प्रिन्स हॅरीची मेगन

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 10:41am

ती कुण्या बड्या घरची ‘गोरी’ राजकन्या नाही. मिश्र वंशाची आहे. मॉडेल म्हणून काम करते. हॉलिवूडमध्ये अभिनेत्री आहे. पहिलं लग्न मोडून बाहेर पडलेली ‘डिव्होर्सी’ आहे, आणि मुख्य म्हणजे स्पष्टवक्ती आहे. थेट, स्पष्ट, ठाम बोलते आणि तशीच जगते-वागते. अशी ‘ती’ आता राणीच्या महालात संसार थाटायला निघाली आहे.

- आॅक्सिजन टीम

सिण्ड्रेलाची गोष्ट चालू वर्तमानकाळातही खरी वाटावी असं आयुष्य तिच्या वाट्याला आलंय.. फरक इतकाच की सिण्ड्रेलाच्या गोष्टीतली सिण्ड्रेला गरीब बिचारी, लाचार, चेहरा नसलेली अशी एक सामान्य मुलगी होती. तिचं मात्र तसं नाही. मेगन मर्कल. इंग्लंडचा राजपुत्र प्रिन्स हॅरीशी तिचा साखरपुडा झाला आहे आणि मेगन आता राणीच्या राजमहालात राहायला जाणार हे खरं असलं तरी मेगन ही काही कुण्या बड्या राजघराण्याशी संबंधित ‘देखणी राजकन्या’ नाही. उलट ती एका सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी आहे. मिश्र वंशाची आहे आणि एक लग्न मोडून पुन्हा जगायला सुरुवात केलेली घटस्फोटिताही आहे. एवढंच नव्हे, तर ती सुप्रसिद्ध मॉडेल आहे आणि हॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्रीही आहे. तिला स्वत:ची अशी ओळख आहे. तिचं हॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी अभिनेत्री, मॉडेल असणं तर झालंच, पण मेगनची त्याहून वेगळी ओळख म्हणजे ती थेट, स्पष्ट, ठाम बोलते. तशीच जगते. आजवर तशीच जगत आली. आणि म्हणूनच ब्रिटिश राजपुत्रानं तिला बायको म्हणून निवडल्यावर इंग्लंडसह अमेरिकेतही माणसं चमकली आहेत. कृष्णवर्णीय आईच्या पोटी अमेरिकेत जन्मलेली ही मुलगी. वडील वर्णानं गोरे पण डच-आयरिश रक्ताचे. तिची आई डोरिया योग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होती. मेगन सहा वर्षांची असताना तिचे आई-वडील विभक्त झाले. एकदा आपल्या एका लेखात मेगनने लिहिलं होतं, ‘भिन्नवंशीय रक्त धमन्यांत घेऊन जगणं, स्वत:च स्वत:ला ओळख मिळवून देणं सोपं नव्हतं. एकीकडे अत्यंत धक्कादायक, अस्वस्थ करणार, कोड्यात टाकणार जगणं वाट्याला आलं होतं आणि दुसरीकडे दोन संस्कृती, दोन वंश, दोन वृत्ती यांच्या सीमारेषांवर उभं राहून जगणं फुलतही होतं.’ पण सारं वाढत्या वयात सोपं नव्हतंच तिच्यासाठी. तिची आई कृष्णवशीय आफ्रिकन दिसते. आणि मेगन निमगोरी खरी, पण कॉकेशियन दिसते. वर्गात मुलंच काय पुढे कॉलेजातही तिला विचारलं जायचं की, ही तुझी खरंच सख्खी आई आहे का? ... रंगावरून असे बोचरे प्रश्न तिनं बरेच सहन केले. मात्र आजवरच्या प्रवासात या मायलेकींनी एकमेकींचा घट्ट धरलेला हात सोडला नाही. सोशल वर्क आणि कम्युनिकेशन विषयात मेगननंं ग्रॅज्युएशन केलं. पार्टटाईम जॉब म्हणून ती कॅलिग्राफीही करायची. टेलीव्हिजनच्या एका एपीसोडने तिला स्टार बनवलं. पण तिचं स्टारडम खरं तर फार पूर्वी सुरू झालं होतं. ज्याची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल आहे. या व्हिडीओमधल्या भाषणात मेगन सांगते तो किस्सा थक्क करणारा आहे. ती सांगते, ‘मी ११ वर्षांची होते. अपघातानं, अजाणतेपणानंच एक भलतीच गोष्ट त्याकाळात मी माझ्याही नकळत करून गेले. आम्हाला शाळेत टीव्हीवर काही मुलांसाठीचे कार्यक्रम दाखवले जात. त्यात ब्रेकमध्ये एक जाहिरात दाखवली गेली. भांडी घासण्याच्या एका लिक्विड सोपची ती जाहिरात होती. तिची कॅचलाइन होती - ‘चिकट कढया आणि पातेल्यांशी दोन हात करणाºया अमेरिकेतल्या तमाम बायकांसाठी!’ ते ऐकून माझ्या वर्गातली दोन मुलं म्हणाली, ‘खरंय हे, बायकांची जागा स्वयंपाकघरातच असते.!’ मी चिडले. संतापले. अपमानास्पद वाटलं ते मला. धक्का बसला की बायकांसंदर्भात कुणी असं कसं बोलू शकतं? अकरा वर्षांची होते मी. पण मला अजून आठवतेय ती अपमानास्पद भावना. मी घरी आले. वडिलांनी माझा राग समजून घेतला. उडवून लावलं नाही मला. उलट म्हणाले, तुला काहीतरी करावंसं वाटतंय ना, कर मग! तू पत्र का लिहित नाहीस यासंदर्भात त्यांना? आपण पत्र लिहून काय होणार? आपलं कोण ऐकणार?- असा विचार करायचं ते वय नव्हतं. कुणाला पत्र लिहावं, असा विचार करताना मला वाटलं अमेरिकेच्या फर्स्ट लेडीलाच का लिहू नये? मग मी हिलरी क्लिंटन यांना पत्र लिहिलं. किड्स न्यूज प्रोग्रॅमचं सूत्रसंचालन करणाºया लिंडा एलर्बीला पत्र लिहिलं. अ‍ॅटर्नी ग्लोरीया अ‍ॅलर्ड यांनाही पत्र लिहिलं. आणि तो लिक्विड सोप बनवणाºया कंपनीलाही पत्र पाठवून माझा राग कळवून टाकला... पत्रं पाठवून मी विसरूनही गेले होते; पण महिनाभरानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. हिलरी क्लिंटन यांनी माझ्या पत्राला उत्तर लिहिलं होतं. ते वाचून मला किती आनंद झाला, ते सांगताही नाही येणार आता. मागोमाग लिंडा एलर्बी आणि अ‍ॅटर्नी ग्लोरीया अ‍ॅलर्ड या दोघींचीही उत्तरं आली. आणि किड्स शो करणाºया चॅनलचे पत्रकार मोठ्ठी व्हॅन घेऊन माझ्या घरी माझी मुलाखत घ्यायला आले. त्या अजाणत्या वयात मी केलेल्या एका लहानशा कृतीचे असे अत्यंत व्यापक परिणाम मी त्याच वयात अनुभवले; पण त्याही पुढे जाऊन एक गोष्ट घडली... लिक्विड सोप बनवणाºया त्या कंपनीनं आपल्या जाहिरातीची कॅचलाइनही काही दिवसांत बदलली... ‘चिकट कढया आणि पातेल्यांशी दोन हात करणाºया तमाम अमेरिकन्ससाठी!’ - ‘विमेन’ असा शब्द जाऊन ‘पिपल’ असा शब्द त्यांनी स्वीकारला. भांडी घासण्याचं काम फक्त बायकांचंच नसतं, हे त्यातून समोर आलं. बायकांना सन्मानाचं स्थान प्रत्येक पंगतीत मिळालं पाहिजे. त्या पंगतीत बसण्याचं आमंत्रण पाहिजे. आणि असं आमंत्रण मिळणार नाही, तेव्हा स्त्रियांनी आपली पंगत आपण मांडण्याची हिंमत कमावली पाहिजे... आता मला वाटतं की, समानतेविषयी असं नुस्त बोलून उपयोग नाही. त्या तत्त्वावर आपला अढळ विश्वास पाहिजे. आणि नुस्ता विश्वास असून उपयोग नाही, त्यासाठी आपण काही केलंही पाहिजे! आणि तेही आज, आत्तापासून..!’ - मेगनचं हे दोन-तीन मिनिटांचं भाषण म्हणजे तिच्या विचारांचं एक सूत्ररूप आहे. उत्तम अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहेच. ‘सूट्स’ या मालिकेतलं तिचं काम जगभर गाजलं. त्याच काळात तिनं लग्न केलं. पण दोन वर्षांहून अधिक ते लग्न टिकलं नाही. घटस्फोट झाला. आणि आज एक घटस्फोटिता राणीच्या नातवाशी लग्न करून थेट बकिंगहम पॅलेसमध्ये संसार थाटायला निघाली आहे. असं वाटू शकतं की, विदेशात काय घटस्फोटितेच्या लग्नाचं एवढं विशेष? एरवी नसतं, पण ब्रिटनच्या राणीच्या महालात ते आहे. कारण आजही ब्रिटिश राजघराण्याला घटस्फोट मान्य नाही. राजघराण्यात घटस्फोट तसे निषिद्धच. प्रिन्स हॅरीच्या आईने - प्रिन्सेस डायनाने हा नियम धुडकावण्याची हिंमत दाखवली. स्वातंत्र्याची आस धरून त्याची मोठी किंमतही चुकवली आणि आता इतक्या वर्षांनी एक घटस्फोटित तरुणी लग्न करून या महालात येते आहे. तीही कृष्णवंशीय आईची, आयरिश वशांच्या वडिलांची, मिश्र रक्ताची मुलगी. काळ बदललेला दिसत असला तरी ब्रिटिश समाजाच्या दृष्टीनेही ही एक मोठी घटना आहे. आणि हे सारं समजून- उमजून मेगन मर्कल हॅरीचा हात उघडपणे हातात घेऊन जगाला सामोरी जातेय.. काही वर्षांपूर्वी मैत्रिणीसोबत युरोप ट्रिपला गेलेल्या मेगनने बकिंगहम पॅलेससमोर मोठ्या उत्साहानं फोटो काढून घेतले होते.. काही महिन्यात ती सून म्हणून या महालात जायची आहे.. वरकरणी सिण्ड्रेलाची वाटत असली तरी ही गोष्ट सिण्ड्रेलाची नाही हे खरंच...

संबंधित

ICC World Twenty20 Semi Final 2 : भारताला इंग्लिश पेपर कठीण; उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात
ICC World Twenty20 : भारतीय महिलांना इंग्लंडकडून 'लगान' वसूल करण्याची संधी, उपांत्य फेरीत भिडणार
सरदाराची सटकली...जेवढ्या रंगाच्या पगड्या, तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस ताफ्यात
क्रिकेट सामन्यात कपडे काढून तो धावला, सुरक्षा रक्षकांना पळ पळ पळवलं
इंग्लंडचा लंकेवर मोठा कसोटी विजय, विदेशात १३ सामन्यानंतर चाखला विजयाचा स्वाद

ऑक्सिजन कडून आणखी

शिकायचं म्हणून नोकरीतून ‘गॅप’, पैसे कमवायचे म्हणून शिकण्यातून ‘गॅप’!
प्रोफेशनल लाइफचा नवीन नियम, काम बोलो दाम बोलो!
फिटनेस- फन - फटाफट- वायझेड तारुण्याचे 3 मंत्र!
Generation YZ- ही कोणती तरुण पिढी?
VR - आभासी जग घडवण्याची संधी

आणखी वाचा