रिलेशनशिप स्टेट्स? It's Complicated! तरुण लव्हस्टोरीच्या बदलत्या कथांचे नवे व्हिलन कोण आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 02:20 PM2019-02-14T14:20:15+5:302019-02-14T14:20:23+5:30

गेल्या 5 वर्षात टीनएजर्सच्या म्हणजेच जेमतेम ग्रॅज्युएशनर्पयत पोहचलेल्यांच्या लव्हस्टोरीतले अनेक रंग, पात्र, कथा आणि व्हीलनही बदललेले दिसतात. त्या बदलत्या प्रेमाची ऑक्सिजनच्या डेस्कवरची ही खास गोष्ट

Relationships States? It's Complicated! Who are the new villains of the changing story of young lovestory?- Valentines day special report | रिलेशनशिप स्टेट्स? It's Complicated! तरुण लव्हस्टोरीच्या बदलत्या कथांचे नवे व्हिलन कोण आहेत?

रिलेशनशिप स्टेट्स? It's Complicated! तरुण लव्हस्टोरीच्या बदलत्या कथांचे नवे व्हिलन कोण आहेत?

Next
ठळक मुद्दे पळून जाऊन लग्न कमीच, प्रेमप्रकरणं भरपूर असा हा नवीन टप्पा दिसतो आहे.

- ऑक्सिजन टीम

‘ऑक्सिजन’ला आमच्या मनातलं सगळं कसं कळतं? - असा प्रश्न तरुण मुलंमुली नेहमीच विचारतात.
मात्र त्याचं रहस्य असं की, ऑक्सिजनला दोस्त मानून अनेक वाचक आमच्याशी त्यांची सिक्रेट्स, लव्हस्टोरी, संघर्ष शेअर करत असतात. त्यातूनच आम्हाला तरुण वाचक मित्रमैत्रिणींचं बदलत जग उलगडत जातं. त्याच पत्रांत दिसते बदलत जाणारी लव्हस्टोरी.
गेली अनेक वर्षे तरुण मुलं, टीनएजर्स ऑक्सिजनला पत्र पाठवून आपलं प्रेमात पडणं साजरं करतात, ब्रेकअपच्या गोष्टी सांगतात, मुलं दगाबाज की मुली असा सवाल करतात, प्रेमात पडून होणारे ताप सांगतात. कॅज्युअल की कॉम्प्लिकेटेड अशा रिलेशनशिपबद्दल बोलतात.
साधारण गेल्या 15वर्षाहून अधिक काळ आम्ही हे सारं वाचतो, समजून घेतो आहोत.
मात्र गेल्या 5 वर्षात टीनएजर्सच्या म्हणजेच जेमतेम ग्रॅज्युएशनर्पयत पोहचलेल्यांच्या लव्हस्टोरीतले अनेक रंग, पात्र, कथा आणि व्हीलनही बदललेले दिसतात. त्या बदलत्या प्रेमाची ऑक्सिजनच्या डेस्कवरची ही खास गोष्ट  :  आजच्या ‘व्हॅलेण्टाइन्स डे’ निमित्त !

*****

प्रेम आहे आणि सेक्स?


तेव्हा..
‘आम्ही पाच वर्षे झाले प्रेमात आहोत, घरच्यांचा विरोध आहे, आमची जात आड येतेय. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे; पण तो इतका चांगला आहे, इतका चांगला आहे की, इतकं खर्रखर्र प्रेम करतो माझ्यावर, त्यानं मला अजून कधी स्पर्शही केलेला नाही..’
अशी वाक्यं असलेली अंतर्देशीय पत्रं किंवा लांबच लांब रेघीव कागदावर लिहिलेली पत्रं ऑक्सिजनला येत. अगदी अलीकडे पाच वर्षापूर्वीर्पयत अशी पत्रं ही आम होती. ‘त्यानं मला कधी स्पर्शही केला नाही’ किंवा ‘ती तयार होती; पण मी कधीच माझी मर्यादा ओलांडली नाही’ ही वाक्यं त्या पत्रांत आम होती. हे सारं तेव्हाची कॉलेजात जाणारी, जेमतेम विशीची मुलं का लिहायची तर आमचं एकमेकांवर जे प्रेम आहे ते प्लॅटोनिक आहे, शारीरिक नाही. आमचं प्रेम शरीरापुरतं मर्यादित नाही असं सांगण्यातला एक अभिमान त्या पत्रांत दिसायचा. शरीरानं आम्ही कधीच जवळ आलो नाही, एकमेकांना साधा स्पर्शही केला नाही, हे सांगणं ‘खरंच होतं’ असं नाही. मात्र आपलं प्रेम किती उदात्त आणि अशारीर पातळीवर जाणारं आहे, असं सांगण्यात आणि शारीरिक जवळीक दडवण्यात एक भीड होती. प्रेमाच्या आणाभाका  शरीरापलीकडच्या वगैरे होत्या. प्रेम हे शरीरापलीकडचं अंतरात्म्याचं वगैरे असतं, असं निदान सांगितलं तरी जायचं.
आणि आता?
जेमतेम टीनएजर मुलीही फोनवर सहज सांगतात. ‘वी ट्राइड फ्यू थिंग्ज, बट आय थिंक ही इज नॉट कम्पॅटिबल इन दॅट वे; पण मग माझं त्याच्यावर प्रेम आहे असं वाटत होतं त्याचं काय?’ म्हणजे अनेकींना पडणारा प्रश्न भलताच आहे की, आपण ज्याच्यावर प्रेम आहे असं समजतो, शारीरिक (थोडीबहुत) जवळीक आहे, तो त्याअर्थानं आपल्याला साजेसा वाटत नाही. मग हे प्रेम खरं की खोटं, की आकर्षण नुसतंच शारीरिक. प्रश्न आहेतच, घोळ आहेतच; पण शारीरिक जवळीक आहे, प्रेमात ती असतेच हे आज इमेल पाठवणारी मुलं दडवत नाहीत. उलट त्यात घोळ आहेत असं सरसकट सांगतात. आणि त्यातून बाहेर पडायचंच असेल तर त्याचे मार्ग शोधतात. प्रेमात असणं म्हणजे शारीर अर्थाची जवळीक असणं (अगदी थेट शरीरसंबंध नसले तरीही) हे आता या मुलामुलींनी जणू स्वीकारून टाकलेलं आहे. ते स्वीकारणारे मुंबई-पुण्याचेच नाही तर लहान गावांत, तालुक्याच्या ठिकाणी राहणारेही अनेकजण आहेत.
आपण प्रेमात आहोत, शारीरिक जवळीक असणं, यात काही विशेष नाही असा एक खुल्लमखुल्ला अ‍ॅप्रोच हल्ली जोरकसपणे दिसतो.
बदल हाच की, आपण जे करतो ते लपवून ठेवण्याची त्यांना गरज वाटत नाही, उलट ते जे आहे, त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत. घेत आहेत. मात्र कुचंबणा अशी की अर्धवट माहिती नवे संभ्रम निर्माण करत आहे.

**

प्रेमभंग ते डम्प  व्हाया ब्रेक-अप

तेव्हा..
‘तू सोडून गेलीस त्या वळणावर.’
असं वळणदार अक्षरात लिहिलेली, काही अक्षरं रंगवलेली, काही शब्दांना अंडरलाइन केलेली ही ओळ.
हे वाक्य पाहिलं की, लक्षात यायचं हे प्रेमभंगाचं पत्र. आपला प्रेमभंग कसा झाला, तिनं कसा दगा दिला किंवा तिचा कसा घरच्यांसमोर नाइलाज झाला, मला नोकरीच नव्हती, परिस्थितीच अशी की, तिला नाही म्हणावंच लागलं.
अशा अत्यंत भावुक, दर्दभर्‍या कहाण्या घेऊन ही प्रेमभंगाची पत्रं यायची. आठाठ-दहादहा पानी पत्रं. 
जात आणि नोकरी नसणं ही प्रेमभंगांची महत्त्वाची कारणं. 
पहिला प्यार या शब्दाची जादूही मोठी होती. इतकी मोठी की एकदा प्रेमात पडलं की एकदम जनम जनम का साथची कमिटमेण्ट मुलंमुली करायचे. आणि प्रेमभंग झालाच तर घरच्यांचा विरोध हे कारण व्हिलन म्हणून पुढे यायचं. 
प्रेमभंगानं कोलमडून पडलेले, व्यसनांच्या आहारी गेलेले, आयुष्यच उद्ध्वस्त करून घेणारे तरुण अनेक. 
मुलीही ‘नाइलाज’ या एका शब्दाखाली एकदम आईवडिलांसाठी त्याग करून, तू मला विसरून जा अशी कळवळून साद घालायच्या.
प्रेमभंग पचवणं पुन्हा प्रेमात पडणं हे फार दुर्मीळ असावं इतकं व्याकूळ चित्र या पत्रांत असायचं.
आणि आता?
प्रेमभंग हा शब्दच मागे पडून त्याची जागा ब्रेकअप या शब्दानं घेतली आहे. त्याचाच भाऊबंद असलेला दुसरा शब्द म्हणजे डम्प करणं. प्रेमभंग होण्यात म्हणजेच ब्रेकअपमध्ये पूर्वीचे जातपात-घरचे-पैसा हे तीन व्हीलन तर आजही आहेतच; पण ते एण्ट्री घेतात लग्नाचा निर्णय घेताना. मात्र आता तिथवर जाण्यापूर्वीच अनेकजणांचा ब्रेकअप होतो.
या ब्रेकअपच्या आधीचा एक टप्पा दिसतो.
1. आम्ही प्रेमात आहोत, लग्न ची कमिटमेण्ट अजून केलेली नाही.
2. प्रेमात आहोत, लग्न ची कमिटमेण्ट केली आणि त्यानंतर ब्रेकअप झालं.
या दोन पायर्‍या अनेक मुलांच्या लेखी वेगळ्या आहेत असं आता ऑक्सिजनला येणार्‍या इमेल्स सांगतात. अनेकांना लग्न ची कमिटमेण्ट करून आपण याच मुलाशी किंवा मुलीशी लग्न  करू, अशी खातरी वाटत नाही. ग्रामीण भागातल्या अनेक मुलीही सांगतात, प्रेम आहे; पण लग्न चा निर्णय अवघड, त्यात घरचे कट्टर, आजचं आज पाहू, तेव्हाचं तेव्हा.
त्यातून एकमेकांशी नाहीच पटलं, भांडणं वाढली, तर चटकन वेगळं होण्याचा आणि ब्रेकअप करण्याचा निर्णयही चटकन होतो. ‘वुई ब्रेकअप’ असं सहज मित्रांना सांगितलंही जातं. तुलनेनं ब्रेकअप आताशा सहज पचवणं सुरू झालं नाही. 
विशेष म्हणजे दोघांपैकी कुणाला नेमकं तिसरं कुणी आवडलं तर तिनं किंवा त्यानं कसं डम्प केलं,
याच्या कहाण्या मात्र अजूनही ‘तू सोडून गेलीस किंवा गेलास त्या वळणावर’ इतक्याच दर्दभर्‍या असतात.

****
लव्ह, सेक्स आणि I-पील

तेव्हा..
पाच वर्षापूर्वी एका बारावी सायन्सला असलेल्या मुलीचं पत्र आलं होतं, आमचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यानं मला किस केलं, आता मला काही धोका तर नाही, मी प्रेग्नण्ट तर नाही राहणार. 
- हे पत्र अपवाद नाही तर असे अनेक प्रश्न, शारीरिक जवळिकीसंदर्भातले अनेक गैरसमज, पिवळ्या पुस्तकातली भयंकर माहिती वाचून गरगरलेलं डोकं आणि एचआयव्हीसंदर्भातही अनेक गैरसमज असं बरंच काही पत्रांतून दिसायचं लैंगिक शिक्षण या विषयाची किती गरज आहे हे लक्षात येत होतं. त्यासंदर्भात शास्रीय माहिती देणारी मालिकाही आम्ही त्याकाळात प्रसिद्ध करत होतो.
मुलंमुली पत्रं लिहायचे किंवा फोन करायचे तेही बिचकत बिचकत, आडून आडून विचारायचे. प्रश्न आपला नसून आपल्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा आहे असं सांगायचे.
मुलामुलींची मैत्री, एकमेकांशी बोलतानाही वाटणारा संकोच हे सारे भयंकर गुंतागुंतीचे वाटणारे प्रश्न आमच्यासमोर यायचे
आणि आता?
लैंगिक शिक्षणाचा अभाव आहेच. मात्र हातात इंटरनेट असल्यानं आणि ओव्हर एक्सपोजर मिळाल्यानं अनेकांना आपल्याला ‘सगळं’ माहिती आहे असं वाटतं. पोर्न पाहणं, सॉफ्ट पोर्न पाहणं हे सगळं हातातल्या मोबाइलवर अनेकजण करतात आणि त्याचा त्यांना गिल्टही वाटतो. मात्र तरीही वयात आलेले अनेकजण बर्‍याच गोष्टी एक्सप्लोअर करून पहायला ‘उत्सुक’ दिसतात. करूनही पाहतात. ‘काळजी घेण्याची साधनं’ही अनेकांना माहिती असतात.
मग फोन कसले येतात?
तर मी आयपील घेतली किंवा घरच्यांना फसवलं असं वाटतं किंवा आता ब्रेकअप करायचं ठरवलं तर मागे कसं जाणार अशा प्रश्नांचे. 

***
पळून जायचं का? - नकोच शक्यतो!

तेव्हा..
जाऊ का पळून?
- असा प्रश्न पूर्वी अनेक प्रश्नांत दिसायचा. तेव्हा तर सैराट रिलीजही झालेला नव्हता. मग तरी मुलं का विचारायचे, जाऊ का पळून? कारण अनेकांची पळून जाण्याची तयारी होती. इच्छा होती. जातपातधर्म यांना न जुमानता, पुढे जे होईल ते होईल पाहून घेऊ असा आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून अनेकजण पळून जात. पुढं अनेकांचे संसार उत्तम मार्गी लागत, काहींची परवड होई. मात्र पळून जाण्यात एक बंडखोरी होती आणि ग्लॅमरही.
म्हणून हा प्रश्न अनेकजण पत्रांतून विचारत की, आम्हीही जाऊ का पळून?
- खरं तर पळण्यापूर्वी कुणीतरी सोबत आहे अशी बहुतेक भावना त्यामागे असायची. पळून जाऊन लगA केलं असं सांगणारी अनेक पत्रं यायची. हे पळून जाणारे अनेकजण ऐन विशी-पंचविशीतले असायचे.
त्यांची वाट सोपी नव्हतीच, घरच्यांचा विरोध, ब्लॅकमेलिंग सगळं होतंच; पण तरी पळून जाण्याची हिंमत करणारे अनेकजण ऑक्सिजनला पत्रांतून भेटत.
.आणि आता?

अनेकजण ‘प्रॅक्टिकल’ झालेले दिसतात. प्रेमात पडणं-फिरणं हे सर्रास होतं. मात्र आम्ही पळून गेलो नाही, ब्रेकअप केलं अशी पत्रंही येतात.
का?
उत्तरं दोन.
एकतर अनेकांना घरच्यांना दुखवायचं नसतं, एकदम लगAाच्या वेळी घरच्यांनी आपल्यासाठी किती काय काय केलं, हे आठवायला लागतं. (विशेषतर्‍ मुली)
दुसरं म्हणजे तरुण मुलं सांगतात, मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. नोकरी, पगार, नसलेलं घर, पगारात कसं भागणार, तिच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार, कोण सहन करणार एवढी आर्थिक परवड, त्यापेक्षा नकोच ते, थांबलेलं बरं. पळून जाऊन लगA नको. खरं तर अनेकांना कौटुंबिक आधार, पैसाही सोडायचा नसतो असं हे पत्र पाहून लक्षात येतंच.
त्यात जे पळायचं ठरवतात, त्यांना जातीपातीचे, ऑनरकिलिंगचे धाक वाटतात. आपल्यालाही मारतील का अशी भीती वाटते.
त्यामुळे पळून जाऊन लग्न कमीच, प्रेमप्रकरणं भरपूर असा हा नवीन टप्पा दिसतो आहे.

****

तेव्हाची चोरटी प्रेम‘पत्रं’ आत्ताचं ‘लास्ट सीन’

तेव्हा..
प्रेमात पडलं की भेटावंसं वाटणं, पत्रं लिहिणं, एसएमएस करणं, तासन्तास फोनवर-मोबाइलवर बोलणं हे अगदी आताआतार्पयत कॉमन होतं.
कुणाशी बोलतोय/बोलतेस, माझा कॉल वेटिंगवर दिसला नाही का यावरून होणारी भांडणं, संशय, हे अगदी अलीकडेर्पयत सर्रास होतं. पत्रांवरून ब्लॅकमेल करणं किंवा होणं, घरच्यांना पत्रं/फोटो सापडणं यामुळे होणारा मनस्तापही अनेक पत्रं सांगायची.
त्यानंही मोठे गदारोळ व्हायचे 
.आणि आता?

ओव्हरशेअरिंग हा नवीन शब्द अनेकांच्या आयुष्यात आला आहे. आणि ते शेअरिंग अनेकांना हवंही आहे आणि नकोही.
ही एक नवीनच कहाणी आता सोशल मीडियानं प्रेमप्रकरणात जन्माला घातलेली आहे. अमुक फोटो पाठव अशा मागण्या हा नवीन जाच असल्याचं आणि त्यातून प्रेम परीक्षा घेण्याचं नवीनच प्रकरण उद्भवलं आहे. त्यावरूनच इंटीमेट शेअरिंग वाढलं आहे. नग्न  फोटो ते व्हिडीओ, आंघोळ करतानाचे फोटो/व्हिडीओ ते एकत्र असतानाच्या क्षणाचं शूटिंग असं बरंच काही शेअर केलं जातं. आणि ते अनेकदा व्हायरल होतं, शेअर केलं जातं. किंवा ब्रेकअप नंतर ब्लॅकमेलसाठीही वापरलं जातं.
मात्र हे सारं होत नसलं तरीही सतत ऑनलाइन असणं, लास्ट सीन पाहणं, अमक्याला तमकं उत्तर का दिलं म्हणून भांडणं, भयंकर स्पाइंग हे नवीन प्रश्नच तरुण मुलामुलींच्या प्रेमात व्हिलन झाले आहेत. त्याचं काय करायचं आणि गॅझेटलेस लव्ह कसं काय ठेवायचं याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
आजकाल येणारे फोन आणि इमेल्स अशा ओव्हरशेअरिंगने त्रासलेल्या मुलामुलींचे आहेत. आणि त्यांना कळत नाहीये की, आपलं प्रेम आहे एकमेकांवर तरी हे सतत ‘एकत्र’ असणं नको का वाटतं?

***
तरुण मुलामुलींच्या लव्हस्टोरीत दिसणार्‍या या आणखी काही ठळक गोष्टी.

* प्यार किया नहीं जाता, हो जाता है हे मागे पडून आता प्यार करके देखो असा एक ट्रेण्ड दिसतो. जो/जी आवडेल तिला मुलगेच नाही तर मुलीही पटकन प्रपोज करतात. नाही म्हणालं, ना सही. कसं विचारू हा घोळ संपलेला दिसतो.
 * अनेकांना शाळेतच गर्लफ्रेण्ड/बॉयफ्रेण्ड आहेत. काहींना नसले तर मित्रमैत्रिणी चिडवतात, त्यामुळे उगीच आहे जीएफ/बीएफ असं सांगून वेळ मारून नेणारेही अनेकजण आहेत. 
*लॉँग डिस्टन्स लव्ह हे पूर्वी प्रेमपत्रात होतं. आता व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडीओ कॉल यानं सतत कनेक्टेड असल्यानं एलटीएल जोरात आहे.
* बॉडी इमेज हा मोठा प्रश्न दिसतो. स्वतर्‍ला बदलण्यासह जीएफ/बीएफचा लूक बदलण्याचा प्रय}ही अनेकजण करतात. त्यात आनंदाची गोष्ट अशी की, त्यातून जीम बडी म्हणत दोघंही फिट होण्याचा प्रय} करतात.
* सोशल मीडिया स्पाइंग आणि भांडणं यांचा मात्र अतिरेक होतो, त्यातून ब्रेकअप मोठय़ा प्रमाणात होतात.

Web Title: Relationships States? It's Complicated! Who are the new villains of the changing story of young lovestory?- Valentines day special report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.