Running Dream: Durga | धावणारी स्वप्न : दुर्गा
धावणारी स्वप्न : दुर्गा

मैदानाशी तिचं नातं अगदी लहानपणापासूनच जुळलेलं.
लहान म्हणजे किती, पार पहिलीत असल्यापासून!
पण तेव्हाही ती मैदानावर जात होती, ते आपल्या आनंदासाठी आणि आज आंतरराष्ट्रीय  स्पर्धांत ती खेळतेय, तेही स्वत:च्या आनंदासाठी.
दुर्गा देवरे. नाशिकची. जन्मही इथलाच. अठरावं नुकतंच संपलंय. बीएच्या पहिल्या वर्षाला आहे.
तिचे वडील व्हॉलिबॉलचे माजी नॅशनल खेळाडू. आईनंही बीपीएड केलेलं. खेळाशी असं कौटुंबिक नातं असल्यामुळे सगळ्यांचाच ओढा मैदानाकडे होता. त्यातूनच दुर्गाचा मोठा भाऊही वयाच्या तिसºया वर्षापासूनच मैदानावर खेळायला जायला लागला. त्याचं पाहून त्याच्याबरोबर दुर्गादेखील त्याच्यामागोमाग जायला लागली. गंमत म्हणून. बरीच वर्षं तर दोघं बहीण-भाऊ एकच किट वापरत होते.
खूप एन्जॉय करायची. मैदानावर गेलीय, मग काय करायचं? इतरांचं पाहून एक राऊंड मार, दोन राऊंड मार.. वाटलं तर मध्येच मातीत खेळायला लाग.. तिच्या याच आवडीमुळे मातीशी तिचं नातं घट्ट झालं. तिसरीत असतानाच अंडर एट सबज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिचं सिलेक्शन झालं. त्यानंतर अंडर टेन सबज्युनिअर राज्य स्पर्धेत तर तिनं थेट गोल्ड मेडल घेतलं. कोच विजेंद्रसिंग आणि इतरांनाही तिच्यातला स्पार्क कळला; पण एन्जॉय, आनंद म्हणूनच मैदानावर तिला धावायचं होतं.
सातवीत असताना रांची येथे झालेल्या आठशे मीटर नॅशनल स्पर्धेतही तिनं सहजच गोल्ड जिंकलं. त्यानंतर वर्तमानपत्रांत नाव, सगळीकडून कौतुकाचा वर्षाव..
दुर्गा सांगते, ‘फार नाही, पण यानंतर मात्र मी माझ्या रनिंगबाबत बºयापैकी सिरिअस झाले. सकाळ-संध्याकाळ वर्कआउटसाठी मैदानावर जायला लागले. अधिक उत्साहानं वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेऊ लागले. आणखी पदकं पटकावू लागले. तोपर्यंत सगळी गंमत गंमतच चालली होती. आजही मी खूप मेहनत घेतेय, पण धावणं मी लहानपणापासूनच एन्जॉय करतेय, म्हणूनच आजही मैदानावर आहे!’
२०१५ मध्ये दहावीत असताना दुर्गानं युथ नॅशनल स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत तिनं नॅशनल रेकॉर्ड केलं, जे आजही तिच्याच नावावर आहे!
दुर्गाला धावण्याची जशी आवड आहे, तसंच उत्तम करिअर हेदेखील तिचं ध्येय आहे. अभ्यासातही अत्यंत हुशार. मैदानावरचा सराव एक दिवसही न चुकवतादेखील दहावीत तिनं तब्बल ९२ टक्के गुण मिळविले! दहावीचे बोर्डाचे पेपर सुरू असतानाही ती रोज मैदानावर होती! महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर तिनं कधीच कोणतीही‘ट्यूशन’, ‘क्लास’ वगैरे लावलेला नाही!
दहावी झाल्यानंतर सर्वजण तिला सांगत होते, तू आर्ट्सला किंवा कॉमर्सला अ‍ॅडमिशन घे. कारण रोज पाच तास मैदानावर सराव करायचा तर सायन्सचा एवढा अभ्यास झेपणार नाही; पण दुर्गानं जिद्दीनं सायन्सलाच अ‍ॅडमिशन घेतली. बारावी सायन्सलाही ७४ टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली. सरावावर अधिक लक्ष देण्यासाठी त्यानंतर मात्र ती आर्ट्सकडे वळली.
राज्य, राष्टÑीय स्पर्धांत दुर्गाची घोडदौड सुरूच होती. याच बळावर मे २०१५ मध्ये दोहा, कतार येथे झालेल्या युथ एशिया आंतरराष्टÑीय स्पर्धेसाठी १५०० मीटरमध्ये तिचं सिलेक्शन झालं. पण, चांगलं धावत असतानाही अचानक शेवटच्या लॅपमध्ये तिनं रेस सोडली!
दुर्गा सांगते, ‘खरंच मी का असं केलं, मलाही कळत नाही. परदेशात धावण्याची माझी पहिलीच वेळ. कोणीच माझ्याबरोबर नाही. आई-वडील नाही, कोच नाही.. मला गाइड करणारं, मोटिव्हेट करणारं कुणीच माझ्या सोबत नव्हतं. कदाचित त्याचाही परिणाम असावा. त्यानंतर अनेकांनी मला समजावलं, आंतरराष्टÑीय स्पर्धा म्हणजे काय असतं, त्याचं महत्त्व काय?.. यावेळी मी खºया अर्थानं सिरिअस झाले!’
या अनुभवातून दुर्गा खूप काही शिकली. त्यानंतर पुढच्याच महिन्यात, जून २०१५ मध्ये आणखी एक मोठी आंतरराष्टÑीय स्पर्धा होती. चीनमध्ये झालेली वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिप. या स्पर्धेत १५०० मीटर शर्यतीत तिनं तिचं आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट टायमिंग तर दिलंच, पण थेट गोल्ड पटकावलं!
त्यानंतर तीनच महिन्यांत न्यूझीलंडजवळच्या सामोआ आयलंड्सवर कॉमनवेल्थ युथ चॅम्पियनशिप झाली. या स्पर्धेतही पाचव्या क्रमांकापर्यंत तिनं झेप घेतली. आपलं आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट टायमिंग देताना स्वत:चंच नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केलं!
दुर्गाचं वय आहे आत्ताशी १८ वर्षे; पण सध्याच्या घडीला तीसपेक्षा जास्त राज्यस्तरीय आणि तब्बल वीस नॅशनल मेडल्स तिच्या खिशात आहेत!
‘सध्या खूप खेळाडू भविष्यात चांगली नोकरी मिळावी याच उद्दिष्टानं मैदानावर येतात, मैदानातला खरा आनंद ते घेतच नाहीत’, असं तिचं स्पष्ट आणि प्रांजळ मत आहे. अर्थात त्यांची आर्थिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे, हेदेखील तिला माहीत आहे. ‘सुदैवानं मला आर्थिक काळजी नसल्यानं मी मैदानावर मनमुराद आनंद लुटते’ याबद्दल कृतज्ञताही ती व्यक्त करते.
आॅलिम्पिक खेळणं हे दुर्गाचंदेखील ध्येय आहे, पण ती म्हणते, फार पुढचा विचार मी करीत नाही. येत्या दोन-तीन महिन्यांत जून २०१८ मध्ये जपानला एशियन ज्युनिअर चॅम्पियनशिप आणि फिनलंडला जुलैमध्ये वर्ल्ड ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहेत. त्यासाठीच्या क्वॉलिफायर मॅचेस लवकरच होतील. त्यावर दुर्गानं सध्या आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.
दुर्गाला विचारलं, ‘तुझे वडील तर व्हॉलिबॉलचे नॅशनल प्लेअर, मग तू अ‍ॅथलेटिक्सकडे कशी वळालीस?..
त्याचीही ‘कहाणी’ तिनं सांगितली.
व्हॉलिबॉल हा सामूहिक खेळ. सामूहिक खेळात जे राजकारण चालतं, ते तिच्या वडिलांबाबतही घडलं. अनेकदा त्यांना डावलण्यात आलं. हे राजकारण अगदी जवळून अनुभवल्यामुळं आपल्या मुलांनी कुठलातरी वैयक्तिक खेळच खेळावा असं त्यांचं मत होतं. जो परफॉर्म करेल, तोच सिलेक्ट होईल. त्याला सिलेक्ट करावंच लागेल! मोठ्या मुलाला अ‍ॅथलेटिक्सची आवड होती. तो त्याकडे वळला. त्याच्या स्पोर्ट्स करिअरसाठी तिच्या आईनं नोकरीही सोडली.
पण दुर्गाचा भाऊ दहावीत असताना कुटुंबावर एक मोठा आघात झाला. त्याच्या पोटात ट्यूमर निघाला. ट्यूमर तर काढला; पण ३३ टाके पडले. त्याचे व्रण आजही त्याच्या पोटावर दिसतात. त्यानंतर त्याचं मैदान सुटलं ते सुटलंच.
दुर्गाच्या दादालाही वाटायचं, आपल्याला जे जमलं नाही, अकालीच सोडावं लागलं, ते मैदानातलं करिअर आपल्या लहान बहिणीनं तरी पूर्ण करावं.
मुळात दुर्गाला मैदानाची आवड होतीच, पण ज्या भावाचं बोट धरून आपण मैदानात आलो, त्याची इच्छा पूर्ण करणं हेदेखील दुर्गाचं एक स्वप्न आहे.
दुर्गा सांगते, धावणं मी खरंच एन्जॉय करते, पण ते सुख मलाही सहजासहजी मिळालेलं नाही. बहुतेक महिला खेळाडू आणि त्यांच्या पालकांना आपल्याकडे जे सोसावं लागतं, तेच आमच्याबाबतही झालं.. मुलगी आहे, लहान आहे, चेहरा खराब होईल.. लग्नाच्या वेळी अडचणी येतील.. कशाला मुलीला उन्हातान्हात मैदानावर पाठवता.. सगळं काही माझ्या पालकांना ऐकावं लागलं, पण त्यांनी साºयांकडे दुर्लक्ष केलं..
पण मला विचाराल तर कुठल्याही महागड्या मेकअपपेक्षा वर्कआउटनंतर चेहºयावर डबडबून आलेला घामच मला खूप आवडतो आणि त्यात मी कशाहीपेक्षा सुंदर दिसते असं माझं मत आहे!
मैदानावरच्या सरावानंतर अंग घामानं डबडबलेलं असलं तरी तिच्या हसºया आणि प्रसन्न चेहºयाकडे पाहून ते कळतच होतं!..

विशेषांक लेखन - समीर मराठे

(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)


Web Title: Running Dream: Durga
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.