Running Dream: Ranjit | धावणारी स्वप्न : रणजित

रात्री साधारण आठची वेळ. नाशिकच्या पंचवटी परिसरातील गल्लीबोळातील वळणावळणाचा रस्ता. गोदावरीच्या काठावरची रंग उडालेली एक जुनीपुरानी बिल्डिंग. याच इमारतीत दुस-या मजल्यावर रणजित पटेल राहातो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा धावपटू. राज्य, राष्ट्रीय स्पर्धांत त्यानं खो-यानं पदकं लुटलेली, नुसती नॅशनलचीच किमान तीस पदकं त्याच्या खिशात आहेत. गेल्या वर्षी; आॅगस्ट २०१७ मध्ये तैपेई चायना येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २१ किलोमीटर स्पर्धेत तर त्यानं १५ व्या क्रमांकापर्यंत झेप घेतली...

वन बीएचके फ्लॅट. दार ढकलून आत आलो; पण उजेड फक्त झिरो बल्बचा. तिथेच एकमेव तुटकी प्लॅस्टिकची खुर्ची. अंधाराला सरावल्यावर आजूबाजूला पाहिलं तर पाय तुटलेला एक लाकडी कॉट. त्यावर फाटकी अस्ताव्यस्त बेडशीट. जमिनीवर सगळीकडे लहान लहान संत्री, मोसंबी इतस्तत: विखुरलेली. बरीचशी सडलेली. हा त्याचा ‘खुराक’! त्याचा सडका वास रूममध्ये भरलेला. जवळच हातानं ज्यूस काढायची दोन यंत्रं पडलेली. त्यातलं एक नादुरुस्त. चप्पल, बुटांचा ढीग. इथं चार-पाच अ‍ॅथलिट्स राहतात.
पाच मिनिटं होऊनही ट्यूब न लावल्यानं रणजितला म्हटलं, ट्यूब का बटन कहा है?.. त्यानं सांगितल, कुछ दिनोसे ट्यूब बंद है..
त्याच्या बेडरूमध्ये फरशीवर चार पातळ गाद्या शेजारी शेजारी टाकलेल्या. मग तिथेच बसलो.
रणजित मूळचा उत्तर प्रदेशचा. वय २५ वर्षे. परमानंदपूर या छोट्याशा खेड्यातला. तालुका सदर, जिल्हा वाराणसी (बनारस). कर्नाटकच्या मंगलोर युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतोय. बीएच्या शेवटच्या वर्षाला आहे.
त्याचे वडील आजही मजुरी करतात. मनरेगाच्या कामावर जातात. कधी बांधकामावर, कधी रस्ता दुरुस्ती.. काम मिळेल तेव्हा साधारण तिनशे रुपये रोज. तिघं भाऊ. मोठ्या भावाला लहानपणी अपघात झाला. मेंदूला मार बसला. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. लहान भाऊ लग्नात मंडप डेकोरेशनचं काम करतो.
रणजित लहानपणापासून पळायला चांगला. आठवीत असताना धावण्याची एक कुठलीशी स्पर्धा होती. छत्तीसगडच्या भिलई स्टील प्लान्टनं ही स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेत रणजित पहिला आला. त्यांनी विचारलं, येतोस का आमच्याकडे? आमच्या शाळेत? राहाणं फुकट, कपडेलत्ते फुकट, जेवण फुकट आणि शिक्षणही फुकट!..
एवढं सारं फुकट म्हटल्यावर रणजितनं तत्काळ होकार दिला. घरच्यांनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्यांनी सांगितलं, तुझं तू ठरव. रणजितनं आपली पिशवी भरली आणि उत्तर प्रदेशातल्या आपल्या छोट्याशा खेड्यातून तो छत्तीसगडच्या भिलई येथील शाळेत दाखल झाला...
धावण्याच्या शर्यतीत अंडर फोरटीन, अंडर सिक्सटीन स्पर्धा त्यानं गाजवल्या. राष्टÑीय स्पर्धांत पदकंही पटकावली.
नववीपासून तर बारावीपर्यंतचं शिक्षण रणजितनं भिलईत घेतलं. नंतर तिथेच कॉलेजच्या पहिल्या वर्षाला अ‍ॅडमिशन घेतली. त्याच वर्षी कर्नाटकात मंगलोरला इंटर युनिव्हर्सिटी राष्टÑीय स्पर्धा होती. २१ किलोमीटरची. या स्पर्धेत रणजितनं गोल्ड मेडल पटकावलं. मंगलोरच्या अल्वास कॉलेजनं लगेच त्याला विचारलं, आमच्याकडे येतोस का? स्कॉलरशिपही देऊ केली. रणजितनं मग मंगलोरच्या अल्वास कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली; पण तो राहात मात्र भिलईच्या होस्टेलमध्येच होता..
इथे असतानाच खेळाच्या राजकारणाचाही विदारक अनुभव त्यानं घेतला. त्यामुळेच अंडर एटीन आणि अंडर ट्वेंटी, एकाही राष्टÑीय स्पर्धेत त्याला भाग घेता आला नाही. रणजित सांगतो, ‘माझ्याऐवजी दुसºयाच कोणातरी वशिल्याच्या तट्टूला निवडलं जायचं! मी काहीच करू शकलो नाही..’
या कालावधीत विविध गटांतील किमान दहा राष्टÑीय स्पर्धांना त्याला मुकावं लागलं. अंडर ट्वेंटी गटात त्यावर्षी त्याचा शेवटचा चान्स होता. त्याच्या होस्टेलच्या शिक्षकांनी शेवटी अगदी ऐनवेळी त्यांच्या ओळखीच्या झारखंडच्या एका ‘मॅडम’ला विचारलं. त्यांनी खटपट करून त्याला स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळवून दिली. त्यावर्षी अंडर ट्वेंटीची त्याची पहिली आणि शेवटची राष्टÑीय स्पर्धा तो झारखंडकडून खेळला!
रणजित स्पर्धा खेळत होता. चांगली कामगिरी करीत होता; पण त्याला समाधन नव्हतं. म्हणावा तसा सराव होत नव्हता. चांगलं कोचिंग मिळत नव्हतं. वातावरण नव्हतं. सारं काही स्वत:च्याच भरवशावर. त्यानं नाशिकचं नाव, इथल्या खेळाडूंविषयी ऐकलं होतं. त्याला नाशिकला यायचं होतं.. पण कसं जायचं?
थोड्याच कालावधीत पटियाळा येथे एक स्पर्धा होणार होती. १२ किलोमीटरची. याच स्पर्धेतील कामगिरीवरून वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन होणार होतं. पहिल्या चौघांची निवड होणार होती. या स्पर्धेत रणजित चौथा आला.
रणजित सांगतो, ‘या स्पर्धेत पहिले तिघंही नाशिकचे होते. त्यानंतर नॅशनल कॅम्पसाठी आमचं सिलेक्शन झालं. कॅम्प होता चिपळूणला. नाशिकचे कोच विजेंद्र सिंग यांच्याशी माझी तिथे भेट झाली. त्यांनीही विचारलं, येतोस का नाशिकला? मी याच संधीची वाट पाहात होतो! पण प्रश्न सुटलेला नव्हता. गेली सात वर्षं मी भिलईच्या होस्टेलमध्ये राहात होतो. त्यांना विचारणं गरजेचं होतं. ते सोडायला तयार नव्हते. मी तिथल्या संयोजकांना विनंती केली, ‘सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत; पण मला आणखी पुढे जायचंय, प्लीज मला परवानगी द्या. त्यांनी परवानगी दिली आणि जुलै २०१५ मध्ये मी नाशिकला आलो!’
गेली तीन वर्षं रणजित नाशिकमध्ये आहे. भाड्याचा वन बीएचके छोटासा फ्लॅट. भाडं महिना सहा हजार रुपये. चौघं खेळाडू एकत्र राहतात. एकत्र प्रॅक्टिसला जातात. एकत्र रोजचा स्वयंपाक करतात. कोणी भाजी, कोणी पोळी, कोणी भाजीबाजार करतं. त्यासाठीही ते मेन मार्केटला जातात. आठवडाभराचा भाजीपाला, फळं घेऊन येतात. कारण खूपच स्वस्त पडतं.
ज्या ठिकाणी ते सरावाला जातात, ते भोसला मिलिटरी स्कूल, सिंथेटिक ट्रॅक, रोडवरचा सराव.. ही सारी ठिकाणं पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर. पहाटे ५ ला मैदानावर हजर राहावं म्हणजे राहावंच लागतं. रणजितसह सारे रूममेट मग पहाटे चार-साडेचारलाच घरून निघतात आणि पळत पळतच सरावाच्या ठिकाणी येतात!
मे २०१८ मध्ये होणाºया सिनिअर नॅशनल स्पर्धेची तयारी रणजित सध्या करतोय; पण त्याचं ध्येय आहे ते २०२० चं आॅलिम्पिक. २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकसाठी दहा किलोमीटरसाठी क्वॉलिफाय टाइम होता २८ मिनिटे. या टायमिंगपासून रणजित सध्या दीड मिनिट मागे आहे..
२०१५ च्या आॅगस्टपासून मंगलोर युनिव्हर्सिटीकडून रणजितला स्कॉलरशिप म्हणून दरमहा १५ हजार रुपये दिले जातात; पण वर्षातून साधारण सात-आठ महिनेच हे पैसे मिळतात. कारण दरवर्षी नवीन कागदपत्रं, रणजित दुसरीकडे कुठे नोकरी वगैरे करतोय की काय याची चाचपणी, त्यानंतरच हे पैसे दिले जातात. हेच पैसे साठवून आजही वर्षभराचा आपला सारा खर्च तो करतोय. साधी शूजची गोष्ट. वर्षाला किमान पाच ते सहा तरी शूज लागतातच. शिवाय मातीवरच्या सरावासाठीचे शूज वेगळे, रोडवरचे वेगळे, सिंथेटिक ट्रॅकवरचे वेगळे. प्रत्येकाची किंमत किमान दहा ते पंधरा हजारांच्या घरात! इतर खर्च वेगळा.
पण रणजित जसा घराबाहेर पडला, तेव्हापासून आजवर घरून पाच पैसेही त्यानं कधी मागवले नाहीत, कारण घरची परिस्थिती त्याला चांगलीच ठाऊक आहे. राष्टÑीय स्पर्धांत खोºयानं मिळवलेल्या पदकांपेक्षाही घरून आपण कधीच पैसे मागवले नाहीत याचाच त्याला जास्त अभिमान आहे..
दोन महिन्यांपूर्वीच रणजितला स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळाली. खरं तर त्यानं नोकरी धरली. कारण रोजचा खर्च आणि भविष्य. नोकरीचा पहिला पगारही अजून त्याच्या हातात यायचाय. नोकरी सांभाळून तो आता धावेल...

विशेषांक लेखन - समीर मराठे
(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)
 


Web Title: Running Dream: Ranjit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.