Running Dreams: Kantilal | धावणारी स्वप्नं : कांतिलाल
धावणारी स्वप्नं : कांतिलाल

- कांतिलाल

मागच्याच महिन्यातली गोष्ट.
७ जानेवारी २०१८.
नाशिकमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होती. आंतरराष्ट्रीय धावपटूही या स्पर्धेत भाग घेतात.
तोही या स्पर्धेत उतरला होता.
हाफ मॅरेथॉन. २१ किलोमीटरची.
या स्पर्धेत तोच पहिला आला.
कारण, काहीही झालं तरी ही स्पर्धा त्याला जिंकायचीच होती!
कांतिलाल कुंभार त्याचं नाव. वय २५ वर्षे. एमए करतोय.
स्पर्धा जिंकल्यामुळे तब्बल २५ हजार रुपयांचं बक्षीस त्याला देण्यात आलं.
कांतिलालला अत्यानंद झाला.
या पैशांचं त्यानं काय करावं?
आदिवासी पाड्यावर राहणाºया आपल्या आईला त्यानं नाशिकला बोलवून घेतलं आणि तातडीनं तिच्या दोन्ही डोळ्यांचं मोतीबिंदूचं आॅपरेशन या पैशांतून केलं!
अर्थातच एवढे पैसे पुरणार नव्हते; पण डॉक्टरांनी काही पैसे माफ केले!..
आईला कधीपासून दिसत नव्हतं. पण, आॅपरेशनसाठी पैसे नव्हते, त्यासाठी कांतिलालला या स्पर्धेची वाट पाहावी लागली...
कांतिलाल उंबरधाडचा. नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव. दीड-दोन हजार लोकवस्ती. अगदी परवापर्यंत इथे रस्ताही नव्हता आणि बसही नव्हती. गेल्या वर्षी रस्ता झाल्यानं बस सुरू झाली. आजही इथे शाळा आहे ती केवळ चौथीपर्यंत. इथून दहा किलोमीटरवर कोहोर नावाचं गाव आहे. तिथे दहावीपर्यंतची सोय आहे.
वडील शेतीचा एक तुकडा कसायचे. पाच मुलं. खाण्याचेच वांदे, तर शिक्षणाची चैन कुठे परवडणार? पाचही भावंडं मग कोहोरच्या आदिवासी आश्रमशाळेतच मोठी झाली! खाणं-पिणं, राहाणं, कपडे, शिक्षण सगळं इथे फुकट असल्यानं तेच त्यांचं घर होतं!
कांतिलालचा मावसभाऊ कृष्णा खोटरे त्यावेळी नाशिकला मजुरी करायचा. गार्डनचं काम करायचा. शाळेला सुटी लागली की दरवर्षी दीड-दोन महिने कांतिलालही त्याच्याबरोबर मजुरीला जायचा. चौथीपासून ते दहावीपर्यंत त्याचा हा नेम चुकला नाही. गार्डनचं काम, झाडांची कटिंग, साफसफाई, झाडझूड. आधी वीस रुपये रोज मिळायचा, नंतर नंतर तो पन्नास रुपयांपर्यंत गेला. कांतिलालला तेवढाच शिक्षणाला हातभार लागायचा.
पण आश्रमशाळेत कांतिलालचं मन रमत नव्हतं. तिथे काही ‘स्कोप’ही नव्हता. मोठ्या गावी, तालुक्याला जावं म्हणून कांतिलालनं आठवीत पेठच्या जनता विद्यालयात अ‍ॅडमिशन घेतली. आदिवासी होस्टेलमध्ये राहायचा. कारण इथेही राहाणं, खाणं-पिणं फ्री होतं. दहावीपर्यंत तो इथे होता.
याचवेळी मावसभाऊ कृष्णानं त्याला मोलाचा सल्ला दिला.. ‘अरे, रनिंग करत जा. खूप पैसे मिळतात!’
- कारण नाशिकमध्ये होणाºया वेगवेगळ्या स्पर्धा, मॅरेथॉन त्यानं पाहिल्या होत्या, आणि विजेत्यांना चांगली रक्कम मिळते हेही ऐकलं होतं.
कांतिलाललाही त्याचं म्हणणं पटलं. नाशिकमध्ये रनिंगची एक स्पर्धा होती. त्यानं ठरवलं, घेऊया या स्पर्धेत आपणही भाग. कांतिलाल त्यावेळी आठवीत होता. आज इतक्या वर्षांनीही त्याची नेमकी तारीख कांतिलालला तोंडपाठ आहे. १ जानेवारी २००८! त्याच्या आयुष्यातली ही पहिलीच स्पर्धा होती. स्पर्धा सुरू झाली. अनवणी पायांनीच कांतिलालनं धावायला सुरुवात केली. सुसाट. पण रूटच नीट माहीत नव्हता. मध्ये एका ठिकाणी वळायचं होतं आणि खुणेसाठी शर्टवर शिक्काही मारायचा होता. कांतिलाल सरळ पुढे गेला. कोणीतरी सांगितलं, अरे, तू रस्ता चुकलाय. खूप पुढे आलास. कांतिलाल मग परत फिरला. आला त्यापेक्षा दुप्पट वेगानं पळत सुटला. जवळपास एक किलोमीटर जास्तीचा फेरा पडला. तरीही सर्व स्पर्धकांना मागे टाकून तो पहिला आला! कांतिलालला अत्यानंद झाला. आपली पहिलीच स्पर्धा आणि तिही आपण पहिल्या क्रमांकानं जिंकलो!
पण स्पर्धा जिंकूनही कांतिलालला बक्षीस मात्र मिळालं नाही. कारण वळणाच्या त्या ठिकाणी त्याच्या शर्टवर कुणी शिक्का मारलाच नाही. स्पर्धेत धावल्याचा ‘पुरावा’ नसल्यानं कांतिलालला बक्षीस नाकारलं गेलं!
कांतिलाल सांगतो, ‘त्याचवेळी मी मनाशी ठरवलं, पुढच्या वर्षी मी परत येईन आणि पहिलं बक्षीस घेऊन जाईन!’
त्यानंतर लागोपाठ तीनही स्पर्धा कांतिलालनंच जिंकल्या, त्याही अनवणी पायांनी! कांतिलाल स्वत:च आपला कोच होता. धावायचं एवढंच फक्त त्याला माहीत होतं. सकाळ झाली की उठायचं आणि अनवणी पायांनी पळत सुटायचं. परत आलं की जे मिळेल ते पोटभर खाऊन घ्यायचं!
२०१० मध्ये दहावीचा निकाल लागला. कांतिलालला ७० टक्के मिळाले! त्याचं ड्रॉइंगही अतिशय चांगलं आहे.
कांतिलालचा मोठा भाऊ गणपत नाशिकला आयटीआय करत होता. एका मंगल कार्यालयात राहात होता. तिथेच झाडलोट, साफसफाईचं काम करीत होता. तो कांतिलालला नाशिकला घेऊन आला. कांतिलालनं मावसभावाच्या घरी तीन महिने मुक्काम ठोकला. चौथी ते दहावीपर्यंत दरवर्षी सुटीत कांतिलाल नाशिकला गार्डनकामासाठी येतच होता. यावेळी आल्यावर त्यानं एका कंपनीत रोजंदारीवर हेल्परची नोकरी धरली. रोज बारा तास काम. डे-नाइट ड्यूटी. मशीनवर काम होतं. लोखंडाचे बारीक कण डोळ्यांत उडायचे. डोळे लाल व्हायचे. पाणी यायचं. काही दिवसांनी कांतिलालला एका डोळ्यानं कमी दिसायला लागलं, नंतर दुसºया डोळ्यानंही. डॉक्टरांनी काम बंद करायला सांगितलं, उपचार केले आणि चष्मा दिला.
अकरावीत स्पोर्ट्स कोट्यातून कांतिलालला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली. आदिवासी होस्टेलला त्यानं नंबर लावला, कारण तिथे राहाणं, खाणं फ्री होतं, पण हे होस्टेल कॉलेजच्या दुसºया टोकाला. जवळपास १५ किलोमीटर अंतर. बसच्या पाससाठी महिन्याला २५० रुपये लागायचे. परवडत नव्हतं. कांतिलाल मग मावसभाऊ कृष्णाच्या रूमवर शिफ्ट झाला. त्याचं लग्न झालेलं. एकच छोटीशी खोली. त्यातच सारे राहायचे.
कांतिलालची धावण्याची आवड पाहून कॉलेजच्या अहिरराव सरांनी त्याला सांगितलं, ‘तू विजेंद्र सिंग सरांना भेट.’ कांतिलाल त्यांना जाऊन भेटला. त्यांना विचारलं, ‘सर, तुमच्याकडे प्रॅक्टिसला येऊ का?’
सरांनी होकार दिला आणि अकरावीत असताना २०११ पासून विजेंद्र सिंग सरांकडे कांतिलालचा सराव सुरू झाला.
कांतिलाल सांगतो, तोपर्यंत कविता राऊत, मोनिका आथरे यांची नावं मी फक्त ऐकली होती. कॉलेजमध्ये त्यांची पोस्टर्स पाहिली होती; पण त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर आणि त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायला लागल्यावर मला कोण आनंद झाला!’
कांतिलालच्या यशाची पताका मग आणखी वरवर चढत गेली. राज्य, राष्टÑीय स्तरावरील अनेक स्पर्धा कांतिलालनं गाजवल्या.
याच दरम्यान आणखी एक घटना घडली.
नाशिकला गंगापूर रोडला शशिकांत भालेराव नावाचे ज्येष्ठ सद्गृहस्थ राहतात. तिथे त्यांचा बंगला आहे. कांतिलाल शाळेत असताना चौथी ते दहावीपर्यंत बºयाचदा यांच्याच बंगल्यावर गार्डनचं काम करायला यायचा. कांतिलाल अत्यंत मनापासून आणि आवडीनं हे काम करायचा. त्यांनाही त्याची टापटीप आवडायची. भालेराव यांची दोन्ही मुलं परदेशात आहेत. २०१२ मध्ये त्यांना आणि त्यांच्या पत्नीला तीन महिने मुलाकडे अमेरिकेत जायचं होतं. त्यांनी कांतिलालला विचारलं, ‘सांभाळतोस का तीन महिने आमचा बंगला?’ तीन महिने कांतिलालनं बंगला अतिशय उत्तम आणि टापटीप ठेवला.
अमेरिकेतून परतल्यावर भालेरावांनी कांतिलालला विचारलं, ‘इथे असंही आम्ही दोघंच राहतो. तू आमच्याकडेच का येत नाहीस राहायला?’
गेली सहा वर्षं झाली कांतिलाल त्यांच्याकडेच राहतोय! त्यांची लहानसहान कामं करतो. घराची साफसफाई, किराणा, बॅँकेची किरकोळ कामं, दवाखाना, औषधं.. कांतिलालचा शिक्षण वगैरेसाठीचा बराचसा खर्च तेच करतात. वरखर्चाला काही पैसेही देतात!
दोन वर्षांपूर्वी, २०१६ ची गोष्ट. औरंगाबादला स्पोर्ट्स कोट्यातून आर्मीची भरती होती. या भरतीसाठी कांतिलालही गेला. फिजिकलच्या साºया चाचण्या कांतिलाल पहिल्या क्रमांकानं पास झाला. आता मेडिकल होती. कांतिलालला वाचायला सांगितलं; पण बारीक अक्षरं त्याला वाचता येत नव्हती. अंदाजानंच तो उत्तरं देत होता. दहावीनंतर कांतिलालनं तीन महिने ज्या कंपनीत काम केलं होतं, त्यामुळे डोळे खराब झाले होते, त्याचाच हा परिणाम होता! फिजिकली फिट, पण मेडिकली अनफिट! कांतीलालला या भरतीसाठी डिसक्वॉलिफाय केलं गेलं!
कांतिलाल पुन्हा डॉक्टरांकडे गेला, चष्म्याचा नंबर काढायचा तर काय करावं लागेल? डॉक्टरांनी आॅपरेशन करायला सांगितलं. कांतिलालनं मग दोन्ही डोळ्यांचं आॅपरेशन केलं. लेन्सेस बसवल्या. त्याचा सारा खर्च भालेरावकाकांनीच केला!
धावणं ही कांतिलालची पॅशन आहे. क्रॉस कंट्री, २१ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये कांतिलाल धावतो. २०१३ ते आत्ता २०१८ पर्यंतच्या कालावधीतील नॅशनलची लगातार तब्बल आठ मेडल्स कांतिलालनं जिंकली आहेत. याच बळावर आॅगस्ट २०१६ मध्ये तैपेई चायना येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपसाठी त्याची निवड झाली. संपूर्ण जगभरातले तरुण अ‍ॅथलिट या स्पर्धेत भाग घेतात. २१ किलोमीटरच्या या स्पर्धेत कांतिलालनं १५ वा क्रमांक पटकावला!
एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि त्यानंतर आॅलिम्पिक हे कांतिलालचं स्वप्न आहे; पण या साºया स्पर्धांत २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन कुठेच होत नाही. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्यानं ४२ किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनची तयारी सुरू केलीय.. नव्या जिद्दीनं, नव्या स्वप्नासाठी आता तो धावतोय..


विशेषांक लेखन - समीर मराठे

(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)


Web Title: Running Dreams: Kantilal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.