ब्रेकअप के साइड इफेक्ट्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 02:34 PM2019-07-11T14:34:18+5:302019-07-11T14:34:29+5:30

तो मला वेळ देत नाही, त्याच्यासाठी आमचं नातं इम्पॉर्टण्ट नाही, असं फक्त ‘वाटून’ ब्रेक तर केलं; पण तो निर्णय योग्यच आहे कसं ठरवणार?

Side Effects of Breakup! | ब्रेकअप के साइड इफेक्ट्स!

ब्रेकअप के साइड इफेक्ट्स!

Next
ठळक मुद्देआपण निर्णय विचारपूर्वक घेतो की भावनेच्या भरात घेतो?

-योगीता तोडकर 

संजनाचं तीन वर्षे एका मुलावर खूप प्रेम होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. तसं त्यांनी घरच्यांनापण सांगितलं. घरून काही किरकोळ विरोध झाला म्हणजे खरं तर तिच्या आईबाबांनी तिला प्रश्न विचारले की हाच मुलगा का? कसा विचार केलाय तू तुझ्या लग्नाचा, त्यानंतरच्या आयुष्याचा? मात्र तिला ते प्रश्न हाच विरोध वाटला, तुम्ही माझी निवड नाकारता आहात, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का, असं म्हणत तिनं आईबाबांनी विचारलेल्या प्रॅक्टिकल प्रश्नांना उत्तरं दिली नाही. शेवटी तिचा निर्णय असं म्हणत आईबाबांनीपण या नात्याला संमती दिली.
मात्र पुढं ते नातं त्यांना सरावाचं झालं. दोघे आपल्या नोकरीमध्ये व्यस्त. विकेण्डला काही वेगळे प्लॅन. नंतर नंतर तर अनेकदा चर्चा, विनंती करूनही तो आपल्याला अजिबात विशेष वेळ देत नाही असं संजनाला वाटू लागलं. त्यावरून वाद, भांडणं, गैरसमज असं सगळं विकोपाला गेलं. शेवटी कंटाळून संजनानं एकटीनंच आपलं नातं संपवायचं ठरवलं. आणि त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसं त्या मुलाला सांगूनही टाकलं की आपलं जमणार नाही. घरातल्यांशी चर्चा केली. त्यांनीही समजावलं, पण आताच पटत नाही तर पुढं काय पटणार असं सांगून संजनानं त्यांनाही गप्प केलं. घरातल्यांनी पाहिलेल्या मुलाशी साखरपुडा केला. तिच्या म्हणण्यानुसारच मग तिच्यासाठी स्थळं पाहिली, एक स्थळ पसंत केलं. साखरपुडाही झाला आता मात्र संजना म्हणतेय की त्या नवीन मुलाबरोबर ती आनंदी आहे; पण आधीच्या नात्याला  विसरू शकत नाहीये.
आता प्रश्न असा आहे, संजनाने घेतलेला निर्णय बरोबर आहे का? ती तो निभावू शकणार का? आणि कसा?
मुळात असे निर्णय चूक की बरोबर हे ठरवणंच अवघड असतं. त्यामुळे दोष कुणाचा याचा किस पाडत बसण्यात काहीच हशील नाही. मात्र आपण निर्णय विचारपूर्वक घेतो की भावनेच्या भरात घेतो, निर्णय घेताना त्या निर्णयाशी संबंधित माणसांचा विचार करतो का, असे प्रश्न संजनानं स्वतर्‍लाच विचारायला हवेत.
मुळात निर्णय घेताना संजनाने तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या.
1. एकतर ते नातं दोघांमध्ये असल्यामुळे तिने परस्पर एकटीने निर्णय घेणं योग्य नव्हतं. त्या मुलाशी चर्चा करून त्याला कल्पना द्यायला हवी होती की चालू परिस्थिती अशीच पुढे जात राहिली तर हे नातं निभावणं तिला अवघड होईल हे न भांडता शांतपणे सांगायला हवं होतं. त्याचं काय म्हणणं हे ऐकून घ्यायला हवं होतं. त्याने त्याच्यामध्ये हिला अपेक्षित बदल घडवून आणण्याविषयी त्याचं काय म्हणणं आहे, ते समजून त्यासाठी चर्चेनंतर त्याला ठरावीक वेळ द्यायला पाहिजे होता. मात्र केवळ वाद, भांडणं, गैरसमज आणि नैराश्य यातून तिनं निर्णय घेतला. तो ही एकतर्फी. 
2. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या निर्णयामध्ये नेमकी कोणती जोखीम आहे हे तिनं लक्षात घ्यायला पाहिजे होते. कारण तिच्या या एका निर्णयामध्ये तीन लोकांची आयुष्य गुंतलेली होतीच. शिवाय पालकही होते. त्यामुळे आपण असा एकटीनं निर्णय घेतला तर त्यातली जोखीम काय, त्याचे परिणाम काय, त्यासाठी आपण तयार आहोत का, याबाबत विचार करायला हवा होता. आपण नेमके काय करत आहोत याबाबतीत स्वतर्‍च्या मनाशी तरी विचारांची सुस्पष्टता असणं मोठा निर्णय घेताना गरजेचं आहे.
3. तिसरी न सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या निर्णयातली निश्चितता/ अनिश्चितता लक्षात घेणं. आज दुसर्‍या मुलाशी साखरपुडा केल्यानंतरही ती आधीच्या मुलाला विसरू शकत नाही, यामुळे ती स्वतर्‍ला दोष देत राहणार. मग ती मनाने शंभर टक्के ना आधीच्या मुलाबरोबर ना आत्ताच्या मुलाबरोबर. अशा परिस्थितीत ती नवीन नात्यात एकरूप होणार कशी ते नातं निभावून  नेणार कशी?
ब्रेकअप करणं, न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न, मात्र ते करताना विचार करायला हवा. नवीन नात्यात जाताना विचारपूर्वक ते नातं निभवायला हवं आणि मला वाटलं ते करीन, हा अ‍ॅटिटय़ूड घेऊन जगणं खरंच आपल्या फायद्याचं आहे का, हे तरी स्वतर्‍ला विचारायला हवं.


( लेखिका समुपदेशक आहेत.)

Web Title: Side Effects of Breakup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.