धावणारी स्वप्नं : मोनिका

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 12:21pm

गेल्या वर्षी लंडनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आजारी असतानाही ती धावली, मैदानात जवळपास कोसळलीच; पण तरीही जिद्दीनं स्पर्धा पूर्ण केली.. गेल्या वर्षी लंडनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आजारी असतानाही ती धावली, मैदानात जवळपास कोसळलीच; पण तरीही जिद्दीनं स्पर्धा पूर्ण केली..

जवळपास ११-१२ वर्षं झाली, बहुदा २००७चं वर्षं असावं, पय्योली एक्स्प्रेस; सुवर्णकन्या पी. टी. उषा नाशिकमध्ये आली होती. ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ ग्रुप आणि पी.टी. उषा स्कूल आॅफ अ‍ॅथलेटिक्सतर्फे खेळाडूंसाठी एक राष्टÑस्तरीय योजना तयार केली जात होती. या योजनेद्वारे राज्याराज्यांत जाऊन अ‍ॅथलेटिक्सचे चांगले खेळाडू निवडून त्यांना पी. टी. उषा केरळला आपल्या स्कूलमध्ये प्रशिक्षण देणार होती. प्रत्येक राज्यातून सात खेळाडू निवडले जाणार होते. त्यासाठी त्यांची कस्सून चाचणी घेतली जाणार होती. त्यासाठी पी. टी. उषा देशभर राज्याराज्यांत आणि गावागावांत फिरत होती. त्यासाठीच ती नाशिकला आली होती. सर्व खेळाडूंच्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या झाल्या. त्यातून फक्त आणि फक्त एकच खेळाडू निवडली गेली. तिचं नाव होतं मोनिका आथरे. आॅलम्पिकचं पदक एक शतांश सेकंदानं हुकलेली सुवर्णकन्याच थेट दाराशी आली होती आणि ती मोनिकाला सांगत होती, ‘चल माझ्याकडे, माझ्या शाळेत, मी तुला घडवते, तयार करते!’ मोनिका तेव्हा शाळेत शिकत होती. तिनं नकार दिला! त्याची दोन मुख्य कारणं.. एकतर मोनिका लहान होती; पण त्याहून मोठं कारण होतं, मोनिका शिकत होती ते मराठी माध्यमाच्या शाळेत! मोनिका केरळला पी. टी. उषाच्या स्कूलमध्ये दाखल झाली असती, तर शिक्षणाचा पार बोºया वाजला असता. कारण तिथे केरळी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिला प्रवेश घ्यावा लागला असता आणि आतापर्यंतचं शिक्षण फुकट गेलं असतं! अलीकडेच एका संध्याकाळी मोनिकाला भेटायला ग्राउण्डवर गेलो, तर आपला सराव संपल्यानंतर मैदानातल्या कोपºयात ती पायांना आइसमसाज करीत होती. गेले काही दिवस तिची जुनी इंज्युरी पुन्हा उफाळून आली होती आणि दुसºयाच दिवशी तिला दिल्लीला जायचं होतं. दिल्ली नॅशनल मॅरेथॉनसाठी. फूल मॅरेथॉन. ४२ किलोमीटरची रेस. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्ससाठीचं सिलेक्शन याच स्पर्धेच्या कामगिरीतून होणार होतं. गेल्या वर्षीही मोनिका ही स्पर्धा जिंकली होती. गोल्ड मेडल! त्यामुळे लंडनला झालेल्या सिनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तिचं सिलेक्शन झालं होतं. दहा-बारा वर्षांपूर्वीचा तोच धागा धरून मोनिकाला विचारलं, ‘काय वाटतं तुला? पी. टी. उषाबरोबर न जाण्याचा तुझा निर्णय चुकला की बरोबर होता? तुझा परफॉर्मन्स आणखी बेटर झाला असता आणि खूप आधीच तू आंतरराष्टÑीय स्तरावर पोहोचली असतीस?’ मोनिका क्षणार्धात सांगते, ‘पी. टी. उषाला नकार देण्याच्या निर्णयाचा मला आजही पश्चाताप वाटत नाही. कारण खेळाइतकंच शिक्षणही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. थेट सुवर्णकन्येकडूनच प्रशिक्षण मिळणं ही अभूतपूर्व अशीच गोष्ट होती; पण ती माझ्या भाग्यात नव्हती, एवढंच मी म्हणेन..’ २६ वर्षीय मोनिकानं डिफेन्समध्ये एमए केलं आहे. शिकणं तिच्यासाठी इतकं का महत्त्वाचं आहे याचं उत्तर तिच्या घराण्याच्या इतिहासात आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. मोनिका नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी या खेड्यातली; पण लहानपणापासून तिचं सारं शिक्षण नाशिकमध्येच झालं. आपल्याला आश्चर्य वाटेल; पण अतिशय विरळा असं उदाहरण त्यांच्या घराण्यात सापडतं. मोनिकाचे वडील आजही पिंपळगाव केतकीला शेती करतात. ते एकूण चार भाऊ. साºयांनाच शिक्षणाची आवड आणि मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं यासाठी साºयांचाच आटापिटा. पण शिक्षणाबरोबरच खेळातही त्यांनी प्रगती करावी असंही त्यांना वाटत होतं. गावात राहून मुलांना चांगलं शिक्षण, खेळाचं प्रशिक्षण कसं मिळणार म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला, चौघा भावांपैकी एकानं नाशिकमध्ये स्थायिक व्हायचं. मोनिकाच्या धाकट्या काकांनी ही जबाबदारी घेतली. ते नोकरीला बाहेरगावी होते. त्यांनी नोकरी सोडली आणि पत्नी, कुटुंबासह ते नाशिकला मखमलाबाद नाका परिसरात स्थायिक झाले. चौघा भावांपैकी कोणालाही मूल झालं आणि ते शाळकरी वयात आलं की त्याला शिक्षणासाठी नाशिकला पाठवायचं हा शिरस्ता. मोनिका सांगते, ‘काकांच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये एकाच वेळी आम्ही सतरा जण राहात होतो. त्यात सहा मुली आणि सात मुलं! काका, काकू सगळ्यांचं अगदी प्रेमानं करत होते; पण एक शिस्तही त्यांनी सगळ्यांना घालून दिली होती. कामं वाटून दिली होती. खरं तर तो संस्कार होता. जेवणापूर्वी झाडून घ्यायचं, जेवण झालं की आपलं ताट धुवून ठेवायचं. छोट्या छोट्याच गोष्टी. त्यावेळी कंटाळा यायचा, पण लहानपणीच लागलेल्या त्या शिस्तीचं महत्त्व आज कळतंय. कुठल्याही खेळात सर्वात जास्त महत्त्वाची असते ती शिस्त, त्या शिस्तीनंच मला आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आणून ठेवलं. त्यात काकांचा वाटा खूपच मोठा आहे. मला शाळेत सोडण्यापासून ते पहाटे आणि संध्याकाळी मेैदानावर ने-आण करण्यापर्यंत सारं काही काकांनी केलं.’ इतकी मुलं, पुन्हा त्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवायचं, शिक्षणापासून ते त्यांच्या कपड्यालत्त्यापर्यंतचा सारा खर्च, घरखर्च. काकांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ मुलं सांभाळण्याचा निर्णय घेतलेला. कसा ओढायचा हा गाडा?.. धाकटे काका ज्यावेळी नाशिकला आले, त्याचवेळी सर्वानुमते निर्णय घेतला होतो, शेतीतून जे काही उत्पन्न निघेल, त्यातून हा खर्च चालवायचा. त्यामुळे तिघे भाऊ गावी शेती करायचे आणि हा खर्च चालायचा. दहावीपर्यंत मोनिका काकांकडेच होती. मोनिकाच्या सर्वच भावंडांनी चांगलं शिक्षण घेतलं; पण तिच्याशिवाय खेळात मात्र कोणीच चमकू शकलं नाही. मोनिका नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेत शिकत होती. त्यावेळी शाळेत लहान मोठ्या स्पर्धा, खेळ होत, लहान मुलांसाठी एक-दोन किलोमीटरच्या मॅरेथॉन होत. या साºयाच स्पर्धांत मोनिका कायम पहिली यायची. तिच्या शाळेतले हॅण्डबॉलचे कोच हेमंत पाटील सर तिला म्हणाले, तू इतकं चांगलं धावतेस, तर आणखी चांगलं प्रशिक्षण मिळण्यासाठी तू भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर, तिथल्या कोचकडे का जात नाहीस? सातवीत असताना २००३मध्ये मोनिका मग विजेंद्रसिंग सरांकडे आली. भोसलाच्या मैदानावर खेळाडूंचा बराच मोठा ग्रुप होता. नॅशनल खेळणारे खेळाडू होते. मिनी सुवर्णा, कविता राऊत यांच्यासारखे मोठे खेळाडू तिथे होते. मोनिकाची प्रगती व्हायला मग वेळ लागला नाही. मोनिकाच्या जिद्द आणि चिकाटीमुळे पुढच्याच वर्षी म्हणजे २००४ पासून नॅशनलची मेडल्स यायला सुरुवात झाली. २००८मध्ये मदुराईला ज्युनिअर युथ नॅशनलच्या स्पर्धा होत्या. या स्पर्धेत तीन हजार मीटर आणि १५०० मीटर स्पर्धेत मोनिकानं गोल्ड मेडल पटकावलं. तीन हजार मीटर स्पर्धेत तर ते त्यावेळचं नॅशनल रेकॉर्ड होतं. याआधीही मोनिका अनेक स्पर्धा खेळली, जिंकली; पण तिच्या प्रोफेशनल करिअरला सुरुवात झाली ती इथूनच.. याचवेळी आणखी एक घटना घडली. मोनिकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही घटना होती. खेळाडूंची प्रगती, त्यांची कामगिरी पाहून, उच्च दर्जाचं प्रशिक्षण त्यांना मिळावं यासाठी उत्तम खेळाडू निवडून भारत सरकारतर्फे नॅशनल कॅम्पमध्ये त्यांना पाठवलं जातं. देशातले उत्तमोत्तम खेळाडू इथे राहून प्रशिक्षण घेतात. त्यावेळी झालेल्या निवड चाचणीतून मोनिकाचंही बंगळुरूच्या सिनिअर नॅशनल कॅम्पसाठी सिलेक्शन झालं. मोनिका खरं तर ज्युनिअर खेळाडू; पण सिनिअर खेळाडूंच्या कॅम्पसाठी तिची निवड झाली. भारतात हे प्रथमच घडत होतं. कविता राऊत, ललिता बाबरसारख्या देशातल्या सर्वोत्तम खेळाडूही तिथे होत्या. कविता तर मोनिकाची रूम पार्टनरच होती. खेळाडंूची या ठिकाणी चोख बडदास्त ठेवली जाते, देशातलं सर्वोत्तम दर्जाचं प्रशिक्षण इथे दिलं जातं. भारत सरकारनं त्यावेळी रशियन कोचची नियुक्ती केली होती; पण तरीही मोनिकाची म्हणावी तशी कामगिरी इथे होत नव्हती. पदकं तर येत होती; पण परफॉर्मन्स वाढत नव्हता. कॅम्पमध्ये दाखल झाल्यावर लहान-मोठ्या काही इंज्युरीजही तिला झाल्या. गुडघ्याला दुखापत झाली. गुडघ्यात पाणी झालं. ही इंज्युरी बरी व्हायला सहा महिने लागले. मोनिका सांगते, ‘दोन वर्षं मी या कॅम्पमध्ये होते; पण काहीच चांगलं घडत नव्हतं. माझी बॉडी तर अख्खी बसून गेली. ‘रगडा’ प्रॅक्टिसचाही हा परिणाम असावा. मी ‘ज्युनिअर’ होते आणि सिनिअर खेळाडूंचा सराव करीत होते. मसाला-तिखटाचा कण नसलेलं, नुसतं उकडलेलं डाएट माझं शरीर अ‍ॅक्सेप्ट करीत नव्हतं.’ नॅशनल कॅम्प सोडून मोनिकानं परत नाशिकला, आपले नियमित कोच विजेंद्रसिंग यांच्याकडे परतायचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१३मध्येही मोनिकाचं नॅशनल कॅम्पमध्ये सिलेक्शन झालं; पण त्यावेळीही याच कारणानं मोनिकाला कॅम्प सोडावा लागला. आपल्या कारकिर्दीत मोनिकानं पदकांची लयलूट केली; पण हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडथळ्यांवर मात करत आणि प्रत्येक वेळी स्वत:ला तासत तिला पुढे जावं लागलं. मोनिका सांगते, एक दिवसही सरावाला दांडी पडली, एखाद-दोन दिवस घरी जावं लागलं तरी डोळ्यांसमोर स्पर्धा दिसायला लागतात. सरावात खंड पडला तर काय होईल, या विचारानं मन कासावीस व्हायला लागतं. स्वत:लाच उत्तर द्यावं लागतं. हे स्वत:लाच उत्तर देणं फार फार कठीण असतं..’ लहानपणापासून मोनिका घराबाहेर आहे. गेली सतरा वर्षं झाली ती धावतेय. नाशिकच्या भोसला कॉलेजमध्ये तिनं शिक्षण घेतलं. तिथल्या मैदानावर सराव करतेय, गेली दहा वर्षे तर तिथल्याच होस्टेलमध्ये राहतेय, ‘डाएट’ सांभाळण्यासाठी बºयाचदा स्वत:च स्वयंपाक करते, आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी एलआयसीची नोकरी तिनं स्वीकारली. नोकरी सांभाळत स्वत:साठी, साºयांच्या अपेक्षांसाठी, देशासाठी ती धावतेय.. नुकतंच २५ फेब्रुवारीला तिनं दिल्लीत फुल मॅरेथॉन गाजवत गोल्ड मेडल जिंकलंय. याच कामगिरीतून आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड होणार आहे..

हरवलली ‘कमाई’ सापडली! २००८ची गोष्ट. नॅशनल चॅम्पियनशिपसाठी मोनिकाला पुण्याला जायचं होतं. बस पकडायची घाई होती. झटपट रिक्षा पकडून ती बसस्टॅण्डवर आली. पुण्याच्या बसमध्ये चढणार तोच लक्षात आलं, सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट्सची फाईल ती रिक्षातच विसरली होती. त्यातच पासपोर्टही होता! ही सर्टिफिकेट्स नसती तर या स्पर्धेतलं तिची कामगिरी ग्राह्य धरली गेली नसती, स्पर्धेनंतर काही दिवसांत ही कागदपत्रं तिला सादर करायची होती. टेन्शन होतंच; पण त्याचा विचार करायलाही वेळ नव्हता. ती तशीच स्पर्धेला गेली. तिथून परतल्यानंतरही तिनं फाईलची शोधाशोध केली. आठवडाभर मोनिका आणि तिचे आई-वडील प्रत्येक रिक्षावाल्याच्या घरी जाऊन चौकशी करीत होते. हवा तो रिक्षावाला शेवटी सापडला! फाईल सुरक्षित होती! लंडनचं ‘स्वप्न’! मोनिकासाठी सर्वात मोठी घटना म्हणजे गेल्या वर्षी ६ आॅगस्ट २०१७ रोजी लंडन येथे झालेली वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा. ४२ किलोमीटरची फूल मॅरेथॉन. मोनिका सांगते, ही स्पर्धा खरं तर आॅलिम्पिकपेक्षाही कठीण मानली जाते. आॅलिम्पिकवर ज्यानं अधिराज्य गाजवलं, तो उसान बोल्टही या स्पर्धेत तिसरा आला, यावरून या स्पर्धेचं काठिण्य लक्षात यावं!’ पण यावेळीही मोनिकाचं दुर्दैव आडवं आलं. लंडनमधलं वातावरण, डाएट तिला मानवलं नाही. स्पर्धा सुरू झाली आणि पहिल्या आठ किलोमीटरमध्येच तिचं पोट दुखायला लागलं. एकेक पाऊल टाकणं मुस्कील होत होतं.. मोनिका सांगते, ‘खूप ऊन होतं, स्पर्धेच्या सुरुवातीलाच अचानक पोटात भयानक कळा यायला लागल्या, डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली, कितीदा तरी वाटलं रेस सोडून द्यावी; पण प्रत्येक वेळी आठवला तो आपला देश, आजवर घेतलेले कष्ट, मेहनत, लोकांच्या अपेक्षा.. या स्पर्धेसाठी भारतातून माझं एकटीचंच सिलेक्शन झालेलं, स्पर्धा मध्येच मी कशी सोडू शकत होते? हिंमत एकवटून मी पळत राहिले, पळत राहिले..’ मोनिकानं स्पर्धा पूर्ण केली आणि जवळपास कोसळलीच. मैदानावरच मग तिच्यावर उपचार करण्यात आले. पण याही अवस्थेत स्पर्धा पूर्ण केल्याचं अतीव समाधान तिच्या डोळ्यांत झळकत होतं..

विशेषांक लेखन - समीर मराठे (लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)  

संबंधित

तलाव जिवंत होतो तेव्हा! - गोंदिया जिल्ह्यातला एक ‘तरुण’ प्रयोग
पाकिस्तानची सुहाई, भेटा एका सुपरकॉपला !
आयआयटीतून बाहेर पडून खेडय़ापाडय़ात जाणारा एक तरुण
वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठताय? मग हा आजार होऊ शकतो.
भारतीय आणि चिनी सोशल मीडियाचा रांगडा रिजनल अवतार

ऑक्सिजन कडून आणखी

तलाव जिवंत होतो तेव्हा! - गोंदिया जिल्ह्यातला एक ‘तरुण’ प्रयोग
पाकिस्तानची सुहाई, भेटा एका सुपरकॉपला !
आयआयटीतून बाहेर पडून खेडय़ापाडय़ात जाणारा एक तरुण
वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठताय? मग हा आजार होऊ शकतो.
भारतीय आणि चिनी सोशल मीडियाचा रांगडा रिजनल अवतार

आणखी वाचा