एव्हरेस्ट सर करुन आलेल्या 10 आदिवासी मुलांची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:02 PM2018-06-15T14:02:58+5:302018-06-15T14:02:58+5:30

मिशन शौर्य. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दहा आदिवासी तरुणांनी यशस्वी केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेची गोष्ट ! एव्हरेस्ट सर करून आलेल्या या मित्रांना भेटायला निघालो, तर त्यांच्या गावांत जायला रस्ते नाहीत, प्यायचं पाणी नाही, घर असलंच तर घरात वीज नाही. एव्हरेस्ट सर करून, मुंबईत सत्कार स्वीकारून ही मुलं घरी गेली, ती थेट शेतात राबायलाच !

The proud story of 10 Maharashtra's tribal students who conquer Everest: a report from their village | एव्हरेस्ट सर करुन आलेल्या 10 आदिवासी मुलांची गोष्ट

एव्हरेस्ट सर करुन आलेल्या 10 आदिवासी मुलांची गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देगावाबाहेर पहिल्यांदा पडलेल्या, विमानात पहिल्यांदा बसलेल्या आणि थेट एव्हरेस्टच सर करून आलेल्या आदिवासी मुलांच्या आयुष्यात थेट शिरणारा स्पेशल रिपोर्ट: मिशन शौर्यएव्हरेस्ट चढणं सोपं एकवेळ; दुर्गम आदिवासी भागातल्या या मुलांच्या जगण्याचा रस्ता अधिक चढणीचा आणि दमछाक करणारा आहे.. एक शिखर तर त्यांनी सर केलं; पण प्रश्नांचे अनेक पहाड आजही त्यांच्यासमोर आहेत. तेही चढून जाण्याची संधी या मुलांना मिळायला हवी.

- राजेश भोजेकर
मिशन शौर्य. चंद्रपूर जिल्ह्यातील दहा आदिवासी विद्याथ्र्याच्या एव्हरेस्ट मोहिमेची गोष्ट. या दहापैकी पाच विद्याथ्र्यानी एव्हरेस्ट सर केलं. उरलेल्या पाचांनी या मोहिमेत आपल्या शौर्याची आणि जिद्दीची शर्थ केली.  देशभर या मुलांचं नाव झालं, ती बातम्यांमध्ये झळकली, टीव्हीवर चमकली. राज्य सरकारनं मुंबईत त्यांचा सत्कार केला. खुद्द पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये या मुलांचं भरभरून कौतुक करत त्यांना शाबासकी दिली. सगळ्यांनी या आदिवासी मुलांच्या कर्तबगारीला सलाम केला.
मग ही मुलं घरी परतली. जी पावलं एव्हरेस्टचं स्वप्न पाहत होती, ती पावलं पुन्हा आपल्या वाडय़ापाडय़ांवर-वस्तीत आली. आणि मग ‘ऑक्सिजन’नं ठरवलं या मुलांना, त्यांच्या पालकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारत एव्हरेस्ट मोहिमेचा थरार जगायला त्यांच्या गावात जायचं.
 चंद्रपूर हा महाराष्ट्रासाठी अतिदुर्गम जिल्हा. त्या चंद्रपूर जिल्ह्यालाही जिवती आणि कोरपना हे दोन तालुके अत्यंत दुर्गम वाटतात. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरचे हे दोन जिल्हे. या दुर्गम-मागास भागाच्या विकासाला वेग मिळावा म्हणून खरं तर कोरपना आणि जिवती या तालुक्याची निर्मिती झाली. त्यातून या भागात रस्ते आले. या गावांर्पयत जाणं तुलनेनं सोपं झालं. पण गावांत जा, ती अजूनही भकास आहेत. मागासच आहेत. जिवती हा पहाडावर वसलेला आदिवासीबहुल तालुका. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘महाबळेश्वर’ म्हणा ना ! घनदाट जंगलं आणि डोंगरदर्‍या, त्यात हरवलेल्या वाटा आणि आडवाटा. त्या आडवाटांनीच निघालं की आपण पोहचतो ते या मुलांच्या गावात. त्यांच्या घरार्पयत मग या वाटा आपल्याला घेऊन जातात.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं आखलेल्या ‘मिशन शौर्य’ या मोहिमेत आदिवासी आश्रमशाळांचे जे दहा विद्यार्थी  थेट माउण्ट एव्हरेस्टवर चढाई करून आले ते या जिवती, कोरपना आणि राजुरा तालुक्यातलेच. चंद्रपूरपासून 45 किलोमीटर अंतरावर राजुरा तालुक्यातली ही देवाडा गावातली शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा. चंद्रपूरकडून हैदराबादकडे निघालं की अगदी शेवटच्या टोकावरचं हे गाव, आणि त्याच्या टोकाला ही आश्रमशाळा. या शाळेतील सहा मुलं ‘मिशन शौर्य’ मोहिमेवर सहभागी झाली होती. या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जी.जी. माळवे यांनी विद्याथ्र्याच्या गावांची माहिती दिली आणि मग एकेका विद्याथ्र्याच्या गावाच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. या गावांत जाणं हीदेखील एक आगळी मोहीमच होती.


पहिल्यांदा पोहचलो ते कावडागोंदी गावात. या गावापासून पश्चिमेस पुढे 6 किमीवर तेलंगणाची सीमा. शौर्य मोहिमेतील आकाश चिन्नू मडावी याच गावचा. आकाश खरं तर मोठय़ा जिद्दीचा; पण अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि तो शिखर गाठू शकला नाही, याची त्याला हुरहुर आहे. कावडागोंदी हे तसं पाहता एकच गाव नाही, 25 घरांचा गोंडगुडा व 80 घरांचा लभानगुडा अशी या गावाची विभागणी. सात सदस्यांची इथं ग्रामपंचायत आहे. मात्र निवडणुका होत नाहीत. सदस्य व सरपंचाची निवड बिनविरोध केली जाते. गावकरी तसे गुण्यागोविंदाने नांदतात. गावाला लागूनच डोंगररांगा. त्या  डोंगराच्या कुशीत शासनाच्या इंदिरा आवास योजनेतून मिळालेल्या घरात आई जानकुबाई आणि आकाश दोघेच राहतात. आम्ही पोहचलो तेव्हा आकाश तालुक्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त गेला होता. त्याची आई घरी होती. आपल्या पोराला भेटायला पेपरवाले आले, याचा विलक्षण आनंद त्या माउलीला झाला. तिनं लगेच अंगणात ठेवलेली खाट टाकली आणि आतून चादर टाकायला आणली. चादर असू द्या म्हणताच,  ‘तुम्ही इतक्या लांबून येथे आले बसा निवांत !’ - म्हणत खाटेवर चादर अंथरली. तेवढय़ात गावच्या सरपंच शारदा कुंभरे याही आल्या. ती माउली आकाशबद्दल बोलू लागली. आकाश पोटात तीन महिन्यांचा असताना त्याचे वडील गेले. पण आपण त्याला काही कमी पडू दिलं नाही, हे ती माउली ताठ मानेनं, आनंदानं सांगत होती. आकाशला तीन बहिणी.  आता सासरी गेल्या. तीन एकर कापसाची शेती आता मायलेक कसतात. त्यात भागत नाही म्हणून आई मजुरीला जाते. पण आपल्या कष्टांचं त्या माउलीला काही वाटत नाही, आकाश मेहनतीनं आपलं नशीब पालटून दाखवीन असं ती मोठय़ा विश्वासानं सांगते. 


आकाशची भेट बराचवेळ वाट पाहून झाली नाही, मग आम्ही पुढं जिवती तालुक्यातल्याच सगणापूरच्या दिशेनं निघालो. एव्हरेस्टर सर करणारा कविदास काटमोडे याच गावचा. सगणापूरला जायचं तर डोंगरदर्‍यातून वाट काढतच जावं लागतं. गावाला लागूनच तेलंगणाची सीमा. रस्ता कुठे डांबरीकरण तर कुठे केवळ गिट्टी उखडलेली. 200 लोकसंख्येचं हे गाव, विकासापासून लांब हरवल्यासारखं वाटतं. पहाडावर शेती करून इथं माणसं आपलं पोट भरतात. जगण्यासाठी आवश्यक सोयींचं कुठं चिन्ह नाही. गावात एसटीसुद्धा जात नाही. आठ-दहा कि.मी. वरील आंबेझरी येथर्पयत पायीच यावं लागतं. गावात जाताना पायी जाणार्‍या एका मुलाला थांबवून रस्ता विचारला तर तो म्हणाला मीपण त्याच गावचा. मग त्याला सोबत घेतलं. शिकला किती विचारलं तर त्यानं प्रामाणिपणे आपण निरक्षर असल्याचं सांगितलं. गावात शाळाच नाही तर शिकणार कुठून असंही खंतावून म्हणाला.
गावात पोहचलो, थेट कविदासच्या घरीच गेलो. घर म्हणजे बांबूच्या तट्टय़ाच्या भिंती, लाल मातीनं सारवलेलं कविदासचं घर. सगळीच घरं अशीच. दारिद्रय़ उघड दिसतं. अंगणात एक मेंढी बांधलेली होती. गावाला लागूनचा डोंगर तेलंगणाच्या सीमेत, त्यामुळं त्याचा नुस्ता आडोसाच, बाकी उपयोग नाही. पण कविदासच्या कामगिरीनं गावात एकदम अधिकार्‍यांची ये-जा वाढली. गावकरी पोराचं कौतुक करत होते. आम्ही पोहचलो तसं कविदासच्या आई शेषाबाईंनी पटकन प्यायला पाणी दिलं. पाणी गढूळ होतं, प्यायला पाणी कुठून आणता विचारलं तर त्या लगेच म्हणाल्या, साहेब इथं पाणीच नाही. गावाच्या बाहेर एक झरा आहे, तांब्या तांब्या भरून घागरभर पाणी आणायचं. अंगणात प्लॅस्टिकच्या घागरी त्याची साक्ष होत्याच. पहाडावर असलेल्या तीन एकर शेतीत कविदासचे वडील पांडुरंग काटमोडे राबतात. तीच पोटाची सोय. माउण्ट एव्हरेस्ट हे नाव कविदास आणि त्यांच्या घरच्यांनी कधी ऐकलं नव्हतं. कविदास कशाच्या तरी एका मोहिमेवर चालला आहे. त्यानं त्याचं भलं होईल,  एवढंच कळल्यानं घरच्यांनी त्याला जायची परवानगी दिली. परत आल्यानंतर कविदासनं सांगितलं की आम्ही जगातला सगळ्यात उंच डोंगर चढून आलो, तेव्हा त्यांना कळलं. आता या पोरामुळं आपले दिवस पालटले तर पालटतील अशी आशाही वाटली, ती वेगळीच.


तिथून निघालो ते जवळच वीस किलोमीटरवर राहणार्‍या विकास महादेव सोयामच्या गावात. 250 लोकसंख्येच्या या गावात शंभर टक्के आदिवासी राहतात. तालुक्यापासून जवळ असल्यामुळे रस्ता चांगला होता. विकासचे आई-वडील आठवडी बाजाराला जिवतीला गेले होते. विकास शेतात कपाशीची लागवड करायला गेला होता. एव्हरेस्ट सर केलं म्हणून मोठे जंगी सत्कार स्वीकारलेला विकास घरीच भेटेल असं वाटलं होतं; पण तो शेतात राबत होता. घरात पोहचलो तर वर आकाश मोकळं दिसतं, पडकं छत. भिंती अशा की एका वार्‍यात उडून जातील. त्या छताखाली या घरात पाच सदस्य राहतात. दीड एकर शेतीच्या भरवश्यावर जगतात. मजुरीला जातात. दारिद्रय़ म्हणजे काय हे या गावात, विकासच्या घरात आल्यावर जास्त ठसठशीत कळतं. विकासचे आजोबा घरी एकटेच होते. त्यांनी बसा बसा म्हणत खाटेवर बसवलं, विकासला शेतात बोलावणं धाडलं. तोवर त्यांच्या गप्पा मारल्या तर विकास कुठं गेला होता याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. तो परत आला तेव्हाच कळलं की पोरगं असा मोठा पहाड चढायला गेलं होतं. विकासनं इतर चार मुलांपेक्षा एक दिवस उशिरा  एव्हरेस्ट सर केलं. त्या उशीर होण्याचं कारण कळलं की आत्तार्पयत गरीब वाटलेलं हे घर एकदम श्रीमंत वाटायला लागतं. विकास आणि आकाश सोबत होते. मात्र आकाशची अचानक प्रकृती बिघडली. त्याला तिथंच सोडणं योग्य नव्हतं. मग विकासनं आकाशला पुन्हा बेस कॅम्पर्पयत आणून सोडलं. दमछाक झाली होतीच. एकदिवस विश्रांती घेतली आणि नव्या दमानं, जिद्दीनं त्यानं पुन्हा चढाई सुरू केली. विकास सांगतो, ‘मी खाली उतरलो नसतो तर इतर चार मुलांसह शिखर सर केलं असतं; पण ते महत्त्वाचं होतं, तसं आकाशची तब्येतही महत्त्वाची होती.’ या मोहिमेवर जाताना त्यानं बारावीची परीक्षा दिली होती. आता निकाल लागलाय, त्याला 59 टक्के मार्क पडलेत. मागील नऊ महिन्यांपासून तो या मोहिमेच्याच तयारीत होता. पण बारावी पास व्हायचंच असंही त्यानं ठरवलं होतं. विकासशी बोलत असताना त्याचे आजोबा त्याचं साहित्य, स्नो शू दाखवतात. आपल्या लेकराचा अभिमान त्यांच्या वृद्ध नजरेत झळाळून उठतो. विकासनं गावाचं नाव देशपातळीवर पोहचवलं याचा गावकर्‍यांना अभिमान आहे. विकासमुळे आता गावाचाही ‘विकास’ होईल, अशी आशा ते बोलून दाखवतात. तो व्हावा कारण या गावात एक नजर टाकली तरी कुठलीच शासकीय विकास योजना या गावार्पयत पोहचली नाही हे सहज लक्षात येतं.


विकासशी गप्पा मारून आम्ही कोरपना तालुक्याच्या दिशेनं निघालो. कोरपना तालुक्यातील एक मुलगी आणि दोन मुलांनी माउण्ट एव्हरेस्ट सर केलंय. कमलापूर हे गाव तसं कोरपना तालुक्यातलं; पण जिवती तालुक्याला लागून आहे. कोरपन्याहून दक्षिणेलाही तसं केवळ 10 किलोमीटर अंतरावरचं हे गाव. पण 10 किलोमीटरही किती दूर असू शकतात हे इथं कळतं. अत्यंत दुर्गम भाग. अक्षय मलाका आत्राम या गावचा. गावात बोटावर मोजण्याइतकी पक्की घरं. रस्ता नावाची गोष्टच नाही. गावत जायलाही रस्ता नाही. आपण माउण्ट एव्हरेस्ट सर करू शकलो नाही याची अक्षयला खंत आहे. ग्रुपमधल्या एका मुलाची तब्येत बिघडल्यामुळे शेरपा त्यांच्यासोबत खाली उतरला आणि तो परत न आल्यामुळं अक्षयची मोहीम संपली. मात्र तिथवर धडक मारणंही सोपं नव्हतं. अक्षयचं शेतकरी कुटुंब, नऊ एकर शेती. बर्फीले पहाड त्यानं आयुष्यात कधी बघितले नव्हते. आकाशातून विमान जाताना मान वरवर करून कितीदा पाहिलं, या विमानात आपल्याला कधी बसायला मिळेल असंही वाटलं नव्हतं. पण या मोहिमेनं स्वपAच पूर्ण करायची ठरवलं, विमानात बसून अक्षय हिमालयाकडे निघाला. या अनुभवानं मला खूप शहाणं केलं, असं अक्षय सांगतो. त्याच्या आईलाही आपल्या लेकाचं मोठं कौतुक. त्या सांगतात, तो त्या शिखरावर पोहचला नाही; पण पहाडार्पयत तर पोहचला, बदलून गेलं पोर माझं. खूप वेगळं झालं.’
- अक्षयच्या आईनं पहिल्यांदा अक्षयच्या तोंडून माउण्ट एव्हरेस्ट हे नाव ऐकलं. त्याच्या उंचीबद्दलही काही सांगितलं नाही, फक्त उंच पहाड आहे म्हणाला. परत आल्यावर अक्षयने सगळं सांगितलं तेव्हा आम्हाला धडकीच भरली असं त्या सांगतात. लेकाचं, त्याच्या मित्रांचं भरभरून कौतुक करतात. 


कोरपन्याला येऊन पुन्हा गोविंदपूरला निघालो. त्या गावाचा पत्ता विचारला तर सांगणारा पटकन म्हणाला माउण्ट एव्हरेस्टवीर उमाकांत सुरेश मडावीच्या गावात निघालाय का? गोविंदपूर हे गाव कोरपनाहून पश्चिमेस 15 किलोमीटर अंतरावरचं गाव. महाराष्ट्राचं शेवटचं टोक. दोन किलोमीटरवर तेलंगणाची सीमा. या गावच्या उमाकांतनं एव्हरेस्ट सर केलं. त्याच्या घरी आई-वडील आणि दोन बहिणी. अडीच एकर शेती. उमाकांतला खेळाची विशेष आवड. आम्ही गावात पोहचलो तेव्हा सायंकाळचे 6 वाजले होते. अंधारून यायला लागलं होतं. उमाकांत हा गावातील मुलांसह फुटबॉल खेळत होता. 350 लोकसंख्येचं हे गाव, गावात विकासाचं काही चिन्हं नाहीत. रस्ते तेवढे सिमेंट काँक्रीटचे. उमाकांतमुळे हे गाव एकाएकी फेमस झालं. उमाकांतचं कुडाचं घर. गोठा आणि घर एकच. अंगणातच बैल बांधलेले होते. साधं कौलांचं घर, अवस्था अशी की आज पडतं की काय. मातीच्या भिंती. टिनाचं छप्पर आहे. दोन वेळा पोट भरेल एवढीच जेमतेम मिळकत. पण हा मुलगा आश्रमशाळेत शिकायला गेला. त्या माध्यमातून मिशन शौर्यमध्ये सहभागी झाला. आणि त्यानं शिखरही सर केलं. परत आल्यानंतर त्याचं गावात जंगी स्वागत झालं. पोरानं एवढा मोठा पराक्रम केला, आता पुढं काय करावं असं वाटतं हे विचारलं तर त्याचे आईवडील सांगतात, ‘खूप शिकून मोठ्ठं व्हावं पोरानं अजून काय पाहिजे!’ 


या माणसांच्या उत्साहाची, आनंदाची लागण झालेले आम्ही मग प्रमेश सीताराम आडेच्या चिंचोली गावाला निघालो. गावात पोहचलो तेव्हा अंधार पडलेला होता. प्रमेशचे नाव घेताच एका गावकर्‍यानं आम्हाला त्याच्या घरी नेवून पोहचवलं. घर समोर होतं; पण अवतीभोवती आणि घरातही मिट्ट अंधार. लाइट गेलेत का विचारलं, तर प्रमेशच्या घरात विजेची जोडणीच नाही असं कळलं. तेवढय़ात गावकरी जमले. काहींनी आपल्या मोबाइलद्वारे उजेड पाडला. काहींनी टॉर्च आणून दिल्या. प्रमेशच्या घरातही एक बॅटरी टिमटिमत होती. त्या प्रकाशात प्रमेशची मातीनं सारवलेली झोपडी दिसत होती. प्रमेशच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच. दोघे भाऊ आणि आई-वडील असा परिवार. तीन एकर शेती, त्यांना तीन भाऊ आहे. उदरनिर्वाहाचं दुसरं काही साधन नाही. आई-वडील मजुरी करतात. प्रमेशही त्यांना हातभार लावतो. प्रमेशने माउण्ट एव्हरेस्ट सर केल्यामुळे त्यांना आता हे दिवस पालटण्याची आशा आहे. सगळ्या गावाचीच तशी ही कहाणी. तरी गावकर्‍यांनी प्रमेश परतला तशी त्याची मोठी मिरवणूक काढली.


चिंचोलीपासूनच पूव्रेला 3 कि.मी. अंतरावर सात घरांची वस्ती असलेला झुलबर्डी हा गुडा आहे. या गावची मनीषा धर्मा धुव्रे. तिच्या घरी गेलो. घरावर टिनाचं छत आणि मातीनं सारवलेल्या  भिंती. घरात दिवे होते, शेतातून तात्पुरता हा वीजपुरवठा घेतला असल्याचं मनीषाची आई मंदा धुव्रे यांनी सांगितलं. मनीषा एव्हरेस्ट सर करून आल्यापासून घरी ये-जा करणार्‍यांची संख्या वाढली आहे. रात्री घरात अंधार, ते बरं दिसत नाही म्हणून ही वीज घेतली असं त्या म्हणाल्या. या गावात नळयोजनाही नाही. काही सुविधा नाही; पण मनीषात जिद्द मोठी. ती सांगते, स्नो, रॉकमुळे भीती वाटायची. पण  माउण्ट एव्हरेस्ट सर करूनच घरी जायचं असं मी मनाशी ठरवूनच टाकलं होतं.  आणि तिथं पोहचले त्याचा आनंद काय सांगता नाही येत. या मोहिमेवर जाताना आम्हाला सतत सांगत होते, मोठी स्वपA पहा. मी पाहिलं, ते खरं झालं. शिखर सर करणार्‍या मुलांच्या गटात मनीषा ही एकमेव मुलगी. पोरीचा अभिमान वाटतो, तिची आई आनंदून सांगते. चार एकर शेतीवर त्यांचं कुटुंब गुजराण करतं. मनीषा अकरावीत शिकते, यापुढे अजून मोठी स्वप्न पहायची आहेत, असं ती विश्वासानं सांगते.
तिचाच सहकारी शुभम रवींद्र पेंदार. बल्लारपूर तालुक्यातील कवडजई गावचा. धानाच्या शेतीवर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. एक एकर शेतीवर शुभमचे आई-वडील राबतात. मजुरीची कामे करतात. आई-वडील आणि बहीण असे हे कुटुंब. अचानक वातावरणामुळे प्रकृती बिघडली त्यामुळे शुभम शिखर सर करू शकला नाही. त्याविषयी त्याला वाईट वाटतंच. गावात एका झोपडीवजा घरात राहणारा शुभम. त्यानं मोहिमेवर जातानाच बारावीची परीक्षा दिली. तो 64 टक्के गुण घेऊन उत्तीर्णदेखील झाला. आता  नागपूरला जाऊन त्याला बी.एस्सी. करायचंय. शासकीय अधिकार्‍यांनी मिशन शौर्यसाठी त्याची निवड केली. ते त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेण्यासाठी घरी गेले तेव्हाच माउण्ट एव्हरेस्टबद्दल पहिल्यांदा या घराला कळलं. हे शिखर सर नाही करता आलं; पण प्रगतीचं शिखर आपण गाठूच, असा विश्वास शुभमला वाटतो.
त्याच्याचसारखी खंत वाटते मूल तालुक्यातील भगवानपूरच्या इंदू भाऊराव कन्नाकेला. तीदेखील या मोहिमेत सहभागी होती. भगवानपूर हे पुनर्वसित गाव आहे. मूलपासून पश्चिमेस 10 किमीवर हे गाव वसवण्यात आलं आहे. प्रकल्पग्रस्तांना येथे जागा मिळाल्यापासूनच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरू होता. शासनाने येथील नागरिकांना घरे बांधून दिली. त्या गावची इंदू. प्रकल्पग्रस्तांचं वंचित जगणं जगणार्‍या या मुलीला मोठी संधी मिळाली. तिनं जिद्दीनं चढणवाट स्वीकारली. इंदूने 7500 फुटांर्पयत एव्हरेस्ट शिखरावर चढाई केली. मात्र सोबतच्या आंध्र टीममधील काही जणांची प्रकृती बिघडल्यामुळे शेरपा रेस्क्यूसाठी खाली उतरला. यानंतर तो परतलाच नाही. त्यामुळे शिखर सर करू न शकल्याचं शल्य तिला आहे. पण त्यातून जी हिंमत कमावली, त्याचंही मोल आहे हे तिच्या घरी गेलं की जाणवतंच.
चंद्रपूर-मूल मार्गावर चिचपल्लीच्या अलीकडे वलणी येथून सुमारे 13 कि.मी. अंतरावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पाहमी गाव आहे. या गावची छाया सुरेश आत्राम. गाव म्हणजे 28 घरांची वस्ती. रस्त्याचं बांधकाम सुरू दिसतं. वाटेत अंधारी नदी. या नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो. गावकर्‍यांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या झरी गेट मार्गे ये-जा करावे लागते. केवळ गावकरी व शासकीय अधिकार्‍यांनाच या मार्गाने ये-जाची परवानगी आहे. छाया ही चंद्रपूर जिल्ह्यातील मोहिमेतील दहाही मुलांची कॅप्टन होती. मात्र चढाईच्या दरम्यान तिची प्रकृती बिघडल्यामुळे ती बेस कॅम्पपासून पुढे जाऊ शकली नाही. मोहिमेपूर्वी बारावीची परीक्षा होती. ती 59 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. एव्हरेस्ट सर न केल्याचं दुर्‍ख तिला आहे. पाहमी या गावात एकही मोठं पक्कं घर नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प लागून असल्यामुळे वन्यजिवांचे नेहमी दर्शन घडत असते. अनेकदा गावाजवळून वाघ जातो असं छायाचे वडील सुरेश आत्राम सांगतात. मात्र वाघाने अद्याप गावात पाय ठेवला नसल्याचंही त्याचं मत आहे. आपल्या पोरीनं वाघाच्या हिमतीनं मोहिमेची तयारी केल्याचं अप्रूप ते वारंवार सांगतात.
आणि आपण जंगलात असताना हे वाटतंच की, फक्त हिमालय चढणं, एव्हरेस्ट सर करणं एवढीच नव्हती या मुलांसाठी मोहीम.
ती त्यांनी घरापासून सुरू केली होती. दुर्गम, मागास, आदिवासी भागात जगताना त्यांचा रस्ता अधिक चढणीचा आणि दमछाक करणारा होता.
एक शिखर तर त्यांनी सर केलं; पण जगताना प्रश्नांचे अनेक पहाड आजही त्यांच्यासमोर आहेत. ते चढत, सुखाचं शिखर गाठण्याची संधीही या मुलांना मिळायला हवी.
मिशन शौर्य. ते अजून त्यांच्यासाठी पूर्ण कुठं झालंय.???


rajeshbhojekar@gmail.com

(लेखक लोकमतच्या चंद्रपूर आवृत्ती उपसंपादक आहेत.)
 

Web Title: The proud story of 10 Maharashtra's tribal students who conquer Everest: a report from their village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.