मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गडचिरोलीत स्थायिक झालेल्या आरतीची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:49 PM2018-06-21T14:49:43+5:302018-06-21T14:49:43+5:30

नाशकातच बारावी झाले, एमबीबीएस पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात केलं. एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षाला असतानाच ठरवलं होतं की, आपण यूएसलाच स्थायिक व्हायचं. आता मात्र मी गडचिरोली जिल्ह्यात स्थायिक झालेय आणि आदिवासी भागात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करतेय. माणसांच्या मनावर उपचार करताना मनाचे खेळही समजून घेतेय.

psychiatrist aarti bang settled in Gadchiroli shares her story.. | मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गडचिरोलीत स्थायिक झालेल्या आरतीची गोष्ट.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गडचिरोलीत स्थायिक झालेल्या आरतीची गोष्ट.

Next
ठळक मुद्देआदिवासी भागात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करणार्‍या एका मैत्रिणीचं मनोगत

- डॉ. आरती बंग

माझं बालपण नाशकात एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. नाशकातच बारावी झाले, एमबीबीएस पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात केलं. एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षाला असतानाच ठरवलं होतं की आता आपण यूएसलाच स्थायिक व्हायचं. मात्र आज मी गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात ‘सर्च’ या सामाजिक संस्थेमध्ये मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करतेय. आदिवासींच्या मानसिक आरोग्याच्या समस्या समजून घेत, या माणसांना समजून घेत आहे. व्यसनमुक्तीवर काम करतेय. मागे वळून पाहताना वाटतं, कुठे पुण्यात हुंदडणारी आरती, यूएसचं स्वप्न बघणारी आणि कुठे आजची मी.  पण पुण्यातच ग्रामीण रुग्णांसोबत पाला पडला आणि हादरलेच मी. सोबत ‘निर्माण’चाही प्रवास झाला. ही त्या प्रवासाचीच, गडचिरोलीची मानसोपचारतज्ज्ञ झाले त्याची गोष्ट. एमबीबीएस झालं. मजा-मस्ती झाली. त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप सुरू असताना माझा खर्‍या अर्थाने रुग्णांसोबत संबंध आला आणि सोबतच जबाबदारीही. रुग्णांना केस म्हणून पाहणं हे तोर्पयत माझ्याही अंगवळणी पडलं होतं. एक दिवस एक ग्रामीण महिला माझी केस म्हणून आली. तिला स्तनाचा कर्करोग होता. मी अगदीच घाणपणे तिला चल ब्लाउज काढ म्हणाले. त्याक्षणी ती ओक्साबोक्शी रडायला लागली. प्रत्येक डॉक्टर मला हेच म्हणतो. मी एक स्त्नी आहे, माझी लाज, माझं मन याचा जराही विचार तुम्हाला येत नाही का? असा तिचा प्रतिप्रश्न माझ्या कानफटात मारून गेला. कितीतरी वेळ मी सुन्न झाले होते. रुग्णाच्या मानसिक अवस्थेचा आपण कधीच विचार केला नाही हे त्या क्षणापासून क्षणोक्षणी वाटत राहिलं. पुढेही अनेक दिवस..


या तगमगतेतच मला डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग (आता मी त्यांना नायना आणि अम्मा म्हणते) यांच्या कार्याबद्दल आणि ‘निर्माण’ शिबिराबद्दल कळलं. तोर्पयत इंटर्नशिप संपत आली होती. निर्माणचा फॉर्म भरला. ‘स्व’ शोधाचा प्रवास सुरू झाला. काही दिवस ‘सर्च’मध्ये अम्मा सोबत काम केलं आणि ठरवलं आता मु. पो. गडचिरोली. यूएसची स्वप्न बघणारी आपली मुलगी अचानक गडचिरोली जिल्ह्यात जाऊन कामच नाही तर स्थायिक व्हायचं म्हणते हे नाशकातल्या माझ्या आई-वडिलांना पचणं बरंच अवघड होतं; पण मी ठाम होते. पुढे मग त्यांचाही विरोध मावळला. मी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील ग्रामीण रु ग्णालयात बंधिपत्रित सेवा सुरू केली. तिथे रुग्णांना तपासताना आधी केवळ शारीरिक आजारांकडेच मी लक्ष द्यायचे; पण या प्रचंड कष्ट करणार्‍या माणसांनाही मानसिक आरोग्याच्या खूप समस्या आहेत हे पाहिल्यावर पुन्हा एकदा दुसरी कानफटात बसली. पण या वेळची थापड कानठळ्या वाजवणारी होती. तोर्पयत बालकांच्या मानसिक आरोग्यावर काम करावं असंच मला वाटत होतं. पुढे बंधिपत्रित सेवा संपली आणि मी गुजरातमधील भावनगर येथील शासकीय इस्पितळात सायकॅट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी गेले. 
    तिथून शिक्षण संपवून परतल्यावर 5 सप्टेंबर 2016 पासून  ‘सर्च’मध्ये मी स्वतंत्नपणे कामाला सुरुवात केली. व्यसनमुक्तीसाठी ‘सर्च’मध्ये स्वतंत्न विभाग कार्यरत होता. त्यातच माझी ‘सर्च’ आणि गडचिरोली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या ‘संकल्प’ या महाराष्ट्रातील पहिल्या पोलीस व्यसनमुक्तीसाठीच्या प्रकल्पाची तांत्रिक सल्लागार म्हणून निवड झाली. मी खरं तर लहान मुलांसाठी बालमानसशास्त्नाचं काम करण्याच्या विचारत होते, त्यामुळे सुरुवातीला मला व्यसनमुक्ती विषयीच्या कामात अजिबात रस नव्हता. पण, तिसरी थापड बसायची वेळ आली होती. 
    पायाचं दुखणं असलेला एक रुग्ण माझ्याकडे आला. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं तो माझ्याकडे आला होता. त्याला दारूचं व्यसन होतं. अनेक तपासण्या करून झाल्या होत्या; पण पायाचं दुखणं थांबत नव्हतं. पण नेमकं कशामुळे दुखतंय हे तो सांगायलाच तयार नव्हता. दारूच्या नशेत कुठे पडले का? अपघात झाला का? या सगळ्या प्रश्नांवर उत्तर एकच. नाही. शेवटी त्याच्यासोबत आलेल्या इसमानेच त्याला इशारा करीत ‘त्या’ दिवसापासून दुखतंय म्हणून सांग म्हणण्याचा इशारा केला. पण तरीही तो गप्पच. शेवटी खूपच खोदून विचारल्यावर तो म्हणाला, एका लग्नात तो दारू प्यायला होता. खूप उकडतंय म्हणून दारूच्या नशेत जवळपास तीन तास बर्फाच्या लादीवर झोपला. तेव्हापासून हे दुखणं सुरू झालं होतं. सुरुवातीला दुर्लक्ष केलं; पण दुखण्यामुळे तो विचित्न वागायला लागल्यानं घरचे त्याला येथे घेऊन आले होते. उकडतंय म्हणून कुणी बर्फाच्या लादीवर कसं झोपू शकतं ऐकून तर मी हादरलेच. व्यसन हा गडचिरोली जिल्ह्यातील किती गंभीर विषय आहे याची मला तेव्हा प्रचिती आली. त्यानंतर व्यसनाच्या अनेक केसेसचा मी बारकाईने अभ्यास सुरू केला. व्यसनाधीन रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या समुपदेशनाची विशिष्ट पद्धत आणि कौशल्य आपल्याकडे नाही हे मला लक्षात आलं. त्यामुळे मी याबाबत वाचन करायला सुरुवात केली. या क्षेत्नामध्ये काम करणार्‍या अनेक संस्थांना भेटी दिल्या. व्यसनाच्या खूपच गुंतागुंतीच्या केसेस मी यादरम्यान हाताळल्या. या रुग्णांची मनोदशा समजून घेताना, त्यांना दारूच्या व्यसनातून बाहेर काढताना माझाही खूप मानसिक विकास होत गेला. केवळ औषधोपचार किंवा केवळ समुपदेशन पुरेसे नाही तर या दोघांचा पक्का पूल बांधणं यासाठी आवश्यक असल्याचं माझ्या लक्षात आलं.


    व्यसनमुक्तीवर काम करीत असताना इतरही प्रकारचे मानसिक रोगी यायचे. एकदा असाच एक ‘बायपोलार डिसऑर्डर’ म्हणजेच द्विधृवीय मनोविकार असलेला 17 वर्षाचा रोशन (नाव बदललं आहे) वडिलांसोबत आला. या आजारात कधी रुग्णाची उन्मादी अवस्था असते, तर कधी तो नैराश्यग्रस्त असतो. हा आजार असाच दोन टोकांचा. मुलाला बघताच त्याच्या आजाराची मला कल्पना आली. शिवराळ भाषेत तो बोलत होता. सोबतच खूपच वाईट नजरेने तो माझ्याकडे बघत होता. काही वेळासाठी मलाही त्याचं बघणं असह्य झालं. त्याच्या वडिलांना हे लक्षात येताच त्यांनी माझ्याच समोर त्याला जोरदार थोबाडीत मारली. वडिलांचेही डोळे भरून आले होते. त्याला झालेल्या रोगामुळे तो असा वागतोय, मारून काहीही होणार नाही हे मी त्यांना सांगितलं. अशा वागण्यामुळे गावात अनेकांशी मारामारी झालेली असावी हे त्याच्या शरीरावरील अनेक जखमांमुळे लक्षात येत होतं. मी त्याला ताबडतोब रुग्णालयात भरती करून घेतलं. पण, त्यानंतरचे काही दिवस आमच्या स्टाफसाठी फारच वाईट गेले. एकही नर्स त्याच्या वाईट नजरेतून वाचू शकली नाही. त्याला सांभाळणं खूपच जड जात होतं. 15 दिवस त्यानं रुग्णालयात धिंगाणा घातला. नियंत्नणात आणण्यासाठी आम्हाला त्याला ‘सिडाटाइव्हज’ (उपशामक औषधं) द्यावी लागली. 15 दिवसांनी मात्न त्याच्यात 60 टक्के सुधारणा झाली. त्यानंतर पाच ते सहा वेळा पाठपुरावा केल्यावर त्याच्यात 95 टक्के सुधारणा झाली. त्याच्यासाठी याआधी वडिलांनी शेती आणि बैलही विकला होता. आधी मांत्रिकाकडे आणि नंतर चंद्रपूरला दवाखान्यात नेऊनही कुठलाच फरक जाणवला नव्हता. त्यामुळे बरा झालेला आपला मुलगा पाहून वडिलांच्या आनंदाला पारावर नव्हता. शेती गेली तरी हरकत नाही पण पोरगा वाचला असे ते म्हणत होते. रोशनच्या केसमुळे मला अनेक प्रश्न पडले. रोशनला हा आजार होण्यापासून माझ्याकडे येईर्पयत अनेक उपचारांतून तो गेला होता. पण, हे उपचार उपयोगात आले नाहीत. सोबतच हेही लक्षात आलं की मानसिक आजारात परवडतील अशा सुविधाच आपल्याकडे नाही. त्यामुळे उपलब्ध, प्रभावी आणि परवडेल अशी मेंटल हेल्थकेअर सिस्टिम कशी उभारता येईल? हा प्रश्न आहे. गडचिरोलीत तर हे सारं अद्याप पोहोचलेलं नाही. आणि शहरी लोक विचारतात आदिवासी भागातही मानसिक आजाराच्या समस्या आहेत?
 आता शोधग्राम हे माझं घर आहे. मी आयुष्यात काय करावं याच्या अनेक कसोटय़ा असू शकतात. त्यातली एक मला इथे नायनांनी शिकवली. ती होती, ‘मला काय आवडतं यापेक्षा समाजाला कशाची गरज आहे’ हे तपासण्याची. माझा ‘स्वधर्म’ काय हे आता आता कळायला लागलं आहे. त्यामुळे गडचिरोलीची माणसं आता माझीच माणसं. ज्यांना खरी गरज आहे अशांसोबत मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करणं हा माझा ‘स्वधर्म’. आणि हे करायला मिळणं, अर्थपूर्ण जगायला मिळणं हे माझं भाग्य.     



(शब्दांकन - पराग मगर)
 

Web Title: psychiatrist aarti bang settled in Gadchiroli shares her story..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.