आकाशातून समुद्रात! 'हे' असं सगळं करायची विलक्षण क्रेझ उफाळली आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 07:00 AM2019-01-17T07:00:00+5:302019-01-17T07:00:07+5:30

जे काही आयुष्य उपभोगायचंय ते आत्ताच, या हव्यासानं तरुणाईला झपाटलंय. तो झपाटा त्यांना घाम गाळायलाही भाग पाडतो आहे.

From the sky to the sea! The 'crazy' crazy thing to do when you are young! | आकाशातून समुद्रात! 'हे' असं सगळं करायची विलक्षण क्रेझ उफाळली आहे!

आकाशातून समुद्रात! 'हे' असं सगळं करायची विलक्षण क्रेझ उफाळली आहे!

Next
ठळक मुद्देसमुद्राच्या लाटांवर तुम्हाला स्वार होता येत नाही; पण एकदा का ते स्किल तुम्ही आत्मसात केलं, तर त्याची झिंग काही आगळीच.

   -समीर मराठे  

तशीही साहसाला कुठलीच मर्यादा नाही, ना वेळेची, ना वयाची! दुनियेला आग लागो, नाहीतर जगबुडी होवो, मला जे करायचंय ते मी करणारच ही जिद्द जेव्हा मनाच्या कप्प्यात खोलवर जाऊन रुजते त्यावेळी माणसं झडझडून उठतात आणि स्वतर्‍चीच परीक्षा पाहत शारीरिक ताकदीच्या मर्यादेवर मात करत सुटतात. सध्या अनेक तरुण हेच करताना दिसताहेत.  जे काही आयुष्य उपभोगायचंय ते आत्ताच, या हव्यासानं तरुणाईला झपाटलंय. तो झपाटा त्यांना घाम गाळायलाही भाग पाडतो आहे. अनेकजण स्वतर्‍लाच चॅलेंज करताहेत, ते  चॅलेंज स्वीकारण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची त्यांची खुमखुमी वाढते आहे. 

 

पॅराग्लायडिंग
पॅराग्लायडिंगचा थरार तुम्हाला आकाशात पक्षाप्रमाणे विहार करण्याचा अनुभव देतं. अवकाशात असताना आपल्या मुव्हमेन्ट कशा कन्ट्रोल करायच्या याबद्दलचं जुजबी प्रशिक्षण त्यासाठी तुम्हाला घ्यावं लागतं. हा अनुभव घेताना प्रशिक्षित ट्रेनर तुमच्या सोबत असतो; पण तरीही सेफ्टी मेजर्स आवश्यक. भारतात लडाख, कामशेत, दार्जिलिंग, सोलांग, बिलिंग आणि गोव्यात ही सुविधा उपलब्ध आहे.

रिव्हर राफ्टिंग
आपली छोटीशी बोट घ्यायची आणि पाण्याच्या अरुंद घळीमध्ये सोडून द्यायची. वेगानं जाणारं पाणी वेडंवाकडं ज्या दिशेनं जाईल त्या दिशेनं आपणही बोटीवरचा बॅलन्स सांभाळत पुढे जायचं. अतिशय धोकादायक आणि साहसी असा हा खेळ आहे. त्यासाठीचं प्रशिक्षण तर तुम्हाला हवंच, पण सुरक्षेच्या बारीकसारीक गाइडलाइन्सही तुम्हाला पाळाव्या लागतात. हार्डकोअर अ‍ॅडव्हेंचर म्हणून या खेळाची गणना होते. भारतात मनाली, ऋषिकेश, कुर्ग, झन्सकार आणि ब्रrापुत्रेच्या खोर्‍यात हा अनुभव आपण घेऊ शकतो. 

बंजी जम्पिंग
आपल्यापैकी अनेकांनी ‘पडण्याचा’ अनुभव घेतला असेल; पण ‘फ्री फॉल’चा अनुभव घ्यायचा तर त्यासाठी तुम्हाला बंजी जम्पिंगच करावं लागेल. शून्य गुरुत्वाकर्षण अर्थात झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव तुम्हाला इथे मिळेल. घोटय़ाला अतिशय मजबूत, लवचीक आणि भला मोठा दोर बांधून अतिशय उंचीवरून तुम्हाला खाली उडी मारायची असते. खाली पडताना तुमच्या पोटात आणि हृदयात जी काही बाकबुक होते आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलेली असतानाही ‘आता संपलो आपण’ ही जी मनाची स्थिती होते, त्या थराराचा अनुभव म्हणजे बंजी जम्पिंग. कमजोर हृदयाच्या लोकांनी या अनुभवाच्या फंद्यात पडू नये. अनेकजण मोठय़ा हिमतीनं, उसनं अवसान आणून जिथून उडी मारायचीय त्या उंचीवर तर पोहोचतात; पण त्या टोकावर नुसतं उभं राहिलं तरी जे काही गरगरायला लागतं आणि नानी आठवते, त्यानंच बरेच जण परत फिरतात आणि खाली येऊन गुपचुप बसतात. पण ज्यांनी हा अनुभव घेतलाय, त्यांच्यासाठी ते त्यांच्या आयुष्यातलं आजवरचं सर्वात मोठं थ्रिल असतं. ऋषिकेश, गोवा, दिल्ली आणि बंगळुरू इथे बंजी जम्पिंगच्या उत्तम साइट्स आहेत. 

हेली स्किइंग
हा खेळ तसा तुलनेनं नवीन, पण तरुणाईत तो झपाटय़ानं लोकप्रिय होतोय. ‘हेली स्किइंग’ हा ‘हेलिकॉप्टर स्किइंग’चा शॉर्ट फॉर्म. अत्यंत महागडा खेळ, पण ज्यांच्या खिशात पैसे खुळखुळताहेत त्यांच्यासाठी मात्र हा उत्तम पर्याय आहे. हिमालयीन आणि इतर बर्फाळ पर्वत रांगांत, जिथे कुठल्याही वाहनानं तुम्ही सहजासहजी पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी अतिशय बर्फाळ अशा जागी हेलिकॉप्टरनं पोहोचायचं आणि बर्फाच्या त्या पांढर्‍या शुभ्र गादीवर स्किइंगचा आनंद लुटायचा. विंटर स्पोर्ट्स म्हणून हा खेळ ओळखला जातो. अतिशय अनुभवी आणि अ‍ॅडव्हान्स्ड स्किअर्सच या ठिकाणी स्किइंग करू शकतात. काश्मीरमधील गुलमर्ग, मनाली आणि हिमाचल प्रदेशात आपल्याला हा अनुभव घेता येऊ शकतो. 

वॉटरफॉल रॅपलिंग
अतिशय वेगळा आणि हटके असा हा प्रकार आहे. निसर्गाच्या कुशीत आणि पर्वतावरून कोसळणारे धबधबे हे प्रत्येकाच्याच आकर्षणाचं केंद्र आहे. या खेळाचं वैशिष्टय़ म्हणजे या धबधब्यात, पाण्याच्या उसळत्या प्रवाहात, या पाण्याला मागे टाकत रॅपलिंग करायचं. एकीकडे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य न्याहाळतानाच आपल्या क्षमता पणाला लावण्याचं चॅलेंज स्वीकारायचं. आजकाल तरुणाईचा या प्रकाराकडे ओढा खूप मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. कर्नाटकातील कुर्ग आणि महाराष्ट्रातील विहिगाव येथे हा अनुभव आपण घेऊ शकतो.

स्नॉर्केलिंग
स्कुबा डायव्हिंगसारखाच थोडासा हा प्रकार. तोंडाला ऑक्सिजन मास्क आणि पायात फिन्स घालून समुद्राच्या पोटात शिरायचं. समुद्राच्या पोटातलं सौंदर्य निरखायचं असा विलक्षण अनुभव स्नॉर्केलिंगमध्ये येतो. जगभरात अनेक बेटांवर हा अनुभव देणारी सुसज्ज टीम तयार असते. अंडरवॉटर लाइफ एक्स्प्लोअर करण्याची अतिशय सुरक्षित आणि अफलातून संधी यातून मिळते. भारतातल्या अनेक बेटांवर, अंदमान-निकोबार बेटं, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि लक्षद्वीप बेटं स्नॉर्केलिंगची बेस्ट डेस्टिनेशन्स आहेत.

ग्लेशिअर क्लायम्बिंग
तुमची बॉडी दणकट असेल, व्यायामाचा आणि अभावात जगण्याचा तुम्हाला सराव असेल तर हा अनुभव एकदम हटके आहे. परदेशात मोठय़ा प्रमाणावर हा क्रीडाप्रकार आता उदयाला येतो आहे. हिमालयीन किंवा कुठल्याही डोंगररांगांतील एखादा बर्फाळ कडा, शिखर निवडायचं. सोबत अत्यावश्यक साधनं, रोप, बर्फावर खोचता येतील अशा छोटय़ा कुर्‍हाडी घ्यायच्या आणि हा बर्फाळ सुळका जायचा सर करून. या ठिकाणी नुसत्या बर्फाचाच नाही, थंडगार बोचर्‍या वार्‍यांचा आणि ठिसूळ बर्फाचाही सामना करावा लागतो. आपल्याकडच्या हिमालयीन बर्फाळ डोंगररांगात हा अनुभव घेता येऊ शकतो. 

डर्ट बायकिंग
बायकिंग हा जगभरातला अतिशय पॉप्युलर असा साहसी खेळ आहे. पण यातलं वेगळेपण म्हणजे चिखल-मातीच्या ओबडधोबड खडकाळ रस्त्यांवरून तुम्हाला मोटारसायकल चालवावी लागते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे तशी दणकट आणि हाय पॉवरची, जास्त सीसीची बाइक असायला हवी. तशा रस्त्यांवर बाइक चालवायचा अनुभव हवा. बायकिंगची आवड असेल तर हा अनुभव तुम्हाला आणखी समृद्ध करील.

झॉर्बिग
हा प्रकार परदेशात खूप मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय होतो आहे. कारण यातला थरार खूप मोठा आहे. इलॅस्टिक मटेरियलपासून बनवलेल्या आणि शॉक अ‍ॅबसॉब करू शकणार्‍या एका बॉलमध्ये तुम्हाला बंद केलं जातं आणि एखाद्या उंचावरच्या टोकावरून तुमच्यासकट हा बॉल खाली सोडला जातो. त्या बॉलबरोबर तुम्हीही गडगडत खाली येता. अनेकांना या अनुभवाची चटक लागली आहे. अर्थातच सुरक्षेची काळजी यात घेतलेली असते; पण तुमचं हृदय मजबूत असेल तरच हा अनुभव घ्या. 


सर्फिग
वॉटर स्पोर्ट्समधला हा अतिशय चित्तथरारक असा खेळ. परदेशात तरुणांच्या त्यावर उडय़ा पडतात; पण हा प्रकार शिकायलाही तितकाच अवघड आहे. समुद्रातील भरतीच्या लाटांवर स्वार व्हायचं आणि झोकून द्यायचं स्वतर्‍ला त्यात. या लाटांबरोबर वेगानं आणि हेलकावे खात, स्वतर्‍ला कन्ट्रोल करत पुढे पुढे जायचं. हॉलिवूड चित्रपटांत बर्‍याचदा हा प्रकार पाहायला मिळतो. स्किल आणि अ‍ॅक्युरसी या दोन गोष्टींशिवाय समुद्राच्या लाटांवर तुम्हाला स्वार होता येत नाही; पण एकदा का ते स्किल तुम्ही आत्मसात केलं, तर त्याची झिंग काही आगळीच.

अंडरवॉटर वॉक
जमिनीवर चालणं हा आता जुना प्रकार झाला. पण आपण जमिनीवरून जसं फिरतो, तसं समुद्राच्या पाण्यात फिरणं आणि पाण्याखालचं जग, तिथल्या सौंदर्याचा अनुभव घेणं हा प्रकार जगभरातच तरुणाईच्या पसंतीला उतरतो आहे. चालणं हा उत्तम व्यायामप्रकार तर आहेच; पण समुद्राच्या पोटात, जमिनीखाली चालणं त्यापेक्षाही उत्तम शिवाय एक वेगळी अनुभूती देणारा आहे. 


केव्हिंग
ट्रेकिंग, हायकिंगची ओढ अनेकांना असते, त्यासाठी ते कायम जंगलवाटा तुडवत असतात; पण त्यापुढचा प्रकार म्हणजे केव्हिंग. डोंगरदर्‍यात, गड-किल्ल्यांवर ज्या पुरातन गुहा आहेत, त्या शोधायच्या, त्या अंधार्‍या खबदाडीत घुसायचं त्या काळ्याभिन्न अंधारातलं सत्य आणि अस्तित्व शोधायचं. एकाचवेळी ही मजा आहे, एक्साइटमेंट आहे आणि त्याचवेळी एक अतिशय वेगळा थरार. आपल्याकडे हा प्रकार सर्वसामान्यांत अजून रुजला नाही; पण परदेशांत मात्र केव्हिंगची क्रेझ खूप मोठय़ा प्रमाणावर वाटते आहे. 

फ्लाइंग फॉक्स
एक मोठ्ठाच्या मोठ्ठा रोप उंचावर, अधांतरी लटकवलेला. त्या दोराला झिप लावून आपणही लटकायचं आणि त्यावरून सुसाट घसरत खाली यायचं. दोरावरच्या घसरगुंडीचा हा खेळ म्हणजेच फायर फॉक्स. भारतात अजून हा प्रकार फारसा प्रचलित नसला तरी परदेशात मात्र फ्लाइंग फॉक्सच्या अनेक साइट्स पाहायला मिळतात. 

डेझर्ट कॅम्पिंग
कुठेच झाड-झुडुप नाही, नजरेच्या टप्प्यात कुठेच पाणी दिसत नाही, मनुष्यप्राणी तर जणू काही अस्तित्वातच नाही, अशा वाळवंटी आणि रेताड भागात जायचं. जिकडे पाहावं तिकडे फक्त रेतीच रेती. त्याच्याच वाटा, त्याचेच डोंगर आणि त्याचीच शिखरं. सोबतही रेतीच्या या अथांग समुद्राचीच. रेतीच्या या समुद्रातच आपला पडाव टाकायचा, तंबू ठोकायचा आणि निसर्गाचा आवाज ऐकत राहायचं तिथेच. जगभरातल्या तरुणाईला डेझर्ट कॅम्पिंग आता साद घालतंय. एकाच दिवसात अतिशय विलक्षण असा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. दुपारच्या वेळी चामडी सोलवटून काढणारी सूर्याची उष्णता तर रात्री थंडगार वार्‍याच्या कुडकुडत्या लाटा. आत्ता काही तासांपूर्वी जो अनुभव आपण घेतला, ते आणि हे ठिकाण नेमकं एकच आहे का, असा प्रश्न आपल्याला तिथे नक्कीच पडतो. 

Web Title: From the sky to the sea! The 'crazy' crazy thing to do when you are young!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.