..ही तर त्सुनामीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 04:38 PM2018-01-17T16:38:10+5:302018-01-18T07:36:54+5:30

सौदी अरेबियानं नागरिकत्व दिलेली सोफिया. मुंबई आयआयटीच्या नुकत्याच झालेल्या टेक फेस्टमध्ये तिनं अनेकांची मने काबीज केली.

The same tsunami! | ..ही तर त्सुनामीच!

..ही तर त्सुनामीच!

Next

-डॉ. भूषण केळकर
आज मी हा लेख लिहितोय,
काही दिवसांनी रोबोटही लिहील, सहज!

सौदी अरेबियानं नागरिकत्व दिलेली सोफिया. मुंबई आयआयटीच्या नुकत्याच झालेल्या टेक फेस्टमध्ये तिनं अनेकांची मने काबीज केली. ‘आयबीएम सोफिया’ ही साडी परिधान करून आलेली सोफिया यंत्रमानव होती. सौदी अरेबियानं या यंत्रमानवास नागरिकत्व दिलं आहे हे तर आपण जाणतोच!
यू ट्यूबवर अजून एक बातमी आहे. चीनमध्ये शिन्हुआ नावाची एक मोठी वृत्तसंस्था आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआय म्हणजे आर्टिफिशियल इण्टिलिजन्सचा वापर करून २०२५ पर्यंत अग्रगण्य वृत्तसंस्था बनण्याचा प्रयत्नही आपण करणार आहे असं या वृत्तसंस्थेनं जाहीर केलं आहे. म्हणजे काय, तर बातम्या मिळवणं, लेख लिहिणं, वाचकांच्या प्रतिसादाचं विश्लेषण करणं ही वृटपत्रातली सर्व कामं या कृत्रिम बुद्धिमत्तेनंच होतील. आज जे काम पत्रकार करतात तेच काम असं एआय करेल.
या अशा बातम्या आपण आताशा वारंवार ऐकतो. वाचतो. त्यानं फार अचंबित होण्याचे दिवसही संपलेत आता. आणि ते आश्चर्य वाटत नसेल किंवा वाटणं कमी झालं असेल तर याचाच अर्थ आपण इंडस्ट्री 4.0 मध्ये जगतो आहोत!
हे इंडस्ट्री 4.0 काय आहे, हे समजण्यासाठी अर्थातच इंडस्ट्री 1.0 ते 3.0 समजणं गरजेचं आहे. ‘गोलमाल’चा प्लॉट माहिती नसेल तर ‘गोलमाल रिटर्न्स’ कसा नीट समजेल? नाही समजणार ना, किंवा समजला तरी मज्जा नाही येणार. हे इंडस्ट्री 4.0 काहीतरी ‘गोलमाल’ प्रकरण आहे असे मला सुचवायचं नाही, बरं का! हे सिक्वेल- प्रिक्वेल कळावा म्हणून उदाहरण देतो इतकंच.
तर या इंडस्ट्री 4.0 चा प्रिक्वेल काय आहे?
१८ व्या शतकाच्या मध्यात यंत्राद्वारे आणि विशेषत: वाफ व पाणी यांच्या ऊर्जेचा वापर करून चालवल्या गेलेल्या यंत्राद्वारे उत्पादन सुरू झालं. त्यानंतर वेगानं विकास झाला. चहाच्या किटलीतील वाफेची ताकद पाहून जेम्स वॉटनी या इंडस्ट्री 1.0 ची सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. (चहाच्या पेल्याची ताकद आपण लक्षात ठेवायला हरकत नाही!) या युरोपमधील विशेषत: ब्रिटनमध्येही इंडस्ट्री 1.0 चं आगमन झालं. वाफेचं इंजिन धडाडू लागलं. त्या काळात म्हणजे १७६०-८० च्या काळात आपण इकडे ‘पानिपत’ अनुभवत होतो. हे सहज सांगून ठेवलं!
इंडस्ट्री 2.0 म्हणजे या यांत्रिकीकरणाचं मास प्रॉडक्शन. आणि त्यात झालेलं परिवर्तन. एकाच वेळेला एकसारख्या अनेक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागलं. त्यासाठी असेम्बली लाइन हे या इंडस्ट्री 2.0 चं वैशिष्ट्य. यात ऊर्जेचं साधन म्हणजे विद्युतशक्ती. हा काळ म्हणजे १९ वे शतक. साधारण १८७०. त्या वेळीही आपण ब्रिटिशांच्या जोखडाखाली अडकलो होतो. मराठे व शिखांच्या साम्राज्याचा अस्त झालेला होता.
पुढे २० व्या शतकात, १९६९ च्या सुमारास संगणकाचा वापर सुरू झाला. आॅटोमेशनची लाट आली. ज्याला प्रोग्रॅमेबल लॉजिक कण्ट्रोल (पीएलसी) म्हणतात. त्याची नांदी १९६९ मध्ये झाली. इलेक्ट्रॉनिक्स, संगणक व आॅटोमेशनची ही लाट म्हणजे इंडस्ट्री 3.0. या काळात भारत म्हणजे स्वातंत्र्य मिळवून काहीच दशकं उलटलेला, जगात गरीब गणला जाणारा,समाजवादाच्या जोखडात अडकलेला, लालफितीत गुंडाळलेला देश म्हणून प्रसिद्ध होता.
आधीच्या तीनही लाटांच्या सर्व लक्षणांवर आधारित असणारी, अत्यंत वेगाने बदल घडवणारी लाट त्यानंतर २०११-१३ या काळात आली. तीच ही इंडस्ट्री 4.0. त्याविषयी आपण पुढे तपशिलात चर्चा करूच; पण ही लाट नेमकी कशी दिसली, हे इथं पाहू.
संक्षेपात सांगायचं झालं तर इंटरनेटच्या साहाय्यानं मूर्त आणि आभासी जग जोडलं जाणं आणि त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व मानवी विचारसरणीची पखरण असणं. तांत्रिक भाषेत सांगायचं तर इंडस्ट्री 4.0 मध्ये इंटरनेट आॅफ द थिंग्ज. (कडळ), क्लाउड कम्प्युटिंग, कॉग्निटिव्ह कम्प्युटिंग आणि सायबर फिजिकल सिस्टिम्स येतात. याला स्मार्ट फॅक्टरपण म्हणतात.
ज्या वेगाने इंडस्ट्री 1.0 वाढलं, जगात पसरलं त्यापेक्षा कैकपटीने इंडस्ट्री 2.0 आणि त्याही पेक्षा प्रचंड वेगानं इंडस्ट्री 3.0 चा परिणाम जगावर झाला. इंडस्ट्री. 3.0 चा वेग काहीच नाही अशा वेगानं इंडस्ट्री 4.0 आपल्याला व्यापून टाकतंय. भोवळ यावी असा त्याचा वेग आहे.
पुढील लेखात आपण यासंदर्भात तपशिलात माहिती घेऊच; पण या प्रवासातली एक गोष्ट मला अधोरेखित करायची आहे, की इंडस्ट्री 1.0 ते इंडस्ट्री 4.0 हे आव्हान आहे हे खरं, पण संधीसुद्धा आहे. ही संधी देश पातळीवर तर आहेच पण वैयक्तिक पातळीवरसुद्धा आहे.
या लेखमालेचा शेवट मी करेन तो लेख मीच लिहीन की कोणी एआयचा रिबोट ते लिहील हे मलाच खात्रीपूर्वक सांगता येणार नाही, एवढा हा वेग प्रचंड आहे.
चहाच्या पेल्यातून सुरू झालेलं जेम्स वॉटचं इंडस्ट्री 1.0 चं वादळं इंडस्ट्री 4.0 बनून आपल्यापर्यंत पोहचलं आहे. आता ते ‘पेल्यातलं वादळ’ राहिलेलं नाही तर त्सुनामी बनणार आहे, हे नक्की!

(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: The same tsunami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.