॅशनल सेंटर आॅफ बायोलॉजिकल सायन्स (बंगळुरू) अशा संस्थांची माहिती मिळविली. तेथे शिक्षण मिळू शकते याची जाणीव त्याला झाली.
हिवतडला असल्यापासून अक्षयला पाली, सरडे, साप अशा सरपटणाºया प्राण्यांचंही निरीक्षण करायची आवड होती. म्हणून त्यानं सापांवरच अभ्यास करायचं ठरवलं. या अभ्यासात त्याच्या लक्षात आलं ब्लाइंड स्नेक्सवर फारसा अभ्यास झालेला नाही. ब्लाइंड स्नेक म्हणजे मराठीत वाळा म्हणून ओळखल्या जाणाºया सापांवर त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. हे ब्लाइंड स्नेक्स आपल्या फारसे परिचयाचे नसतात. हे साप जमिनीच्या खाली राहतात तसेच ते प्रामुख्याने निशाचर असतात. त्यात त्यांचे डोळे त्यांच्या डोक्यावरच्या खवल्यांच्या खाली लपलेले असल्यामुळे ते बहुतांशवेळेस लोकांना दिसत नाहीत, त्यामुळे त्यांना ब्लाइंड म्हणजे अंध साप म्हटले जाते. गांडुळांसारखे दिसणारे हे अंध साप रात्री आणि जमिनीखाली फिरत असले तरी माणसाचे ते मित्र आहेत. वाळवी, वाळवीची अंडी, वाळवीच्या अळ्या खाऊन ते पोट भरतात. ब्लाइंड स्नेक्ससारखा दुर्लक्षित विषयाचा अभ्यास करणाºया अक्षयला भविष्यात सरड्यांचाही अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्रातील कोरड्या दुष्काळी प्रदेशामध्ये असणाºया सरड्यांवर अधिक माहिती मिळवून त्यात संशोधन करण्याची इच्छा असल्याचे तो सांगतो.
अक्षय सांगतो, 'भारतामध्ये या ब्लाइंड स्नेक्सच्या फक्त २१ जाती आढळतात. २१ पैकी फक्त दोनच जातींचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे. उर्वरित १९ जातींचा अभ्यास फारसा झालेला नाही किंवा ते फारसे दृष्टीस पडलेले नाहीत. ब्लाइंड स्नेक्सवर ब्रिटिशांनी साधारणत: १०० वर्षांपूर्वी काम केलेलं होतं. त्यावर फारसे संशोधन झाले नसल्यामुळे या विषयाचं काम करणं आव्हानचं होतं.’ पण अक्षयने याच आव्हानात्मक मूळचे कोल्हापूरचे असणारे प्रसिद्ध सरिसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी आणि स्वप्निल पवार यांची त्याला या अभ्यासात मदत झाली. सध्या तो बंगळुरुमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर इकॉलॉजिकल स्टडिजमध्ये संशोधन करतो आहे.
 


Web Title: Snake friend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.